गेल्या १० दिवसांत मुख्यमंत्र्यांचा चौथा दिल्ली दौरा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एनडीए तसेच नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारी दिल्लीला रवाना झाले. गेल्या १० दिवसांतील हा त्यांचा चौथा दिल्ली दौरा आहे. केंद्रातील एनडीए सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बुधवारी बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर गुरुवारी नीती आयोगाची बैठक होणार आहे.
एनडीए आणि नीती आयोगाच्या बैठकीसाठी मी दिल्लीला जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवाना होताना सांगितले. बैठका तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या भेटींसाठी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री वारंवार दिल्ली दौरे करत आहेत. सर्वप्रथम २७ मे रोजी त्यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडवीय आणि बंदरे, नौकावहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
‘घटक राज्य दिन’ कार्यक्रमानंतर ३१ मे रोजी रात्री मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला गेले. त्यावेळी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत चर्चा केली. त्यानंतर ६ जून रोजी त्यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अनुसूचित जमातीच्या (एसटी) राजकीय आरक्षणासंदर्भात चर्चा केली. आता अवघ्या दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला गेले असून एनडीए आणि नीती आयोगाच्या बैठकींना ते उपस्थित राहणार आहेत.