कृती समितीचा निर्णय १ ऑगस्टपासून पुन्हा राहणार बंद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात १८ ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्याने तिची पुन्हा दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी कला अकादमी १ ऑगस्टपासून पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. सरकारने नियुक्त केलेल्या कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.
कृती समितीचे प्रमुख दामू केंकरे यांनी ही माहिती दिली. आयआयटी मद्रास आणि चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर सभागृहाची दुरुस्ती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. तर खुले नाट्यगृह (ओपन एअर थिएटर) दुरुस्तीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर आयआयटी मद्रासने तपासणी करून अहवाल सादर केला होता. ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना तसेच इतर मिळून १८ ठिकाणी दोष असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश रक्कम कंत्राटदाराला अदा करण्यात आली आहे. आता दुरुस्तीचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात यावा, अशी शिफारस कृती समितीने केली आहे. कला अकादमीची इमारत बंद असली तरी संगीत व इतर प्रशिक्षण वर्ग सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
आयआयटी मद्रासचा तपासणी अहवाल
आयआयटी मद्रासने कला अकादमीची सविस्तर तपासणी करून दुरुस्तीच्या कामातील त्रुटींवर अहवाल सादर केला आहे.
ऑडिटोरियम : ऑडिटोरियमच्या लाकडी फरशीखाली संप टँक असून भरतीच्या वेळी साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी पंप व्यवस्था आहे. मात्र, वॉटरप्रूफिंग योग्य प्रकारे न झाल्याने विद्युत आणि यांत्रिक यंत्रणांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉटरप्रूफिंग आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. तसेच बीम आणि स्तंभांनाही तडे गेल्याचे आढळले आहे.
कॅटवॉक आणि परिसर : फॉल्स सीलिंगमधून पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिने आणि लगतच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. प्लास्टरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
टेरेस : टेरेसवरील वॉटरप्रूफिंगचे काम समाधानकारक झालेले नाही. त्यामुळे पाणी साचून राहते. ड्रेनेज पाईप योग्य प्रकारे फ्लोअर ट्रॅपला जोडलेले नाहीत. वॉटरप्रूफिंग यंत्रणाही कार्यरत नसल्याचे आढळले. परिणामी टेरेसलगतचा स्लॅब खराब होऊ लागला आहे. त्यामुळे संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था नव्याने उभारण्याची आवश्यकता आहे.
ओपन एअर थिएटर : प्रेक्षक बसण्याच्या ठिकाणी पाणी साचण्याची आणि ड्रेनेजची समस्या आहे. वॉटरप्रूफिंग सुधारून ओलाव्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. तसेच शेवाळ आणि बुरशी वाढण्याचे प्रमाणही नियंत्रित करण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्रमुख शिफारसी
थर्मल स्कॅनिंगद्वारे फॉल्स सीलिंग आणि इतर भागांतील ओलाव्याची ठिकाणे शोधून आवश्यक उपाययोजना कराव्यात.
ज्या ठिकाणी तडे गेले आहेत, तेथे गंज तपासणी करून इलेक्ट्रो-केमिकल पद्धतीने दुरुस्ती करावी.
सर्व ड्रेनेज पाईप फ्लोअर ट्रॅपला व्यवस्थित जोडावेत.
टेरेसला पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उतार (स्लोप) द्यावा.