चिकन शॉर्मा सेंटर सुरू करण्याच्या वादातून जुने गोवा येथे खून

स्वतःचे चिकन शॉर्मा सेंटर सुरू करण्याच्या वादातून गोव्यात एका २३ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील निरवडे रस्त्यावर आणून फेकून दिला. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत सावंतवाडी पोलिसांनी मुख्य संशयित हॉटेल मालकासह दोघांना जुने गोवा येथून ताब्यात घेतले आहे. ​


07th October, 11:58 pm
चिकन शॉर्मा सेंटर सुरू करण्याच्या वादातून जुने गोवा येथे खून

गोवन वार्ता न्यूज डेस्क
सावंतवाडी
स्वतःचे चिकन शॉर्मा सेंटर सुरू करण्याच्या वादातून गोव्यात एका २३ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील निरवडे रस्त्यावर आणून फेकून दिला. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत सावंतवाडी पोलिसांनी मुख्य संशयित हॉटेल मालकासह दोघांना जुने गोवा येथून ताब्यात घेतले आहे. ​आजिम खान (२३, मूळ रा. बहराइच, उत्तर प्रदेश; सध्या रा. जुने गोवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
मंगळवारी सायं. ६.३० च्या सुमारास सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल ‘कोकण क्राऊन’ लगतच्या रस्त्यावर ग्रामस्थांना युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडलेला आढळला. ग्रामस्थांनी तातडीने पोलीस पाटील आणि पोलिसांना माहिती दिली. सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची तपासणी केली. मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅगेतील ओळखपत्र आणि कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनात पोटावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.​
आजिम खान तीन वर्षांपासून जुने गोवा येथील एका हॉटेलमध्ये शॉर्मा बनवण्याचे काम करत होता. हॉटेल मालकाचा मेहुणा आणि आजिम स्वतंत्र शॉर्मा सेंटर सुरू करण्याच्या तयारीत होते. याचा राग धरून हॉटेल मालक दीपराज गोवेकर याने मंगळवारी दुपारी आजिमला जुने गोवा येथे बोलावून घेतले आणि साथीदारांच्या मदतीने जबर मारहाण केली. मारहाण सुरू असताना आजिमने पुण्यातील भावाला फोन लावून मदतीचा प्रयत्नही केला; पण हल्लेखोरांनी लगेच त्याचा फोन हिसकावून घेतला. या भीषण मारहाणीत पोटावर गंभीर घाव बसल्याने आजिमचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह गाडीत घालून सावंतवाडीजवळील निरवडे नमसवाडी येथील निर्जन रस्त्यावर फेकून दिला आणि तिथून पळ काढला.
गुन्हा जुने गोवा पोलिसांकडे वर्ग
​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवून जुने गोवा येथे छापा टाकला. हॉटेल मालक दीपराज गोवेकर याच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. आजिमचा मेहुणा कासिम महंमद याने दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खुनाची घटना गोवा हद्दीत घडल्याने हा गुन्हा शून्य नंबरने (झिरो एफआयआर) नोंदवून पुढील कारवाईसाठी जुने गोवा पोलिसांकडे वर्ग केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा