निरोगी बाळ आणि सुरक्षित गर्भधारणेसाठी केवळ मातेचीच नव्हे, तर पित्याचे आरोग्य आणि जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची असून 'प्रीकॉन्सेप्शन केअर' ही भावी आई-वडिलांची संयुक्त व समान जबाबदारी आहे.

“आता आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे स्वागत करायची वेळ आली आहे,” असे म्हणत तीर्था आणि संकेत यांनी बाळाचा विचार सुरू केला. तीर्थाने लगेच आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतला, आवश्यक तपासण्या केल्या आणि जीवनशैलीत बदल करण्यास सुरुवात केली. मात्र संकेतला वाटत होते की गर्भधारणेशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या स्त्रीच्याच वाट्याला येतात. पण डॉक्टरांकडे भेट दिल्यानंतर त्यांना समजले की निरोगी गर्भधारणा ही केवळ आईच्या आरोग्यावर अवलंबून नसून यासाठी वडिलांचे आरोग्य, सवयी आणि मानसिक तयारीदेखील तितकीच महत्त्वाची असते.
भारतीय समाजात आजही गर्भधारणेची तयारी म्हणजे फक्त महिलांनी घ्यायची काळजी, अशी धारणा आढळते. परंतु वैद्यकीय विज्ञान वेगळीच गोष्ट सांगते. निरोगी गर्भधारणा, गर्भाचा योग्य विकास आणि निरोगी बाळासाठी आई-वडील दोघांचेही आरोग्य महत्त्वाचे असते. म्हणूनच ‘प्रीकॉन्सेप्शन केअर’ अर्थात गर्भधारणेपूर्वीची तयारी हा विषय आज अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
गर्भधारणेपूर्वीची तयारी म्हणजे काय?
गर्भधारणा होण्यापूर्वी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला तयार करणे म्हणजे गर्भधारणेपूर्वीची तयारी. यामध्ये आवश्यक वैद्यकीय तपासण्या, योग्य आहार, जीवनशैलीतील बदल, लसीकरण, मानसिक तयारी आणि काही वाईट सवयींपासून दूर राहणे यांचा समावेश होतो.
तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेचा विचार करणाऱ्या जोडप्यांनी किमान तीन ते सहा महिने आधीपासून तयारी सुरू करावी. यामुळे शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघते आणि संभाव्य आरोग्य समस्या वेळेवर ओळखता येतात.
महिलांनी कोणती काळजी घ्यावी?
१. आरोग्य तपासणी करून घेणे:
गर्भधारणेपूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, अॅनिमिया किंवा इतर आजार असल्यास त्यांचे योग्य नियंत्रण करणे आवश्यक आहे.
२. फॉलिक अॅसिड सुरू करणे
गर्भधारणेच्या किमान एक महिना आधी फॉलिक अॅसिड घेण्यास सुरुवात करावी. यामुळे बाळामध्ये मेंदू व पाठीच्या कण्याच्या जन्मजात विकृतींचा धोका कमी होतो.
३. संतुलित आहार घेणे
प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहार घेणे गरजेचे आहे. ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करावा.
४. योग्य वजन राखणे
अतिरिक्त वजन किंवा कमी वजन यामुळे गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात तसेच गर्भावस्थेत गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.
५. व्यसनांपासून दूर राहणे
धूम्रपान, मद्यपान, तंबाखू किंवा इतर व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. या सवयी गर्भधारणेवर आणि गर्भाच्या विकासावर विपरीत परिणाम करू शकतात.
६. लसीकरण पूर्ण करणे
रुबेला, हेपॅटायटिस बी आणि इतर आवश्यक लसींबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही संसर्ग गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरू शकतात.
७. औषधांची माहिती डॉक्टरांना देणे
नियमितपणे कोणतीही औषधे घेत असल्यास त्याबद्दल डॉक्टरांना माहिती द्यावी. काही औषधे गर्भधारणेपूर्वी बदलण्याची आवश्यकता असू शकते.
८. मानसिक आरोग्याची काळजी घेणे
तणाव, चिंता आणि नैराश्य यांचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. योग, ध्यान, नियमित व्यायाम आणि कुटुंबाचा पाठिंबा मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतो.
९. नियमित शारीरिक हालचाल
दररोज चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर गर्भधारणेसाठी अधिक सक्षम बनते.
वडिलांची तयारी का गरजेची?
‘बाळ आईच्या पोटात वाढते, मग वडिलांच्या आरोग्याचा काय संबंध?’ असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र संशोधनातून असे दिसून आले आहे की पुरुषांच्या आरोग्याचा त्यांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होत असतो.
वडिलांच्या प्रमुख जबाबदाऱ्या
१. स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घेणे:
गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वी पुरुषांनी संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यावी. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, लठ्ठपणा किंवा इतर दीर्घकालीन आजार असल्यास त्यांचे योग्य नियंत्रण आवश्यक आहे.
२. निरोगी जीवनशैली स्वीकारणे
या सवयी शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. तसेच निरोगी जीवनशैलीचा फायदा केवळ गर्भधारणेसाठीच नव्हे, तर पुढील पालकत्वाच्या प्रवासासाठीही होतो.
३. संतुलित आहार घेणे
प्रथिने, फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, ड्रायफ्रूट्स आणि झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई यांसारखे पोषक घटक शुक्राणूंच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.
४. वजन नियंत्रणात ठेवणे
अतिलठ्ठपणा किंवा खूप कमी वजन याचा शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता यावर परिणाम होऊ शकतो.
५. संसर्गांपासून संरक्षण
काही लैंगिक संसर्ग (STIs) प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात. आवश्यक असल्यास तपासण्या करून योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
६. मानसिक आधार देणे
गर्भधारणेची तयारी हा दोघांचाही प्रवास असतो. पत्नीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे, तिच्या डॉक्टर भेटींमध्ये सहभागी होणे आणि भावनिक पाठिंबा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नवीन शुक्राणू तयार होण्यासाठी साधारणतः ७०–९० दिवस लागतात. त्यामुळे गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वी किमान ३ महिने पुरुषांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते.
आई-वडील- तयारी दोघांचीही!!
-जोडप्याची मानसिक आणि भावनिक तयारी:
गर्भधारणा ही फक्त जैविक प्रक्रिया नाही तर तो आयुष्यातील मोठा भावनिक बदलही असतो. बाळाच्या आगमनानंतर आर्थिक जबाबदाऱ्या वाढतात, जीवनशैली बदलते आणि प्राधान्यक्रमही बदलतात. यासाठी जोडप्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. पालकत्वाबद्दलच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि भविष्यातील नियोजन याविषयी चर्चा केल्यास अनेक गैरसमज टाळता येतात.
निरोगी बाळाचा पाया गर्भधारणेपूर्वीच घातला जातो. त्यामुळे गर्भधारणेची तयारी ही केवळ महिलेची जबाबदारी नसून पती-पत्नी दोघांची समान जबाबदारी आहे. बाळाच्या आगमनाची तयारी दोघांनी मिळून केली, तर पालकत्वाचा प्रवास अधिक आनंददायी, सुरक्षित आणि समाधानकारक ठरतो.
लक्षात ठेवा, प्रीकॉन्सेप्शन केअर म्हणजे ‘आईची तयारी’ एवढेच नाही, तर ‘भावी आई-वडिलांची संयुक्त तयारी’ आहे. निरोगी वडील हे निरोगी गर्भधारणा आणि निरोगी बाळासाठी तितकेच महत्त्वाचे असतात.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर