घराला आग लागताच पाळीव कुत्र्याने मध्यरात्री उठवले घरमालकाला, कुटुंबाचा वाचला जीव

तळपवाडा-कुंभारजुवे येथे आगीत दुकानासह घर भस्मसात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th April, 11:02 pm
घराला आग लागताच पाळीव कुत्र्याने मध्यरात्री उठवले घरमालकाला, कुटुंबाचा वाचला जीव

माशेल : तळपवाडा-कुंभारजुवे परिसरात ७ एप्रिलच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले. हमरस्त्यालगत असलेल्या घरवजा भुसारी दुकानाला लागलेल्या या आगीत काही क्षणांतच सर्व भस्मसात झाले. सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झालेल्या या दुर्घटनेत मात्र एका पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेमुळे संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचल्याने ही घटना थरारक आणि तितकीच हळहळ निर्माण करणारी ठरली.

तळपवाडा-कुंभारजुवे येथील कृष्णा (रोहिदास) नाईक यांच्या हमरस्त्यालगत असलेल्या घरवजा भुसारी दुकानाला ७ एप्रिल रोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तळमजल्यावरील दुकान पूर्णतः जळून खाक झाले, तसेच पहिल्या मजल्यावरील त्यांच्या निवासस्थानालाही आग लागून घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले. या घटनेत सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.


या दुर्घटनेत घरातील पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेमुळे संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कुत्र्याने झोपलेल्या खोलीच्या दरवाजावर मोठ्याने पाय आपटत कृष्णा नाईक व त्यांच्या पत्नीला जागे केले. त्यांनी दरवाजा उघडताच घरात आग लागल्याचे लक्षात आले. तत्काळ प्रसंगावधान राखत त्यांनी पत्नी सुविधा यांना जागे केले तसेच समोरील खोलीत झोपलेल्या मुलगी संघवी हिला उठवले. दरम्यान, घरातील दरवाजालाही आग लागलेली असतानाही त्यांनी धाडसाने तो उघडला आणि गॅलरीतून शेजारील भावाच्या घराच्या बाजूने खाली उतरून तिघांनीही जीव वाचवला.

या धावपळीत कृष्णा नाईक यांच्या दोन्ही हाताच्या बोटांना भाजले, तर पत्नी सुविधा या देखील आगीच्या झळांमुळे किरकोळ जखमी झाल्या. त्यांना बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. कृष्णा नाईक यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या ते नातेवाईकांकडे वास्तव्यास आहेत.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी रात्री १.४५ वा. जुने गोवे अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेता कुंडई व फोंडा येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. पहाटे ३ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. पाण्याची कमतरता भासल्याने जवळील विहिरीतून पंपद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता आहे.

घटनेनंतर कुंभारजुवे गावात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. माजी पंच सदस्य प्रशांत भांडारे यांनी ‘कुंभारजुवे आयलंड’ या व्हॉट्सअॅप गटावरून भावनिक आवाहन करत मदतीचे आवाहन केले आहे. आतापर्यंत सुमारे ५० हजार रुपयांची मदत जमा झाली असून, इच्छुक दात्यांनी मदत करायची असेल तर त्यांनी बॅक आॅफ महाराष्ट्र कुंभारजुवे शाखा अकाऊंट नंबर ६०४०७५१०४०२ कृष्णा जनरल स्टोअर यावर मदत करुन त्यांना हातभार लावावा असे आवाहन केले आहे. 

सुमारे १ कोटींचे नुकसान

आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच घरातील सोफा, टीव्ही, कपाटे, दोन रेफ्रिजरेटर, खाट, वॉशिंग मशीन, स्वयंपाकघरातील व बाथरूममधील सर्व साहित्य पूर्णतः नष्ट झाले. दुर्दैवाने घरातील दोन्ही पाळीव कुत्र्यांचा गुदमरून मृत्यू झाला. सुमारे १ कोटीचे नुकसान झाल्याचे जुने गोवे अग्निशमन दलाचे ऑफिस इनचार्ज रोहीदास परब यांनी सांगितले. 




हेही वाचा