आज उच्च न्यायालयात निवाडा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : फोंडा विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मंगळवारी सायं. ५ वाजता सांगता झाली. गुरुवारी सकाळी ७ ते सायं. ५ पर्यंत एकूण ४५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर, भाजपचे रितेश नाईक आणि आम आदमी पक्षाचे गीतेश नाईक यांच्यात सामना रंगणार आहे. मतदान चुरशीने होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत निवडणूक कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होतील. गावठण-खांडेपार मतदान केंद्रावर सर्वाधिक ८८३, तर कुर्टी येथील मारवेल मतदान केंद्रावर सर्वांत कमी ३६६ मतदार आहेत. जाहीर प्रचाराची सांगता झाल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर राहणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.
पोटनिवडणुकीचे भवितव्य आज उच्च न्यायालयात ठरणार
फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या दोन याचिकांवर बुधवार, ८ रोजी निवाडा देण्यात येणार आहे. प्रीतम हरमलकर आणि अंकिता कामत यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर न्या. वाल्मिकी मिनिझीस आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली. १४ मार्च २०२७ रोजी विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होतो. नवनिर्वाचित सदस्याला एक वर्षाहून कमी कार्यकाळ मिळेल. त्यामुळे पोटनिवडणूकच रद्द करावी, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.