आपल्या हातांवरच आपल्या घराची, कुटुंबाची आणि अनेक जबाबदाऱ्यांची धुरा असते. त्यामुळे हातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण सक्षम हात म्हणजेच सक्षम आणि स्वावलंबी आयुष्याची गुरुकिल्ली!

'डॉक्टर, सकाळी उठल्यावर हाताची बोटे आखडल्यासारखी वाटतात...कधी हाताला मुंग्या येतात...कधी चहाचा कपही हातातून निसटतो!' अशा तक्रारी अनेक महिला सहजपणे सांगतात. काहीजणी याकडे “कॅल्शियमची कमतरता असेल”, “जास्त काम केल्यामुळे असे होत असेल” किंवा “वय वाढल्यामुळे हे साहजिक आहे” असे समजून दुर्लक्ष करतात. मात्र, हातातील वेदना, मुंग्या येणे किंवा वस्तू हातातून पडणे ही शरीराची महत्त्वाची चेतावणी असू शकते.
आपले हात हे दैनंदिन जीवनातील सर्वात जास्त वापरले जाणारे अवयव आहेत. स्वयंपाक करणे, भांडी धुणे, कपडे धुणे, शिवणकाम, संगणकावर टायपिंग करणे, मोबाईल वापरणे, मुलांची काळजी घेणे अशा असंख्य कामांसाठी हातांची सतत हालचाल होत असते. त्यामुळे हातांमध्ये होणाऱ्या लक्षणांकडे वेळेत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
ही लक्षणे कोणत्या
आजारांची असू शकतात?
हाताच्या बोटांत मुंग्या येणे किंवा वेदना होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील सर्वात सामान्य कारण म्हणजे कार्पल टनेल सिंड्रोम. मनगटामधून जाणाऱ्या मीडियन नर्व्हवर दाब आल्यामुळे हा त्रास होतो. महिलांमध्ये हा आजार पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळतो.
याशिवाय मानेतील मणक्यांमधील झीज, मधुमेह, संधिवात, थायरॉईडचे विकार, व्हिटॅमिन बी12 ची कमतरता किंवा काही वेळा गर्भधारणेदरम्यान होणारी सूज यामुळेही अशी लक्षणे दिसू शकतात.
कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?
महिलांमध्ये हा त्रास
अधिक का दिसतो?
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मनगट आकाराने अरुंद असल्याने मज्जातंतूवर दाब येण्याची शक्यता जास्त असते. त्याशिवाय गर्भधारणा, रजोनिवृत्तीनंतरचे हार्मोनल बदल, मधुमेह, थायरॉईडचे विकार आणि सतत एकाच प्रकारची हातांची हालचाल करणारी कामे यामुळे हा त्रास वाढू शकतो. दिवसभर घरकाम करणाऱ्या महिलांमध्येही मनगटावर सतत ताण येत असल्याने ही समस्या दिसून येते.
वेळेत उपचार का महत्त्वाचे?
सुरुवातीला केवळ मुंग्या येणे किंवा हलकी वेदना जाणवत असली तरी दुर्लक्ष केल्यास मज्जातंतूवरील दाब वाढू शकतो. परिणामी हाताची पकड कमी होणे, स्नायू कमकुवत होणे आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लक्षणे वारंवार होत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
फिजिओथेरपीची भूमिका
हातातील अनेक समस्या योग्य वेळी सुरू केलेल्या फिजिओथेरपीमुळे नियंत्रणात येऊ शकतात. फिजिओथेरपिस्ट रुग्णाचे सविस्तर मूल्यमापन करून त्रासाचे मूळ कारण शोधतात. त्यानुसार मज्जातंतूवरील ताण कमी करणारे व्यायाम, नर्व्ह ग्लायडिंग एक्सरसाइज, मनगट आणि हाताच्या स्नायूंना बळकट करणारे व्यायाम, योग्य पोश्चरचे मार्गदर्शन तसेच आवश्यक असल्यास स्प्लिंटचा सल्ला दिला जातो. काही रुग्णांमध्ये अल्ट्रासाऊंड, टेन्स, लेसर थेरपी किंवा इतर आधुनिक फिजिओथेरपी उपचारांचाही उपयोग होऊ शकतो.
स्वतःची काळजी कशी घ्याल?
हाताच्या बोटांत मुंग्या येणे, वेदना होणे किंवा वस्तू हातातून पडणे ही “सामान्य” गोष्ट नाही. शरीर आपल्याला वेळेत इशारा देत असते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे हाताची ताकद आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते. योग्य वेळी निदान, आवश्यक तपासण्या, फिजिओथेरपी आणि योग्य उपचार यामुळे बहुतेक रुग्णांना चांगला आराम मिळू शकतो.
आपल्या हातांवरच आपल्या घराची, कुटुंबाची आणि अनेक जबाबदाऱ्यांची धुरा असते. त्यामुळे हातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण सक्षम हात म्हणजेच सक्षम आणि स्वावलंबी आयुष्याची गुरुकिल्ली!
- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर