विधानसभा निवडणूक आढावा : जोशुआ डिसोझांची लागणार कसोटी; काँग्रेसमध्ये अनेक दावेदार, अन्य पक्षाच्या नेत्यांकडूनही जोरदार तयारी

गोवन वार्ता
म्हापसा : म्हापसा हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ. स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी दीर्घकाळ या मतदारसंघाचे भाजपकडून प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र जोशुआ डिसोझा हे म्हापशाचे आमदार बनले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापसा मतदारसंघात भाजप, काँग्रेस पक्षाचे नेते, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपचा हा बालेकिल्ला जिंकण्याचे आव्हान विरोधकांसमोर आहे.
विद्यमान आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा हे भाजपतर्फे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, असा भाजप कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आहे. काँग्रेस पक्षातर्फे महिला प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप, सरचिटणीस विजय भिके, जिल्हाध्यक्ष अॅड. शशांक नार्वेकर व माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर इच्छुक आहेत. या चार नेत्यांपैकी कुणा एकाला पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेना उबाठाचे राज्यप्रमुख जितेश कामत हेदेखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) आणि आम आदमी पक्ष या पक्षांच्या नेत्यांचे सध्यातरी म्हापसा मतदारसंघात कार्य दिसत नाही. ऐनवेळी या पक्षांसह इतर राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू होऊ शकते.
भाजपकडून सध्या उमेदवार आणि निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. सध्यातरी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाजप, काँग्रेस आणि सावकार या तिघांचा म्हापशात प्रचार सुरू आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असेच चित्र मतदारसंघात पाहायला मिळाले. मतदारसंघातील आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये मगो विरुद्ध काँग्रेस, तर फक्त २०१२ मध्ये भाजप विरुद्ध मगो असे राजकीय समीकरण दिसून आले. 
सेवानिवृत्त कस्टम अधिकारी मयूर सावकार रिंगणात
यावेळी सेवानिवृत्त कस्टम अधिकारी मयूर सावकार यांनी म्हापशातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रत्यक्ष राजकीय मैदानात उडी घेतली आहे. भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी दावा केला आहे. भाजपने उमेदवारीचा विचार न केल्यास अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार त्यांनी आतापासूनच केला आहे. भाजपच्या काही वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांचे सावकार यांना समर्थन आहे. या निवडणुकीत म्हापशासाठी ‘हिंदू कार्ड’चा हट्ट धरल्यास सावकार यांना भाजपची पसंती मिळू शकेल. स्व. फ्रान्सिस डिसोझा यांच्या आमदारकीपासून जोशुआ डिसोझा यांना विरोध करणारा भाजपचा स्थानिक गट कार्यरत आहे. यावेळी उमेदवारी जाहीर होताना पुन्हा हा गट सक्रिय होतो का, हे पहावे लागेल.
पोटनिवडणूक, विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे जोशुआंचे मनोबल उंचावले
सध्या म्हापसा भाजप म्हणजेच स्व. फ्रान्सिस डिसोझा पिता-पुत्राचा बालेकिल्ला बनला आहे. १९९९ पासून आतापर्यंत मागील २७ वर्षे म्हापसा मतदारसंघावर डिसोझा कुटुंबाचे वर्चस्व आहे. माजी आमदार स्व. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर २०१७ ची पोटनिवडणूक त्यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांनी भाजप उमेदवारीवर जिंकली. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा बाजी मारली. दोन्ही वेळी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांचा त्यांनी पराभव केला. या निवडणुकीनंतर जोशुआ यांनी मतदारसंघावरील आपली पक्कड अधिक घट्ट केली आहे. पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक अशा दोन निवडणुका जिंकल्यामुळे उपसभापती जोशुआ डिसोझा यांचे मनोबल वाढले आहे. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून पक्षाच्या उमेदारीवर त्यांचा दावा आहे. 
काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक
काँग्रेसचे नेते सुधीर कांदोळकर यांचे मतदारसंघातील वर्चस्व खालावले आहे. त्यांचे ‘गॉडफादर’ कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे काँग्रेस उमेदवारीवरून विजयी झाल्यावर पुन्हा भाजपवासी झाले. त्यामुळे कांदोळकर यांची भूमिका गेली चार वर्षे तळ्यात-मळ्यात अशीच होती. आता निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या कार्याला झोकून दिले आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप या माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांच्या सून आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसने एक वर्षाच्या कालावधीत सरकारविरोधी बरेच उपक्रम राबवले आहेत. काँग्रेसचा महिला विभाग मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला आहे. सरचिटणीस विजय भिके हे तरुण वयापासून काँग्रेस पक्षाचे कार्य करत आहेत. २०१७ च्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. जिल्हाध्यक्ष अॅड. शशांक नार्वेकर हे माजी नगरसेवक असून त्यांचे वडील अॅड. सुभाष नार्वेकर काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. म्हापसा गटाध्यक्ष म्हणूनही शशांक नार्वेकर यांनी काँग्रेस पक्षाचे कार्य केले आहे.
आमदार जोशुआ यांच्या जमेच्या बाजू
पाणी, वीज, रस्ते यासारख्या मुलभूत सुविधांवर भर दिला.
पाणी पुरवठ्यासाठी जुन्या वाहिन्यांच्या जागी नवीन जलवाहिनी घातल्या, नवीन जलकुंभ उभारले.
बाजारपेठेसह शहरातील मुख्य वीजवाहिन्या भूमिगत केल्या.
शेळपे-धुळेर येथील बायपास रस्ता, गांधी चौक ते काणका रस्ता पूर्ण केला.
म्हापसा नगरपालिका ग्रंथालय इमारतीचा जीर्णोद्धार केला.
आमदार जोशुआ यांच्या कमकुवत बाजू
म्हापसा मतदारसंघात मागील चार वर्षांत मोठा विकास प्रकल्प उभा राहिलेला नाही.
बार्देश रवींद्र भवनाचा विषय निकाली काढता आलेला नाही.
पालिका प्रशासकीय इमारत प्रकल्प रखडला आहे.
न्यायप्रविष्ट असल्यामुळे पालिकेची नवीन व्यापारी संकुल इमारत पूर्ण होऊनही कार्यरत झालेली नाही.
कचरा व्यवस्थापनाचा आणि प्रशस्त कंदब बसस्थानक, बार्देश सरकारी संकुल, वाहन पार्किंग सुविधा यासारखे प्रकल्प प्रलंबित आहेत.
पालिका प्रशासनातील गचाळ कारभार, बाजारपेठेतील व्यापारीवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही.
१९९४ पर्यंतचे म्हापसा मतदारसंघातील आमदार
१९६३ रघुनाथ टोपले (मगो)
१९६७ गोपाळ मयेकर (मगो)
१९७२ रघुवीर पानकर (मगो)
१९७७ सुरेंद्र सिरसाट (मगो)
१९८० श्यामसुंदर नेवगी (काँग्रेस)
१९८४ चंद्रशेखर दिवकर (मगो)
१८८९ सुरेंद्र सिरसाट (मगो)
१९९४ सुरेंद्र सिरसाट (मगो)
१९९९ पासून विजयी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार (त्यांना मिळालेली मते)
१९९९ : फ्रान्सिस डिसोझा, गोवा राजीव काँग्रेस (५,६०२) वि. वि. गुरुदास नाटेकर, काँग्रेस (४,०२७)
२००२ : फ्रान्सिस डिसोझा, भाजप (८,३७८) वि. वि. आर्मिन ब्रागांझा, काँग्रेस (६,२७१)
२००७ : फ्रान्सिस डिसोझा, भाजप (१०,१०४) वि. वि. सुभाष नार्वेकर, जनता दल एस (३,२५८)
२०१२ : फ्रान्सिस डिसोझा, भाजप (१४,९५५) वि. वि. आशिश शिरोडकर, राष्ट्रवादी काँग्रेस (४,७८६)
२०१७ : फ्रान्सिस डिसोझा, भाजप (१०,९५७) वि. वि. विनोद फडके, मगो (४१२९)
२०१९ (पोटनिवडणूक) : जोशुआ डिसोझा, भाजप (११,१६७) वि. वि. सुधीर कांदोळकर, काँग्रेस (१०,०१६)
२०२२ : जोशुआ डिसोझा, भाजप (१०,१९५) वि. वि. सुधीर कांदोळकर, काँग्रेस (८,५४८)