दक्षिण गोव्यात मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिरे; नाव नोंदणीचे आवाहन

दक्षिण गोव्यात ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिरे आयोजित केली आहेत. नवमतदार आणि सुटलेल्या पात्र नागरिकांनी नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी या मोहिमेचा लाभ घ्यावा.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
10 hours ago
दक्षिण गोव्यात मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिरे; नाव नोंदणीचे आवाहन

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लीटस यांच्या कार्यालयातर्फे मतदारयादीत नवीन, युवा तसेच सुटलेल्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी ७ ते ९ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेदरम्यान वगळलेल्या नावांची पडताळणी तसेच पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे आणि यादीत कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या नोंदी राहू नयेत, यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांच्या नोंदींची पडताळणी करत आहेत.

या मोहिमेअंतर्गत दक्षिण गोव्यातील विविध तालुक्यांमध्ये विशेष शिबिर केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. फातोर्डा येथे जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय कार्यालय आणि आयटीआय बोर्डा येथे ही शिबिरे होतील. मडगाव येथे संयुक्त मामलेदार कार्यालय, मडगाव नगरपालिका आणि कालकोंडा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजनाची तयारी करण्यात आली आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात कुंकळ्ळी नगरपालिका सभागृह, चांदर, कावरे आणि आंबावली ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शिबिरे पार पडतील. वेळ्ळी भागात वेळ्ळी, असोळणा, चिंचणी आणि सां जुझे दी अरीयाल ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नागरिकांना नोंदणी करता येईल.

नावेली मतदारसंघात दवर्ली, रुमडामळ आणि नावेली ग्रामपंचायत, तर बाणावली मतदारसंघात कोलवा, सुरावली आणि बाणावली ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शिबिरे आयोजित केली आहेत. नुवे मतदारसंघात मतदान केंद्र क्रमांक २४ आणि एकात्मिक बाल विकास सेवा केंद्रात ही व्यवस्था करण्यात आली आहे. कुडतरी मतदारसंघात राय, कामुर्ली आणि कुडतरी ग्रामपंचायत कार्यालयांत नागरिक संपर्क साधू शकतात. फोंडा क्षेत्रात कुर्टी-खांडेपार ग्रामपंचायत, फोंडा नगरपालिका आणि राजीव गांधी कला मंदिर येथे शिबिरे होतील.

शिरोडा मतदारसंघात शिरोडा, बेतोडा आणि पंचवाडी ग्रामपंचायत; मडकई भागात कवळे, कुंडई आणि मडकई ग्रामपंचायत; तर प्रियोळ मतदारसंघात वेळींग-प्रियोळ-कुंकळये, बेतकी-खांडोळा आणि वळवई ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शिबिरांची आखणी करण्यात आली आहे. वास्को मतदारसंघात सेंट अँड्र्यूज हायस्कूल, सेंट जोसेफ स्कूल आणि सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्रे असतील. दाबोळी भागात श्री विश्वनाथ आर्लेकर स्मृती उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली आणि बोगमाळो ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी सुविधा उपलब्ध आहे.

मुरगाव मतदारसंघात आयटीआय बोगदा आणि बायणा येथील रामनाथ नाईक स्मृती सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय; तर कुठ्ठाळी मतदारसंघात संयुक्त मामलेदार कार्यालय (मुरगाव तालुका) आणि बायणा येथील रवींद्र भवन येथे शिबिरे पार पडणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व पात्र नागरिकांना, विशेषतः नवमतदार आणि प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांना या तीन दिवसीय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी संबंधित बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा