राजकीय शक्ती नव्हे, फक्त गाजणारी चर्चा

ऑनलाइन चर्चेचा आवाज मोठा असला तरी दिल्लीतील प्रत्यक्ष उपस्थितीने तो उत्साह सिद्ध केला नाही. याचा अर्थ समर्थक नाहीत असे नाही, पण डिजिटल लोकप्रियतेचे राजकीय शक्तीत रूपांतर अद्याप झालेले नाही.

Story: संपादकीय |
07th June, 11:02 pm
राजकीय शक्ती नव्हे, फक्त गाजणारी चर्चा

राजकारणात काही चळवळी प्रचंड गाजावाजा करून जन्म घेतात, पण प्रत्यक्ष जनाधाराच्या कसोटीवर त्यांची ताकद उघडी पडते. सोशल मीडियावर मोठी चर्चा, युट्यूबवरील लाखो व्ह्यूज, व्हॉट्सअॅपवरील संदेशांचा मारा आणि प्रत्यक्ष मैदानातील वास्तव यात मोठी दरी असते. स्वतःला पारंपरिक राजकारणाचा पर्याय म्हणून सादर करणाऱ्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या दिल्ली मेळाव्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. दिल्लीतील मेळाव्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. समर्थकांच्या मते हा मेळावा राष्ट्रीय स्तरावरील राजकीय परिवर्तनाची सुरुवात ठरणार होता, मात्र प्रत्यक्षात उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे दिसून आल्यामुळे या व्यासपीठाच्या वास्तविक ताकदीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजच्या काळात अनेक राजकीय उपक्रम सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय दिसतात. हजारो कमेंट्स, लाखो व्ह्यूज आणि ट्रेंडिंग हॅशटॅग पाहून मोठा जनाधार असल्याचा भास निर्माण होतो. परंतु निवडणूक किंवा सार्वजनिक मेळावा हा खरा परीक्षेचा क्षण असतो. कॉक्रोच जनता पार्टीबाबतही हेच चित्र दिसले. ऑनलाइन चर्चेचा आवाज मोठा असला तरी दिल्लीतील प्रत्यक्ष उपस्थितीने तो उत्साह सिद्ध केला नाही. याचा अर्थ समर्थक नाहीत असे नाही, पण डिजिटल लोकप्रियतेचे राजकीय शक्तीत रूपांतर अद्याप झालेले नाही. या व्यासपीठासमोरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, त्याची वैचारिक दिशा. सत्ताधारी पक्षावर टीका करणे हा राजकारणाचा भाग असतो. विरोधकांवरही टीका करता येते. पण केवळ टीका करून पर्याय निर्माण होत नाही. जनतेला हे जाणून घ्यायचे असते की, पक्षाचे आर्थिक धोरण काय, रोजगार निर्मितीचा आराखडा काय, शिक्षण आणि आरोग्याबाबत भूमिका काय? राष्ट्रीय सुरक्षा, प्रशासकीय व्यवस्था याबाबतही उत्सुकता असते. या प्रश्नांवर स्पष्ट उत्तरे अद्याप समोर आलेली दिसत नाहीत. 'सर्वच पक्ष वाईट आहेत' हा संदेश काही काळ लोकांना आकर्षित करू शकतो, पण दीर्घकालीन राजकीय चळवळ उभारण्यासाठी सकारात्मक कार्यक्रम आवश्यक असतो. सध्या तरी कॉक्रोच जनता पार्टी हा पक्ष आहे, संघटना आहे की केवळ चळवळ आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेतून भारतात आल्यावर दिल्लीत आपल्याला अटक होईल, निषेध मेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही आणि मग असंतोषाचे वादळ निर्माण होईल, हा कॉक्रोच पक्षाच्या नेत्यांचा अंदाज खोटा ठरला. जोपर्यंत एखादी व्यक्ती देशद्रोही सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला अटक करण्याची गरज सरकारला वाटत नाही. मेळावा शांततापूर्ण होणार असेल, तर त्यासाठी तातडीने संमती मिळते. त्यामुळे असंतोष किंवा आंदोलन पसरण्याची शक्यताच मावळली. भारताच्या राजकारणात अनेक चळवळी लोकांच्या संतापातून जन्माला आल्या. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, शेतकरी आंदोलन किंवा विविध प्रादेशिक चळवळी याची उदाहरणे आहेत. पण संतापाचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी संघटन, नेतृत्व आणि धोरणात्मक स्पष्टता आवश्यक असते. कॉक्रोच जनता पार्टीकडे व्यवस्थेविरोधातील नाराजी व्यक्त करणारा वर्ग आहे. बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीबाबत असंतोष असलेले अनेक युवक या चर्चेकडे आकर्षित झाले आहेत. मात्र नाराजी हा पाया असू शकतो; तो पक्ष ठरत नाही.

कोणत्याही राजकीय चळवळीचे भवितव्य नेतृत्वावर अवलंबून असते. नेतृत्व केवळ भाषणांनी सिद्ध होत नाही. ते संकटात, संघटन उभारताना आणि स्थानिक स्तरावर कार्यकर्ते घडवताना सिद्ध होते. दिल्ली मेळाव्याने एक गोष्ट स्पष्ट केली की राष्ट्रीय पक्ष होण्याचा दावा आणि राष्ट्रीय स्तरावरील संघटन उभारणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बूथ स्तरावरील कार्यकर्ते, जिल्हा संरचना, स्थानिक नेते आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क याशिवाय कोणताही राजकीय पर्याय टिकत नाही. कॉक्रोच जनता पार्टी हा उपक्रम काही काळ चर्चेत राहील आणि नंतर इतर अनेक डिजिटल चळवळींप्रमाणे विस्मरणात जाईल. तो कदाचित दबावगट म्हणून कार्य करेल; म्हणजे निवडणूक जिंकण्यापेक्षा मुख्य प्रवाहातील पक्षांवर प्रश्न उपस्थित करण्याचे काम करेल. सर्वात कठीण शक्यता म्हणजे संघटित राजकीय पक्षात रूपांतर होणे. यासाठी स्पष्ट विचारधारा, प्रशिक्षित कार्यकर्ते, स्थानिक नेतृत्व आणि निवडणूक यंत्रणा उभारावी लागेल. दिल्ली मेळावा हा कॉक्रोच जनता पार्टीसाठी यशापेक्षा वास्तवाची जाणीव करून देणारा ठरला आहे. सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि राजकीय ताकद यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. अल्प प्रतिसादाने हा फरक अधोरेखित केला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अस्पष्ट धोरण आणि संघटनात्मक कमकुवतपणा अजूनही कायम आहे. पर्याय बनण्यासाठी घोषणांपेक्षा दिशा, संतापापेक्षा कार्यक्रम आणि डिजिटल चर्चेपेक्षा जनाधार आवश्यक असतो. कॉक्रोच जनता पार्टी या टप्प्यांवर कितपत यशस्वी ठरते, यावरच तिचे भवितव्य अवलंबून असेल. सध्या तरी ती एक गाजणारी चर्चा आहे; स्थिरावलेली राजकीय शक्ती नाही.