पक्षांतराचे भूत

काँग्रेसची यात्रा सुरू असली तरी त्या यात्रेचा जसा मार्ग कुठल्या कुठे आहे, तसाच काँग्रेसचाही मार्ग सध्या भरकटलेला आहे. मित्रपक्षांशी युतीचा थांगपत्ता नाही आणि उमेदवारही निश्चित होत नाहीत, त्याआधीच काँग्रेस गोवा राखण यात्रेला निघाली आहे.

Story: संपादकीय |
28th September, 10:59 pm
पक्षांतराचे भूत

गोवा काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ सध्या चर्चेत आहे. या यात्रेत परप्रांतीयांना घुसडल्यामुळे सुरुवातीला काँग्रेसवर टीका झाल्यानंतर आता काँग्रेस आपल्या काही ठराविक कार्यकर्त्यांनाच घेऊन एका टोकावरून दुसऱ्या टोकावर यात्रा काढत आहे. यात्रेच्या दरम्यान काँग्रेसच्या जाळ्यात काहीजण अडकत आहेत. यात्रेत काँग्रेस नेत्यांकडून सत्ताधारी भाजपच्या विरोधात लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेईल असा कोणताही ठोस अजेंडा दिसत नाही. तेच तेच मुद्दे नेत्यांकडून लोकांसमोर मांडले जात आहेत. त्यातला सर्वाधिक गाजत असलेला मुद्दा म्हणजे पक्षांतर करणाऱ्यांसाठी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद असल्याची घोषणा. कळंगुटमध्ये ही यात्रा सुरू झाली तेव्हा २५ लोकांचा बळी घेतलेल्या बर्च क्लबच्या अग्निकांड प्रकरणी पोलिसांनी ठपका ठेवलेल्या व अटक केलेल्या माजी सरपंच रोशन रेडकर यांना काँग्रेसने पक्षात प्रवेश दिला. कळंगुटमध्ये जिंकून येऊ शकतो अशा कोणालाही काँग्रेस उमेदवारी देत असते. २०१७ मध्ये जोसेफ सिक्वेरा यांना मायकल लोबोंच्या विरोधात उभे केल्याचे कोणी विसरलेले नाही. त्यानंतर २०२२ मध्ये त्याच मायकल लोबोंना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि सिक्वेरांना भाजपने. आता ज्या रोशन रेडकरवर बर्च क्लबला बेकायदा पद्धतीने व्यापार परवाना दिल्याचा ठपका आहे, त्यांना काँग्रेसने जवळ केले आहे. म्हणजे जोसेफ सिक्वेरा, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस हे काँग्रेसच्या यादीतून आता बाहेर पडल्यासारखेच आहेत. रोशन रेडकर यात्रेत सहभागी झाल्यामुळे तेच काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार झाले आहेत, अशी चर्चा आहे. अशा विचित्र गोष्टी होत असल्यामुळे काँग्रेसची यात्रा गोवा राखण्यासाठी आहे की गोवा लुटणाऱ्यांसाठी पायघड्या घालण्यासाठी आहे, ते कळायला मार्ग नाही. या यात्रेतून गोव्यासाठी चांगला विचार करणारे लोक काँग्रेसमध्ये येतील किंवा उमेदवारीसाठी दावेदारी करतील असे दिसत होते. मात्र, ज्या पद्धतीने ही यात्रा सुरू आहे ते पाहता काँग्रेसला याचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल असे दिसते.

२०१७ आणि २०२२ मध्ये पक्षाला ग्रासलेल्या पक्षांतराच्या भुताच्या सावटातून काँग्रेस अजूनही बाहेर आलेली नाही. आधी दहा आणि नंतर आठ आमदार पक्ष सोडून भाजपात गेल्यामुळे पक्षांतर करून गेलेल्यांसाठी पक्षाचे दरवाजे बंद, असा एकच सूर काँग्रेस आळवत आहे. २०१७ च्या निकालानंतर झालेल्या पक्षांतरानंतर २०२२ मध्ये काँग्रेसने उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. धार्मिकस्थळांवर वचने, शपथा घेतल्या. पण निकालानंतर लगेच आठजणांनी या साऱ्या गोष्टींना तिलांजली देऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निकालानंतर काय होईल ते काँग्रेस किंवा कोणीच सांगू शकत नाही. आता ज्या लोकांना काँग्रेस प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची स्वप्ने पाहत आहे, त्यातील काहीजण निवडून आलेच तर ते काँग्रेसमध्ये राहतील याची काय हमी आहे. अद्याप उमेदवारी दिली नसली तरी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे अनेकजण मूळ भाजपचेच आहेत. भाजपचे माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे शुद्धीकरण होऊ शकते का, त्याचा विचार काँग्रेसने करायला हवा. पण तो विचार काँग्रेस करते असे दिसत नाही. कारण भाजपच्याच गोटातून आलेल्या काहीजणांना सध्या पक्षात प्रवेश देणे सुरू आहे किंवा प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप ज्यांना उमेदवारी देणार नाही, असे लोक काँग्रेसच्या आश्रयाला येण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी आतापासून चर्चाही सुरू आहे. अशा लोकांपासून काँग्रेस सावध राहत नाही. त्यामुळे उमेदवारी वाटपातील आर्थिक व्यवहाराचे नंतर आरोप होतात. काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या गोवा राखण यात्रेतून गोव्याच्या संरक्षणासाठी आपण काय करणार ते लोकांना पटवून देण्याची गरज असताना भाजपने ओवाळून टाकलेल्यांशी सलगी सुरू आहे. या सर्व प्रकारांवरून ‘या’ पद्धतीने काँग्रेस सत्तेच्या शर्यतीत कशी काय टिकून राहू शकते, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. निवडणूक तोंडावर असली तरी काँग्रेसला अजूनही सूर गवसलेला नाही. निवडणूक जाहीर होईपर्यंत पुढील काही महिन्यांत बऱ्याच घडामोडी होतील. काँग्रेस आपले उमेदवार शोधत असतानाच इतर पक्षांसोबत युतीचा विषयही सोडवायचा आहे. काँग्रेसची यात्रा सुरू असली तरी त्या यात्रेचा जसा मार्ग कुठल्या कुठे आहे, तसाच काँग्रेसचाही मार्ग सध्या भरकटलेला आहे. मित्रपक्षांशी युतीचा थांगपत्ता नाही आणि उमेदवारही निश्चित होत नाहीत, त्याआधीच काँग्रेस गोवा राखण यात्रेला निघाली आहे.