मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते प्रदीप रावत (Pradeep Rawat) (७४) यांचे ब्लड कॅन्सरशी (रक्ताचा कर्करोग) झुंज देताना निधन झाले. हिंदी, तमिळ, तेलगू आणि इतर अनेक प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्ये आपल्या दमदार आणि धडकी भरवणाऱ्या खलनायकी भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

महाभारत ते ‘गझनी’ : ४० वर्षांचा यशस्वी अभिनय प्रवास
प्रदीप रावत यांनी १९८० च्या दशकात आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली. चार दशकांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ नकारात्मकच नव्हे, तर सहाय्यक आणि व्यक्तिरेखात्मक भूमिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘सरफरोश’ (Sarfarosh), ‘गझनी’ (Ghajini) आणि ‘सैये’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरल्या. दूरदर्शनवरील ऐतिहासिक ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली.


बहुभाषिक स्टार, दिग्दर्शकांची पहिली पसंती
स्वतःला एका भाषेपुरते मर्यादित न ठेवता रावत यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची रुबाबदार शरीरयष्टी, स्क्रीन प्रेझन्स आणि प्रभावी संवादफेक यामुळे ते अनेक बड्या दिग्दर्शकांची पहिली पसंती असायचे. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंतच्या सर्वच प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाला भरभरून प्रेम दिले.


