मडगाव :दक्षिण गोव्यात यावर्षी रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी अपघातांतील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १,००५ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये ९१ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९१५ अपघात झाले होते आणि ९६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दक्षिण गोवा वाहतूक पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नऊ महिन्यांत एकूण अपघातांमध्ये ९.८ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी मृतांच्या संख्येत ५.२ टक्क्यांची समाधानकारक घट नोंदवण्यात आली आहे.
जरी मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले, तरी अपघातात गंभीर जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२५ मध्ये पहिल्या नऊ महिन्यांत १३० जण गंभीर जखमी झाले होते. यंदा हा आकडा १७३ वर पोहोचला असून गंभीर दुखापतींच्या घटनांमध्ये ३३.०७ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, स्वयंअपघातात (Self-Accidents) मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी स्वयंअपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला होता, तर यंदा ही संख्या २८ वर आली आहे. एकूण अपघाती मृत्यूंपैकी स्वतःच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण ३९.१ टक्क्यांवरून ३०.१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
दक्षिण गोव्यातील विविध भागांचा विचार केल्यास, फोंडा वाहतूक कक्षाच्या हद्दीत सर्वाधिक १५९ अपघातांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मडगाव वाहतूक कक्षाच्या कार्यक्षेत्रातील मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १००, कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९६, तर कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८९ अपघात झाले आहेत. या आकडेवारीवरून फोंडा आणि मडगाव परिसर हे अपघातांच्या दृष्टीने अधिक संवेदनशील असल्याचे दिसून येते.
सप्टेंबर २०२६ च्या विशेष अंमलबजावणी अहवालानुसार, वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. अतिवेगाने गाडी चालवल्याप्रकरणी गेल्या वर्षी ९,९२० जणांवर, तर यावर्षी १८,६९० चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सर्वाधिक अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होत असल्याने विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या २७,०५८ जणांवर यंदा कारवाई करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षी १५,९४० इतकी होती. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १,३०० जणांवर यंदा खटले भरण्यात आले आहेत. मात्र नो-एन्ट्रीचे उल्लंघन, बेकायदेशीर पार्किंग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर आणि सदोष नंबर प्लेट यांसारख्या नियमोल्लंघनावरील कारवाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता रस्ते सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांकडून जनजागृतीवरही भर दिला जात आहे. रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त दक्षिण गोव्यातील नऊ वाहतूक कक्षांतर्फे ११६ जनजागृती व्याख्याने घेण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ४१ सत्रांच्या माध्यमातून ४,४८० विद्यार्थी आणि २१६ शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ३४७ टॅक्सी व रिक्षाचालक, १९६ बसचालक आणि ५०० हून अधिक पोलीस, अग्निशामक, नौदल जवान व खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे देण्यात आले.


