आनंद! तू आई-वडिलांचा पहिला 'आनंद' आहेस. मी त्यांचा आनंद हिरावून घेतला, तर भगवंत मला कधीच माफ करणार नाही. तेव्हा आपली वाट आजपासून वेगळी.

सीमा एका संध्याकाळी एकांतात बसली होती. मनात विचारांचे तांडव कधी सुरू झाले, तिचे तिलाच समजले नाही. काय कमावले? काय गमावले? चुकले तर कुठे चुकले? खरंच ती आमची चूक होती का? काहीच कळून येत नव्हते, डोके अगदी सुन्न झाले होते.
तिचे बालपण तिला पूर्ण आठवत नसले, तरी काही ठळक गोष्टी मनातून काढता येत नव्हत्या. गावात अनेक जातींचे लोक राहत होते. माणसांना न शिवणे, स्वयंपाकघरात वा देवघरात न घेणे, चहा करवंटीत देणे, खाऊ वरून हातात टाकणे... असे अनेक प्रकार चालू होते. जसजशी भावंडे मोठी झाली, तसे हे प्रश्न मनात खोलवर घर करू लागले. एक दिवस त्यांनी बाबांना विचारले, "बाबा, महार म्हणजे काय? बामण म्हणजे काय? भंडारी, मराठा म्हणजे काय? त्यांना शिवू नये म्हणजे काय?"
बाबांनी उत्तर दिले, "जो हुशार आहे, वेद-उपनिषदे जाणतो, संस्कृत व संस्कृती इतरांपर्यंत पोहोचवून समाज घडवतो, तो ब्राह्मण. जो शरीराने धष्टपुष्ट आहे, शस्त्रविद्या जाणतो व रक्षण करतो, तो क्षत्रिय. लोकांच्या कलेप्रमाणे व कामाप्रमाणे सुतार, माळी, कुंभार, महार अशी नावे दिली गेली. पण माणसानेच त्यात उच्च-नीचता जकडून ठेवली." त्यानंतर यावर चर्चा झाली नाही.
एकदा चतुर्थीला सीमा 'शिवताशिव' झाली. तेव्हा तिला मिळालेली वागणूक अशी होती की, स्वतः अस्पृश्य असल्यासारखे वाटले. एक शिवताशिव स्त्री आणि अस्पृश्य यांच्यात काय फरक आहे? असा विचार मनात येऊन गेला. अस्पृश्यतेची वागणूक मिळताना त्यांना किती वाईट वाटत असेल, हे प्रश्न तिला पडू लागले. आई-वडील मुलांच्या मताशी सहमत झाल्याने, ते हळूहळू हे भेद टाळून त्यांच्याशी मैत्रीने वागू लागले. एकदा खोलीत अस्पृश्यांना प्रवेश दिला म्हणून घरमालकाने भांडून आम्हाला खोली सोडायला लावली, हाही अनुभव आम्ही घेतला. पण तो अस्पृश्य आहे हे माहीत होते म्हणून त्याने हा तांडव केला; जर अनोळखी माणूस आला, तर आपण जात विचारून घरात घेतो का?
कालांतराने लक्षात आले की गावी शहरापेक्षा जास्त उच्च-नीचता पाळतात. तिथे मागासवर्गीयांना फक्त अंगणातच प्रवेश मिळायचा. सीमाने बाबांना विचारले, "हे काय?" तेव्हा बाबा हताशपणे म्हणाले, "आपल्याला समाजात राहावे लागते, नाहीतर समाज बदलणे गरजेचे असते; पण समाज बदलणे सोपे नाही. समाज एकट्याला वाळीत टाकतो. आपण गावाला सोडून राहू शकतो का?"
पुढे सीमाचा भाऊ शिक्षणासाठी कॉलेजच्या खोलीवर मित्रांसोबत भाड्याने राहू लागला. तिथे अनेक जाती-धर्माचे लोक होते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चर्चा करताना, "तुम्ही जातीभेद मानता का?" असा प्रश्न आला. तेव्हा भावाने बालपणीच्या बाबांच्या गोष्टीवरून "नाही" असे ठाम उत्तर दिले.
त्या घोळक्यात दीपाली नावाची एक अस्पृश्य मुलगी होती. अतिशय सुंदर आणि बुद्धीने हुशार असलेली दीपाली आयुर्वेद कॉलेजमध्ये डॉक्टरकी करत होती. तिला भावाचा स्वभाव, विचार आणि बुद्धिमत्ता खूप आवडली. ती मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागली. सुट्टीत आनंद गावी गेला असता खूप दिवस परत आला नाही. अस्वस्थ झालेल्या दीपालीने त्याला पत्र लिहून आपल्या प्रेमभावना स्पष्ट केल्या.
ते पत्र नेमके बाबांच्या हातात पडले. ती मुलगी मागासवर्गीय आहे हे कळताच, "ही गोष्ट शक्य नाही," असे बाबांनी स्पष्ट सांगितले.
आनंदने पत्रानंतरचा सर्व प्रकार जड अंतःकरणाने दीपालीला जाऊन सांगितला. घरची अब्रू, समाजाची भीती आणि आई-वडिलांचे मन जपण्याची हतबलता त्याने मांडली. हे ऐकून दीपालीच्या पायाखालची जमीन सरकली. तिची स्वप्ने एका क्षणात उध्वस्त झाली होती.
स्वतःला सावरून तिने शेवटी आनंदला एक पत्र लिहून दिले:
"आनंद! तू आई-वडिलांचा पहिला 'आनंद' आहेस. मी त्यांचा आनंद हिरावून घेतला, तर भगवंत मला कधीच माफ करणार नाही. तेव्हा आपली वाट आजपासून वेगळी. आपण मैत्रीच्या बंधनातही राहू शकणार नाही; कारण ज्यांना हे माहीत आहे, त्यांची पाहण्याची नजर वेगळी असेल. यामुळे मला बदनामीचा डाग लागून माझे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. म्हणून आजपासून आपल्या वाटा वेगळ्या!"
दीपालीचा हा विचार आनंदच्या आयुष्यात तिने पेटवलेला दिवा होता, ज्यामुळे तो कर्तव्याच्या वाटेवरून कधीही चुकणार नव्हता. पण यात तिची काय चूक होती? संत तुकाराम महाराज म्हणतात, "अवघे एकचि विण, तेथे कैसे भिन्नभिन्न?" जर आपण एकाच ब्रह्मसूत्रातून निर्माण झालो आहोत, तर हा भेदाभेद कशासाठी?
दीपालीच्या त्या त्यागाने सीमा खूप रडली. प्रत्यक्षात नाही, तरी मनाने ती सीमाची झाली. दीपालीने पेटवलेली ती ज्योत होती. त्यानंतर आनंद आई-वडिलांचे प्रत्येक ऐकत होता, स्वतःहून कोणताही निर्णय घेत नव्हता.
या विचारात सीमा खूप मागे गेली होती, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. एवढ्यात पतीदेवांचा फोन आला, "जेवलीस का?" तेव्हा सीमा भानावर आली. रात्रीचे अकरा वाजले होते. संध्याकाळपासून या विचारात ती वेळ आणि भूक दोन्ही विसरून गेली होती. ती न जेवताच झोपली.
आज बऱ्याच सुधारणा झाल्या असल्या, तरी समस्या अजूनही आ वासून उभ्या आहेत. काही गोष्टी फक्त गाण्यापुरत्याच उरल्या आहेत का?
"हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..."
- संतोषी शामसुंदर महाले
पर्वरी (९४२०५९४८५९)