
साहित्य: खेकडे : ४ ते ५ (स्वच्छ धुऊन, मधोमध तुकडे केलेले)
कांदा: २ मोठे (बारीक चिरलेले)
टोमॅटो: ३ मोठे (बारीक चिरलेले)
हिरव्या मिरच्या: ३ ते ४ (उभ्या चिरलेल्या)
आले-लसूण पेस्ट: १ मोठा चमचा
काश्मिरी लाल तिखट: १ ते दीड चमचा
हळद: अर्धा लहान चमचा
गरम मसाला पावडर: अर्धा लहान चमचा
ताजी कोथिंबीर: बारीक चिरलेली
तेल: २ ते ३ मोठे चमचे
मीठ: चवीनुसार
कृती: सर्वप्रथम स्वच्छ केलेल्या खेकड्यांना थोडे मीठ आणि हळद लावून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून द्या. एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान मऊ आणि हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
कांदा परतून झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट घाला आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत १ मिनिट परता. त्यानंतर हळद आणि काश्मिरी लाल तिखट घालून मिक्स करा. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होऊन त्याला कडेने तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्या. टोमॅटो व्यवस्थित शिजणे या रेसिपीसाठी खूप महत्त्वाचे आहे.
मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात मॅरिनेट केलेले खेकडे घाला. मसाल्यामध्ये खेकडे २ ते ३ मिनिटे चांगले परतून घ्या, जेणेकरून मसाला खेकड्यांच्या आतपर्यंत बसेल. यात साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी घाला (तुम्हाला ग्रेव्ही किती दाट हवी आहे त्यानुसार). सोबत चवीनुसार मीठ, गरम मसाला घाला.
कढईवर झाकण ठेवून मध्यम आचेवर खेकडे १० ते १२ मिनिटे चांगले शिजवून घ्या. खेकडे शिजल्यावर त्यांचा रंग बदलून हलका लालसर/नारंगी होतो. ग्रेव्ही छान दाट झाली की गॅस बंद करा आणि वरून भरपूर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर भुरभुरा.
तुमचे गरमागरम, तिखट-आंबट आणि चवदार गोवन स्टाईल क्रॅब्स टोमॅटो चिल्ली तयार आहे! हे तुम्ही गरम भात किंवा गोवन पावासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता.

शिल्पा रामचंद्र, मांद्रे