शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ! प्रसादाच्या पेढ्यांवर बुरशी

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
7 hours ago
शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ! प्रसादाच्या पेढ्यांवर बुरशी

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या देशभरातील लाखो भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील शेकडो खासगी दुकानांमध्ये भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाच्या आणि दगडासारख्या कडक पेढ्यांची प्रसाद म्हणून राजरोसपणे विक्री केली जात आहे. या गंभीर प्रकारामुळे साईभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिर्डीत दररोज हजारो, तर वर्षाकाठी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात. बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक जण मंदिर परिसरातील खासगी दुकानांतून पेढ्यांचे बॉक्स खरेदी करतात. मात्र, या पॅक केलेल्या पेढ्यांच्या बॉक्सवर उत्पादन कधी झाले (पॅकेजिंग डेट), ते कधीपर्यंत खाण्यायोग्य आहेत (एक्सपायरी डेट), तसेच हा पेढा नेमका कुठे आणि कोणी तयार केला, याबाबतची कोणतीही कायदेशीर माहिती छापलेली नसते. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक बॉक्समधील पेढ्यांना चक्क बुरशी लागल्याचे आढळून आले असून, काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट साहित्य वापरून हे पेढे बनवले जात आहेत.

प्रसादाच्या नावाखाली सुरू असलेल्या या मोठ्या गैरप्रकाराकडे शिर्डी नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे.भाविकांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकार तातडीने थांबवून दोषी दुकानदारांवर कडक कारवाई कधी होणार?, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा