Home >> ती >> आपल्याला काही विशिष्ट प्रकारची माणसंच का आवडतात?

आपल्याला काही विशिष्ट प्रकारची माणसंच का आवडतात?

आपण फक्त माणसं शोधत नसतो. आपण अशी माणसं शोधत असतो, ज्यांच्यासोबत आपल्या मनाला घरी आल्यासारखं वाटतं.

Story: मनी मानसी |
17th July, 10:05 pm
आपल्याला काही विशिष्ट प्रकारची माणसंच का आवडतात?

माझी एक type आहे.

हे वाक्य आपण सहज बोलून जातो. कोणाला शांत स्वभावाची माणसं आवडतात. कोणाला बिनधास्त बोलणारी. कोणाला सतत काळजी घेणारी माणसं आकर्षित करतात. काहींना हुशार लोक आवडतात, तर काहींना विनोदबुद्धी असलेली माणसं. पण गंमत अशी की, अनेकदा चेहरे बदलतात, नावं बदलतात, नाती बदलतात... तरी आपल्याला आवडणाऱ्या माणसांचा साचा मात्र बदलत नाही.

कधी विचार केलाय का, असं का होतं? हा केवळ योगायोग असतो, की आपल्या मनाने आधीच काही माणसं ओळखीची म्हणून निवडून ठेवलेली असतात? समुपदेशनादरम्यान अनेकदा लोक म्हणतात, “मॅडम, पुन्हा एकदा मी त्याच प्रकारच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला.” काहींना वारंवार भावनिकदृष्ट्या अनुपलब्ध लोक भेटतात. काहींना सतत स्वतःवर अवलंबून राहणारी माणसं आवडतात. काहींना सतत इतरांची काळजी घेण्याची गरज वाटते. बाहेरून पाहिलं तर ही वेगवेगळी नाती वाटतात. पण आतून पाहिलं तर ती अनेकदा त्याच भावनिक पॅटर्नची पुनरावृत्ती असते. म्हणून काही व्यक्ती पहिल्याच भेटीत आपल्या वाटतात, तर काहींशी वर्षानुवर्षे ओळख असूनही जवळीक निर्माण होत नाही.

कार्ल युंग यांच्या मते, आपण फक्त समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित होत नाही तर ती व्यक्ती आपल्या मनात कोणती भावना जागी करते, याकडे आकर्षित होतो. अनेकदा आपण त्यांच्यात आपल्या मनातल्या एखाद्या अपूर्ण प्रतिमेचा शोध घेत असतो.

याला Object Relations Theory आणखी एक महत्त्वाचा संदर्भ देते. लहानपणी प्रेम, सुरक्षितता, कौतुक, नकार, दुर्लक्ष किंवा स्वीकार यांचे जे अनुभव आपल्याला येतात, त्यातून आपल्या मनात नात्यांचे अंतर्गत आराखडे तयार होतात. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला लहानपणी फक्त चांगले गुण मिळाले की कौतुक मिळायचं. नकळत त्याच्या मनात एक समज तयार झाली, मला प्रेम मिळवायचं असेल, तर मला ते सतत स्वतःला सिद्ध करावं लागेल.” मग मोठेपणी अशा व्यक्तीला नकळत अशाच लोकांकडे ओढ वाटू शकते, ज्यांचं प्रेम मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. उलट, ज्या मुलाला लहानपणापासून भावनिक सुरक्षितता, स्वीकारता आणि मन समजून घेणं मिळालं असेल, त्याला नात्यात सतत परीक्षा द्यावी लागत नाही. त्याच्यासाठी जवळीक म्हणजे संघर्ष नव्हे, तर विश्वास असतो.

पण इथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा. परिचित (familiar) आणि योग्य (healthy) हे नेहमी सारखे नसतात.

म्हणजे समजा, एखादी व्यक्ती अशा वातावरणात मोठी झाली जिथे प्रेमाबरोबर सतत टीका, अनिश्चितता किंवा दुर्लक्षही होत असे. मोठेपणी एखादं शांत, स्थिर आणि समंजस नातं तिला सुरुवातीला कंटाळवाणं वाटू शकतं. उलट सतत भावनिक चढ-उतार असलेलं नातं तिला खरं प्रेम वाटू शकतं. कारण तिच्या मनासाठी ते नवीन नसतं, ते परिचित असतं.

काही वेळा आपल्याला जी माणसं आवडतात, ती आपल्यासाठी चांगली असतातच असं नाही. कारण मनाला अनेकदा आनंदापेक्षा परिचय जास्त सुरक्षित वाटतो. म्हणूनच काही लोक वारंवार त्याच प्रकारच्या नात्यांमध्ये अडकतात. व्यक्ती बदलते पण कथा बदलत नाही.

मात्र आयुष्यात कधी तरी काही माणसं भेटतात आणि नकळत तोंडातून शब्द बाहेर पडतात, I've found my tribe.

या वाक्याचा अर्थ फक्त माझ्यासारखे लोक भेटले एवढाच नसतो. त्याचा खरा अर्थ असतो, या लोकांसमोर मला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही. ज्यांच्याशी बोलताना आपण शब्द मोजून वापरत नाही. आपल्या यशाचा त्यांना हेवा वाटणार नाही, अपयशाची ते थट्टा करणार नाही आणि आपल्या शांततेलाही ते समजून घेतील, अशी खात्री वाटते. अशा नात्यांमध्ये आपण अभिनय करत नाही, आपण फक्त असतो.

मानसशास्त्राच्या भाषेत याला psychological safety म्हणतात. अशा नात्यांमध्ये आपण सतत सावध राहत नाही. आपलं बोलणं मोजून करावं लागत नाही. आपण चुकीचं ठरलो तरी नातं तुटेल, अशी भीती वाटत नाही. युंग यांच्या भाषेत सांगायचं तर, अशा लोकांसमोर आपला Persona बाजूला राहतो आणि आपलं खरं व्यक्तिमत्त्व हळूहळू समोर येतं. म्हणून पुढच्या वेळी एखादी व्यक्ती तुम्हाला लगेच आवडली, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, “मला ही व्यक्ती आवडली... की तिच्याबरोबर मला एखादी जुनी, परिचित भावना पुन्हा अनुभवायला मिळाली?” आणि जर आयुष्यात अशी माणसं भेटली, ज्यांच्यासमोर तुम्ही स्वतःसारखे राहू शकता, तर त्यांना जपा.

कारण शेवटी... आपण फक्त माणसं शोधत नसतो. आपण अशी माणसं शोधत असतो, ज्यांच्यासोबत आपल्या मनाला घरी आल्यासारखं वाटतं.

- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४