अतिरिक्त वीज भाराचा दंड पूर्णपणे माफ करा!

पणजीतील पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक कडाडले.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
अतिरिक्त वीज भाराचा दंड पूर्णपणे माफ करा!

पणजी : वीज खात्याने मंजुरीपेक्षा अधिक वीज भार (लोड) वापरल्याच्या कारणावरून ग्राहकांना मोठा दंड ठोठावला आहे. यामुळे या महिन्यात ग्राहकांना नेहमीपेक्षा चौपट अधिक बिले आली आहेत. यावर वीजमंत्र्यांनी हा दंड तीन हप्त्यांत भरण्याची मुभा दिली असल्याचे सांगितले असले, तरी हा दंड पूर्णपणे माफ करण्यात यावा आणि लोड वाढवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना किमान तीन महिन्यांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने (आप) केली आहे. वीजमंत्र्यांनी याविषयी आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक घोषणा केली नाही, तर उद्या त्यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा 'आप'चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी दिला. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वाल्मिकी नाईक यांनी पुढे सांगितले की, वीज ग्राहकांनी जेव्हा नवीन वीज जोडणी घेतली होती, तेव्हा एक ठराविक वीज भार मंजूर करण्यात आला होता. मात्र, गेल्या २० ते २५ वर्षांत परिस्थितीमध्ये नक्कीच बदल झाला आहे. कुटुंबे वाढली, घरातील विद्युत उपकरणे वाढली आणि पर्यायाने वीज भाराचा वापरही वाढला. ग्राहकांनी अतिरिक्त भार वापरल्यामुळे वीज खात्याचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. त्यामुळे असा थेट दंड लावण्यापूर्वी ग्राहकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे होते. खात्याकडून सुरू असलेला हा प्रकार म्हणजे एक प्रकारे जनतेकडून खंडणी वसूल करण्यासारखाच आहे आणि 'आप' याचा तीव्र निषेध करतो.

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत वीज खात्याने अनेक नवीन बदल लागू केले आहेत. यामध्ये ॲनालॉग मीटर्स बदलून डिजिटल वा स्मार्ट मीटर्स बसवणे आणि विविध शुल्कांमध्ये वाढ करणे, यामुळे आधीच वीजबिले वाढून येत आहेत. या कालावधीत खात्याचा महसूल तब्बल ३३ टक्क्यांनी वाढला आहे. मग याच दरम्यान ग्राहकांची संख्याही ३३ टक्क्यांनी वाढली आहे का, याचे स्पष्टीकरण खात्याने जनतेला द्यावे. भाजपचे विकासाचे मॉडेल हे केवळ जनतेची लुबाडणूक करणारे आहे, तर दुसरीकडे 'आप'च्या मॉडेलमुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये जनतेला ३०० युनिट वीज मोफत मिळत आहे. भाजप सरकार केवळ जनतेच्या पैशांचा अपव्यय करत आहे, असा आरोपही नाईक यांनी या वेळी केला.


हेही वाचा