अर्जुनाची कृष्णमय विश्वरूप पाहण्याची तीव्र ओढ आणि अकराव्या अध्यायातील शांत-अद्भुत रसांचे मराठी भाषेतील अलौकिक वैभव, याचे एक सुंदर आणि मर्मग्राही दर्शन.

तुझानि माझा एकपणा, कसा कळावा शब्दांना," असे झाले आहे आता तुझे नाव एकदा कानी जरी आले तरी तो भेद दूर पळून जातो. आणि असा जो तू 'पूर्ण परब्रह्म ईश' आहेस तो आज सुदैवाने माझ्या स्वाधीन झाला आहेस. मग आता भेद कुठला? आणि जर भेदच नाही, तर तो सोडायचा कुठे आणि कसा? यावर श्रीकृष्णांना संतोष झाला. त्यांनी अर्जुनाला प्रेमभराने आलिंगन दिले आणि म्हणाले "पार्था, राग मानू नकोस. पण आता तरी तुला माझ्या विभूतींचे ज्ञान झाले ना?"
पार्थ म्हणाला, "हे कृष्णा, मला तुझ्या विभूतींचे ज्ञान झाले की नाही ते तूच ठरव, पण या सगळ्या विश्वात तूच एक भरून राहिला आहेस, हे माझ्या प्रत्ययास आले आहे."
संजय हे सगळे कौतुक धृतराष्ट्राला सांगत होता खरा, पण धृतराष्ट्र त्याला उदासीन दिसला. कृष्ण आणि अर्जुनाचा इतका चांगला संवाद ऐकायला मिळत आहे, ते सद्भाग्य न समजता धृतराष्ट्र दूर लोटतोय हे बघून तो खिन्न झाला. हा फक्त बाह्यत:च नाही, तर आतूनही आंधळा दिसत आहे, असे संजयाच्या मनात आले. पण करणार काय? मूग गिळून गप्प बसावे लागले.
पुढे आता कुंतीपुत्र अर्जुन निरागस भक्तिप्रेमाच्या आधारावर स्वहिताचा मान कसा वाढवेल ते आपण पाहुया. कशी कोण जाणे, पण त्याच्या चित्तामध्ये एक आगळीवेगळीच उत्कंठा उपजली. त्याने विचार केला की हे सगळे विश्व कृष्णमय आहे, असा प्रत्यय आपल्याला स्वतःच्या अंतरी आला आहे खरा, पण तोच प्रत्यय प्रत्यक्ष या डोळ्यांना येऊ शकला तर काय बहार येईल?
"बास बास! हा कृष्ण या दृष्टीला याच रूपात दिसावा, ही एकच उत्कट तळमळ आता या जिवाला लागून राहिली आहे."
खरोखरच त्याचे भाग्य केवढे तरी थोर, म्हणूनच तो कृष्णाचे ते व्यापक, वेल्हाळ, संपूर्ण विश्वरूप आपल्या दोन्ही डोळ्यांना दिसावे अशी उत्कटेच्छा धरू शकला.
एरवीही अर्जुन म्हणजे प्रत्यक्ष कल्पतरूचीच फांदी कशी! त्या फांदीला वांझ फुले येणे शक्यच नाही! पहा ना! त्याच्या मुखातून जी जी इच्छा प्रकट होत होती, ती ती इच्छा प्रत्यक्ष देव खरी करून दाखवत होता! जो केवळ प्रल्हादाच्या बोलासाठी प्रत्यक्ष रौद्ररूप नरसिंह झाला, तोच परमात्मा देव आज पार्थाला सद्गुरु म्हणून लाभला होता. असा तो किरीटधारी कुंतीपुत्र धनुर्धर अर्जुन विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त करण्यास कसा तयार होईल आणि त्यावर त्याचा सखा सद्गुरु कृष्णरूपी प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा त्याला कसा प्रतिसाद देईल ते आता आपण यापुढील अकराव्या अध्यायात पाहूया.
अध्याय अकरावा
अकराव्या अध्यायाची कथा तशी दोन्ही रसांमधे परिपूर्ण आहे, ज्यात पार्थाला विश्वरूपदर्शनाचा योग घडेल. अंत:करणाच्या वृत्तीचे काही कारणाने गद्य वा पद्य काव्याच्या वाचनाने व पाहिलेल्या प्रसंगाने वा चित्राने उद्दीपन होऊन त्या उद्दीपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवाने किंवा अवलोकनाने अनुरूप विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते. तिला साहित्यशास्त्रांत 'रस' म्हणतात. या अनुरूप विचार सुचण्याच्या वा प्रकट होण्याच्या क्रियेत एक प्रकारचा आनंद वाटतो. म्हणून रस म्हणजे गोडी हा अर्थसुद्धा ठीकच आहे. साहित्यशास्त्रात नऊ रस वर्णिलेले आहेत. त्यांची नावे अशी- शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत.
शांतरसाच्या घरी वेगळाच असा अद्भुतरस नावाचा पाहुणा आला. त्या दोघांचा तसेच इतर जे रस पंक्तीला बसले होते, त्यांचाही सत्कार झाला. शांत व अद्भुत हे दोन्ही नवरसांपैकीच आहेत. संसाराची नि:सारता, उपरती, संतस्तुती, सत्समागम इत्यादींच्या वर्णनात हा शांतरस योजला जातो आणि अद्भुत रसाची योजना अर्थातच, त्याच्या अर्थाप्रमाणेच, एखाद्या अत्यंत आश्चर्यकारक व कुणीही कधीही न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या घटनेच्या वर्णनात वापरतात.
वधू-वरांच्या लग्नात त्यांच्याबरोबर जसे वऱ्हाडीसुद्धा वस्त्रे व दागिने घालून मिरवतात, तसेच या मराठीच्या सुखासनात वरील दोन व्यतिरिक्त इतरही रस मिरवले. पण शांत व अद्भुत हे दोन्हीही रस म्हणजे अत्यंत शोभिवंत. डोळ्यांच्या ओंजळीत भरून घ्यावेत असे! पाहणाऱ्याला ते जणू काही 'हरि आणि हर' एकमेकांना प्रेमभराने भेटायला आले असावेत असे दिसण्यासारखे. जणू काही अमावास्येला चंद्र-सूर्याची आकाशातील भेट! जणू काही प्रयागक्षेत्रीचा गंगा-यमुना संगम! तिसरी तिथे होती ती गीता-रूपी गुप्त सरस्वती. म्हणून हा त्रिवेणी संगम. त्यायोगेच हे अखिल विश्व सुस्नात झालेले आहे. अशा त्रिवेणी संगमात प्रवेश करण्यासाठी श्रवणपंथ हा सुलभ म्हणायचा. आणि त्यायोगे सर्वांसाठी हा त्रिवेणी-स्नानाचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून धर्माचे महासागर माझे वंदनीय पूजनीय गुरु श्री निवृत्तिनाथ यांनी माझ्या हाताला धरून माझ्यावर सद्गुरुकृपेचा अनुग्रह केला.
या संगमाभोवती जे संस्कृताचे तट होते ते सद्गुरूंनी तोडले आणि त्या जागी हा मराठीचा अप्रतिम घाट बांधला जेणेकरून आता कोणाही मराठी जाणणाऱ्याने या गीतेच्या त्रिवेणी संगमात आनंदभराने सद्भावाने सु-स्नात व्हावे, पवित्र व्हावे आणि मग (त्याची परिणती म्हणून) त्या विश्वरूप माधवाच्या सन्मुख (या जीवन-मरणरूपी) संसाराला तिळोदक द्यावे. म्हणजे हा संसार अनित्य आहे, असार आहे व म्हणून त्याच्या सुख-दु:खामध्ये स्वतःला गुंतवून घेऊन त्यात वाहवत जाण्यापासून वाचवायला हवे हे मूलतत्त्व समजून घ्यावे. तर एकूण काय, की अशा रीतीने आज मराठी जगताला श्रवणसुखाचे खरे राज्य मिळाले. साहित्यशास्त्रातील सगळे प्रतिष्ठित 'रस' तर तिथे आलेच, पण एवढेच नव्हे, तर तिथे प्रत्यक्ष कैवल्य-निधान म्हणजे मोक्षाचा ठेवा ही प्रकट झाला! नेमके त्यावेळी तिथे परमभक्त कुंतीपुत्र अर्जुनाचे उपस्थित असणे हे त्याचे केवढे तरी थोर भाग्य नव्हे काय? असा 'न भूतो न भविष्यती' योगाचा गीतेचा भावार्थ श्रीसद्गुरुकृपेमुळे आता मराठीत प्रकट होत आहे, अशा प्रसंगी आपण संत-सज्जनांनी पूर्ण अवधान देऊन ते ऐकावे हीच माझी विनंती आहे. (क्रमशः)

मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३