त्या छोट्या मुलाच्या आईने मला जवळ बसवले, माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, "बाय, बघ त्या पोराला बाप नाही. घरात कमाईचे साधन नाही. तुला शाळेत आल्याचा पगार मिळतो, माझ्या मुलाला मिळेल काय?

शाळेत शिक्षिका असतानाच मी समुपदेशक म्हणूनही काम करत असे. अर्थात, हे काम अर्थप्राप्तीसाठी नव्हते; पण विनोदाने सांगायचे तर, दुसऱ्याच्या अडचणीत नाक खुपसण्याची हौस किंवा फुकटचे व्याख्यान देण्याची सवय म्हणा! पण समुपदेशक म्हणून मी चार लोकांना माहीत होते हे नक्की. आता या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात 'कौन्सिलिंग' हा शब्द अगदी कॉमन झाला आहे. गोव्यात तर प्रत्येक शाळेत हे पद शिक्षकाच्या जोडीने अस्तित्वात आहे. इतर राज्यांचे माहीत नाही, पण पूर्वी असे नव्हते. मुळातच सायकोलॉजिस्ट (मानसशास्त्रज्ञ) आणि सायकियाट्रिस्ट (मानसोपचारतज्ज्ञ) यातला फरकच मोठमोठ्या लोकांना माहीत नव्हता. समुपदेशन घेणे आणि मानसिक रोगांवर उपचार घेणे, हे बऱ्याचदा सारखेच मानले जात असे. अर्थात, आजसुद्धा भारतात याबाबत फारसा प्रकाश पडलेला नाही; पण दोन्हींतला फरक समजण्याइतपत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे, हे नक्की.
मी बी.एड.ला असताना आमच्या मॅडमसोबत आम्ही अनेकदा आदिवासी पाड्यांवर जात असू, शिक्षण प्रसाराकरिता. आदिवासी मुलांना शाळेत आणून एका जागी बसवणे हे फारच आव्हानात्मक काम म्हणावे लागेल. अहो, निसर्गाची लेकरे ती! शालेय अभ्यासापेक्षा निसर्गअभ्यासातच जास्त रमणारी. त्यांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगून, आम्ही मुलांना शाळेची गोडी लावत असू. खरं सांगू, माझ्यातला समुपदेशक त्याच वेळी जागा झाला म्हणायला हरकत नाही.
शाळेत मुलांसाठी दर आठवड्याला समुपदेशनाचा एक तास असायचा. पण त्यांचा उद्देश फक्त मुलांची शैक्षणिक क्षमता आणि पातळी वाढावी एवढाच असे. क्वचित प्रसंगी एखाद्या विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालण्याची संधी मिळत असे. असाच एकदा माझ्या आठवणीतला एक विद्यार्थी; तसा तो अभ्यासात चांगला, परीक्षेतही उत्तम गुण मिळवणारा होता. पण दोन महिने झाले, तो जरा शांत-शांत आणि स्वतःमध्येच हरवलेला दिसत होता. चाचणी परीक्षेतही त्याला या वेळेस गुण थोडे कमीच मिळाले. न राहवून एक दिवस ऑफ तासाला मी त्याला स्टाफ रूममध्ये बोलावून, आपल्या पद्धतीने काही प्रश्न विचारले. सुरुवातीला टाळाटाळ करणारा तो मुलगी नंतर मात्र घडाघडा बोलू लागला.
त्याची घरची परिस्थिती तशी चांगली होती. आतापर्यंत सगळे सुरळीत चालू होते, मुलांनाही काही टेन्शन नव्हते. साहजिकच शाळेतही मुलगा व्यवस्थित होता. पण एक दिवस रात्री झोपताना त्याने आपल्या आई-बाबांचा संवाद ऐकला. त्याच्या वडिलांनी नवीन जागा घेण्यासाठी कर्ज काढले होते आणि त्याचे हप्ते आता सुरू होणार होते. वडील आईला कशी काटकसर करावी लागेल, हे समजावत होते. अर्थात, अशा वेळी घरात काही प्रमाणात वाद होतात आणि तसेच झाले होते. झोपेचे सोंग घेऊन पडलेल्या त्या आठवीतल्या मुलाला नक्की किती कळले माहीत नाही; पण 'आपल्या बाबांवर कर्ज आहे आणि आता आपण गरीब झालो आहोत,' असे त्याने मनावर घेतले. त्याचा परिणाम त्याच्या दैनंदिन जीवनावर आणि अभ्यासावर होऊ लागला. शेवटी त्याच्या पालकांशी बोलून मी त्यांचा मुलाशी सुसंवाद घडवून दिला. नक्की परिस्थिती काय आहे, हे त्या मुलाला त्याच्या वयानुसार समजवून सांगितले आणि मुलगा पुन्हा लयीवर आला. प्रसंगी आपण घरात काही विषयांवर चर्चा करतो आणि विसरूनही जातो, पण मुले मात्र अत्यंत संवेदनशील असतात आणि हे संवेदनशील मन बऱ्याचदा गोष्टीचा विपर्यास करते, याचे हे एक उत्तम उदाहरण!
अर्थात, प्रत्येक वेळी सफलता मिळतेच असे नाही. काही किस्से तर असे असतात की, त्या वेळी तुमचे शिक्षण, समजवण्याची क्षमता... सगळे सगळे शून्य ठरते; राहते ती फक्त कठोर वस्तुस्थिती. मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही आदिवासी क्षेत्रात समाजसेवक म्हणून काम करायचो. गावागावात बंद पडलेल्या अंगणवाड्या चालू करून मुलांना शिक्षणाची गोडी लावणे हे आमचे ध्येय होते. त्या काळी आम्ही तरुण होतो, अंगात रक्त सळसळत होते आणि काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी होती.
असाच एकदा एका झोपडीत बसून अर्धा तास पालकांना समजावून, आम्ही त्यांच्या लहान मुलाला शाळेत पाठवण्यास सांगितले. पालकही 'हो' म्हणाले आणि मुलगाही तयार झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत वाट पाहत बसलो, पण मुलाचा पत्ताच नाही. परत आम्ही त्यांच्या घरी गेलो. असे सतत चार दिवस चालले. आम्ही पालकांना पोटतिडकीने समजावत होतो, आपले शिकलेले सगळे कसब वापरून मुलाला शाळेत पाठवायला त्यांना उद्युक्त करत होतो. समोरून होकार यायचा, पण प्रत्यक्षात 'पालथ्या घड्यावर पाणी'. चौथ्या दिवशी जरा रागाने आणि नाराजीनेच मी त्यांच्याकडे गेले.
पालक जरी गरीब असले, तरी माझ्या चेहऱ्यावरची नाराजी त्यांच्या लगेच लक्षात आली. त्या छोट्या मुलाच्या आईने मला जवळ बसवले, माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, "बाय, बघ त्या पोराला बाप नाही. घरात कमाईचे साधन नाही. तुला शाळेत आल्याचा पगार मिळतो, माझ्या मुलाला मिळेल काय? त्याला शाळेत पाठवण्यापेक्षा रानात मधाची पोळी काढायला पाठवणे मला परवडते. निदान तो मध विकून आठवड्याभराची मीठ-मिरची तरी घरात येते. तुझे शिक्षण आणि शाळा आम्हाला हे सगळे देणार का मग?"
त्या माऊलीने अत्यंत निरागसपणे मला विचारले. माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते! अहो, एवढी शिकलेली माझी सगळी सायकॉलॉजी या एका युक्तिवादासमोर साफ कोलमडून पडली. एका साध्या, अशिक्षित बाईने मला खूप मोठे व्यावहारिक ज्ञान दिले होते. अत्यंत विचारातच मी घरी परतले. 'नक्की काय केल्याने या मुलांना शाळेची गोडी लागेल?' याचे उत्तर मला मिळाले होते आणि त्याप्रमाणे मी पुढे जाण्याचे ठरविले.
आता मी पुढे नक्की काय केले, हे पुढील भागात नक्की सांगते...
- सौ. रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा