हैदराबाद : शहरात गेल्या दहा दिवसांत वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये तीन महिलांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या तिन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या, तरी तिन्ही प्रकरणांमध्ये महिलांसोबत असलेले पुरुष घटनास्थळावरून निघून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल आणि लॉज चालकांना विशेष सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
झारखंडच्या महिलेची हत्या
२२ सप्टेंबर रोजी झारखंडमधील एका महिलेचा हॉटेलमध्ये मृत्यू झाला. ती आंध्र प्रदेशातील एस. रवी तेजासोबत हॉटेलमध्ये दाखल झाली होती. सकाळी ती बेशुद्धावस्थेत आढळल्याचे रवीने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर रवी घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथून ताब्यात घेतले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर आले.
बँक कर्मचाऱ्याची हत्या
एस. आर. नगर परिसरातील हॉटेलमध्ये २९ सप्टेंबर रोजी ३४ वर्षीय बँक कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हचा मृतदेह आढळला. ती ए. श्रीनिवाससोबत हॉटेलमध्ये थांबली होती. खोली बुक करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. सकाळी श्रीनिवास बॅग घेऊन एकटाच हॉटेलमधून बाहेर पडला. काही वेळाने खोलीचा दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता महिला मृतावस्थेत आढळली. तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून आरोपी फरार आहे.
वैद्यकीय विद्यार्थिनीचा हॉटेलमध्ये मृतदेह
मियापूरमध्येही अशीच घटना घडली. २७ वर्षीय मेडिकल विद्यार्थिनीचा मृतदेह एका छोट्या हॉटेलच्या खोलीत आढळला. ३० सप्टेंबर रोजी ती तिचा मित्र रवीसोबत हॉटेलमध्ये आली होती. त्यानंतर रवी एकटाच बाहेर पडला. विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनवरून पोलीस हॉटेलपर्यंत पोहोचले. दरवाजा तोडल्यानंतर तिचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, उशीने तोंड दाबून तिची हत्या करण्यात आली.
स्वस्त हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर
सलग तीन घटनांनंतर हैदराबाद पोलिसांनी हॉटेल आणि लॉज चालकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जोडप्याने खोली घेतल्यानंतर त्यातील एक व्यक्ती अचानक बाहेर पडून परत न आल्यास हॉटेल कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे. तसेच बनावट ओळखपत्रांच्या आधारे खोली बुक करणाऱ्यांची माहिती तपासावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


