Home >> ती >> आईचा दुसरा जन्म

आईचा दुसरा जन्म

आई... ही निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती आहे. तिच्या वेदनांमधूनच एका नव्या जीवनाचा जन्म होतो, आणि त्या वेदनांमधूनच एका स्त्रीचा दुसरा जन्मही.

Story: अनुभवलेलं |
17th July, 10:11 pm
आईचा दुसरा जन्म

ती आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडून हमसून रडत होती. “आपल्या बाळाला काही होणार तर नाही ना? मला खूप भीती वाटते आहे...” तिचा आवाज थरथरत होता. डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता. तिच्या नवऱ्याने तिला अलगद जवळ घेतले. “धीर धर, स्वरा... काहीही होणार नाही. डॉक्टर येतीलच आता.” पण स्वराचे मन काही केल्या शांत होत नव्हते.

स्वरा पहिल्यांदाच आई होणार होती. डॉक्टरांनी दिलेली प्रसूतीची तारीख उलटून पंधरा दिवस झाले होते, तरीही प्रसूती होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी सलाईनमधून औषध देऊन प्रसूतीवेदना सुरू केल्या. प्रसूतीविषयी स्वराने भरपूर वाचन केले होते. तिला माहीत होते की प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर त्या थांबता कामा नयेत; उलट त्या अधिक तीव्र व्हायला हव्यात. पण तिच्या बाबतीत अगदी उलटेच झाले. काही वेळाने वेदना पूर्णपणे थांबल्या. तिच्या मनात धोक्याची चाहूल लागली. तिने लगेच आईला सिस्टरला बोलवायला सांगितले. सिस्टर आली. तिने बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी यंत्र लावले. ठोके व्यवस्थित ऐकू येत होते.

“काही काळजी करू नका. बाळ अगदी व्यवस्थित आहे,” ती म्हणाली. पण आईच्या मनाला आलेली शंका अनेकदा खरी ठरते. स्वराचे मन काही ऐकायला तयार नव्हते. तिने नवऱ्याला डॉक्टरांना तातडीने बोलवायला सांगितले. डॉक्टर आले. त्यांनी तपासणी केली आणि क्षणाचाही विलंब न करता तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. गर्भपिशवी फोडताच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांनी तातडीने दुसऱ्या डॉक्टरांना बोलावले. “बाळाने गर्भपिशवीत मलविसर्जन केले आहे. लगेच सिझेरियन करावे लागेल.”

क्षणात भूल देण्यात आली. स्वराला फक्त शरीर हलवल्याची जाणीव होत होती. तिच्या मनात एकच प्रार्थना होती, “देवा... माझं बाळ सुखरूप असू दे.”

आणि पुढच्याच क्षणी...

ऑपरेशन थिएटरमध्ये एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. तो आवाज ऐकताच स्वराच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिचे काळीज शांत झाले. तिला मुलगा झाला की मुलगी, याचा विचारही तिच्या मनात आला नाही. तिच्या उदरात नऊ महिने वाढलेला जीव सुरक्षित होता, एवढेच तिच्यासाठी महत्त्वाचे होते.

लग्नानंतर काही महिन्यांतच मातृत्वाची गोड चाहूल तिच्या आयुष्यात आली होती. सुरुवातीला आपण गरोदर असल्याचे तिलाही समजले नव्हते. पण जेव्हा हे समजले, तेव्हापासून ती स्वतःची जपणूक करू लागली.

उलट्या, मळमळ, अचानक लागणारी भूक, शरीराचा होणारा त्रास... हे सगळे तिची आई प्रेमाने सांभाळत होती. तिचा नवराही तिच्या प्रत्येक हट्टाला प्रेमाने मान देत होता. एकदा तर सुरमई जास्त खाल्ल्यामुळे तिला इतक्या उलट्या झाल्या की तिला इस्पितळात दाखल करावे लागले.

अशा प्रकारे प्रसूतीपूर्व काळात ती चार वेळा इस्पितळात दाखल झाली होती. त्यामुळे तेथील सिस्टर तिच्या चांगल्याच परिचयाच्या झाल्या होत्या. कदाचित म्हणूनच त्या दिवशी तिच्या भीतीचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही. परंतु त्या दिवशी स्वराने अनुभवलेला प्रत्येक क्षण मृत्यू आणि जीवन यांच्या सीमेवरचा होता.

देवाच्या कृपेने काही मिनिटांतच तिची गोंडस मुलगी सुरक्षित जन्माला आली. मोठमोठे डोळे उघडून ती जणू या नव्या जगाकडे कुतूहलाने पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

स्वराचा नवरा सर्वप्रथम तिच्याजवळ आला. तिचा हात हातात घेतला, तिची विचारपूस केली आणि मग आपल्या चिमुकलीला पाहण्यासाठी गेला. पुरुषांच्या डोळ्यांत अश्रू क्वचित दिसतात; पण त्या दिवशी त्याच्याही मनात भीती, प्रेम आणि आनंद यांचे वादळ उसळले होते. आई होणे म्हणजे केवळ एका बाळाचा जन्म नव्हे; तो एका स्त्रीचा पुनर्जन्म असतो. प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करून ती नव्याने जन्म घेते. त्या क्षणापासून तिचे आयुष्य केवळ तिचे राहत नाही; ते तिच्या लेकरासाठी जगणारे आयुष्य बनते.

या प्रवासात सासरची माणसे समजून घेणारी, आधार देणारी आणि प्रेमाने सांभाळणारी असतील, तर स्त्री खरोखर भाग्यवान असते. आणि तसे नसले, तरी देव तिच्या अंतःकरणात अशी विलक्षण ताकद निर्माण करतो की ती प्रत्येक संकटाशी दोन हात करून आपल्या लेकराला मोठे करते.

"त्या दिवशी एका चिमुकलीचा जन्म झाला; पण तिच्यासोबत एका आईचाही पुनर्जन्म झाला. आई होणे म्हणजे केवळ बाळाला जन्म देणे नव्हे, तर स्वतःच्या प्रत्येक श्वासात दुसऱ्या जीवाला जपण्याची सुरुवात होय.”.                                                     

आई... ही निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती आहे. तिच्या वेदनांमधूनच एका नव्या जीवनाचा जन्म होतो, आणि त्या वेदनांमधूनच एका स्त्रीचा दुसरा जन्मही.

- सौ. गौरी रोशन वेर्लेकर