नवी दिल्ली : कॅनरा बँकेने ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या ३,५०० पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा नसून कागदपत्रांची पडताळणी आणि स्थानिक भाषेच्या ज्ञानाचा विचार केला जाणार आहे.
या भरतीअंतर्गत देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कॅनरा बँकेच्या शाखांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. अप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्षाचा असेल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा १६,६५० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा आणि शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे, तर इतर उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल.
अशी असेल निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून, संबंधित स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
असा करा अर्ज
उमेदवारांनी प्रथम NATS पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील करिअर/रिक्रूटमेंट विभागात जाऊन ‘Graduate Apprentices in Canara Bank under Apprentices’ या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाइन अर्जात मागितलेली माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज शुल्क लागू असल्यास ते भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट जतन करून ठेवावी.
अधिकृत संकेतस्थळ : Canara Bank


