इंदूरच्या तरुणाचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे; प्रकरणाच्या फेरतपासणीचे आदेश

पोलीस महासंचालकांचे हणजूण पोलिसांना निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th April, 11:46 pm
इंदूरच्या तरुणाचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे; प्रकरणाच्या फेरतपासणीचे आदेश

म्हापसा : इंदूर (मध्यप्रदेश) येथील २१ वर्षीय ईशान सिंग बडगुजर याचा मृत्यू हा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाल्याचे आता निश्चित झाले आहे. याअनुषंगाने या प्रकरणाची फेरतपासणी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांनी हणजूण पोलिसांना दिले आहेत.

पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी म्हापसाचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख आणि हणजूणचे निरीक्षक सूरज गावस यांना मंगळवारी बोलावून घेतले. नवीन निष्कर्षाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपासाचा पुन्हा आढावा घेऊन बाजूंची पडताळणी करा, असा आदेश दिला.

दरम्यान, युवकाने ड्रग्जचे मिश्रण (कोकटेल) सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणात यापूर्वी चौकशी करण्यात आलेल्या सर्व संबंधितांचे जबाब पुन्हा नोंदवण्यात येणार आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि म्हापसा जिल्हा इस्पितळातील प्राथमिक निष्कर्षांनुसार तरूणाने ड्रग्जचे मिश्रण सेवन केले होते.

मृत तरुण व त्याच्या मित्रांनी हे अमली पदार्थ कुठून मिळवले, तसेच वागातोर-हणजूण किनारपट्टीवर कार्यरत असलेल्या स्थानिक ड्रग्ज तस्करांचा यामध्ये सहभाग होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित नाईट क्लबमधील पार्टीत वापरल्या गेलेल्या अमली पदार्थांचा स्त्रोत शोधण्यावर पोलिसांचा भर आहे.

ही घटना घडली त्या पार्टीदरम्यान तरुण कोसळल्याने त्या ठिकाणच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वैद्यकीय मदत देण्यात विलंब झाला का, याचीही चौकशी सुरू आहे. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार, क्लबच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली होती.

तरुण आपल्या मित्रांसह ‘ब्लॅक कॉफी’ या संगीत कार्यक्रमासाठी गोव्यात आला होता. कार्यक्रम रद्द झाल्यानंतर हा गट वागातोर येथील ‘रईथ’ या नाईट क्लबमध्ये गेला होता. आयोजकांनी कार्यक्रम रद्द झाल्यामुळे नुकसानभरपाई म्हणून ग्राहकांना या क्लबमध्ये मोफत प्रवेश दिला होता. याच ठिकाणी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंतिम न्यायवैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असताना या प्रकरणातून नियमांच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर आल्या आहेत. गोव्यातील नाईट पार्टींमध्ये ड्रग्ज सहज उपलब्ध होत असल्याची बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पुरवठादार, सहकारी किंवा निष्काळजीपणा करणारे यांच्याविरुद्ध ड्रग्ज प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मित्रांची पुन्हा होणार चौकशी

आम्ही प्रतिबंधित वस्तूंच्या स्त्रोताचा शोध घेत आहोत. त्या रात्री मृत युवकासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी फक्त दारूचे सेवन केले होते आणि कोणताही मादक पदार्थ घेतला नव्हता, असा दावा केला होता. मात्र, आता पुन्हा चौकशी केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा