गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
काँग्रेसच्या ‘गोवा राखण यात्रे’ला शह देण्यासाठी भाजपने बुधवारी राज्यात ‘सेवा ज्योती यात्रा’ काढली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातून या यात्रेचा शुभारंभ केला. म्हापशासह इतर सर्व भागांतही ही यात्रा काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात सेवेची २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ तसेच ‘विकसित भारत २०४७’ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही यात्रा ऊर्जा देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. गोव्याच्या विविध मुद्द्यांवर जागृती करण्यासाठी काँग्रेसने ‘गोवा राखण यात्रा’ सुरू केली आहे. पणजी येथून सुरू झालेली ही यात्रा उत्तर गोव्यातून आता दक्षिण गोव्यात पोहोचली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातही या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. या यात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सचिन पायलट, पवन खेरा यांसारखे राष्ट्रीय नेते सहभागी झाले होते. नुवे आणि फातोर्डा मतदारसंघांतील यात्रेत महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी सहभाग घेतला. गुरुवारी कुठ्ठाळी येथील यात्रेत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सहभागी होणार आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा हेही या यात्रेनिमित्त गोव्यात येणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने महिनाभराचे ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू केले असून, त्याअंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून बुधवारी राज्यभर ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली. म्हापसा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह आमदार प्रेमेंद्र शेट आणि इतर नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वास्को, पर्वरी तसेच कुशावती जिल्ह्यातही ही यात्रा उत्साहात पार पडली. 
माणिकराव ठाकरेंकडून महाआघाडीचे संकेत
आम आदमी पक्षाकडून (आप) काँग्रेसवर सतत टीका होत असल्याने विरोधी पक्षांच्या महाआघाडीत अडचणी येत आहेत. तरीही, फातोर्डा येथील गोवा राखण यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्यांनी महाआघाडीचे आश्वासन दिले. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची महाआघाडी करण्यास काँग्रेस तयार आहे, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी फातोर्डा येथे स्पष्ट केले. तत्पूर्वी, मंगळवारी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी ‘गोवा फर्स्ट’चे होर्डिंग्ज काढून ‘आप’सोबतची युती तोडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा महाआघाडीच्या चर्चेला उधाण आले आहे. 
भाजपच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक : आर्सेकर
एकीकडे यात्रा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, दुसरीकडे इच्छुकांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सावर्डे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी संकेत आर्सेकर आणि सभापती गणेश गावकर यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली असून, ‘मी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे,’ असे संकेत आर्सेकर यांनी जाहीर केले आहे.
भाजपच्या यात्रेवर सुनील कवठणकरांची टीका
भाजपाची ‘सेवा ज्योती यात्रा’ ही प्रत्यक्षात ‘भाजप बचाव यात्रा’ आहे. काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाला घाबरून मुख्यमंत्र्यांनी ही यात्रा काढली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी केली आहे. या यात्रेवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात सेवेची २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ तसेच ‘विकसित भारत २०४७’ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही यात्रा ऊर्जा देणारी ठरेल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री


