​जीपीएससी आणि बँकींग परीक्षा: यशाची दुहेरी संधी

जीपीएससी आणि बँकींग या दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रित करणे शक्य आहे. केवळ जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाची जोड द्या. गोमंतकीय विद्यार्थ्यांनी या संधीचा सोनं करून बँकींग आणि प्रशासकीय सेवेत आपले नाव उज्ज्वल करावे.

Story: यशस्वी भव: |
14th February, 10:32 pm
​जीपीएससी आणि बँकींग परीक्षा: यशाची दुहेरी संधी

स्पर्धा परीक्षांचे जग हे आव्हानात्मक असले तरी योग्य दिशा आणि नियोजित अभ्यास असेल तर यश नक्कीच मिळते. गोव्यातील अनेक विद्यार्थ्यांचा कल सरकारी नोकरीकडे असतो, परंतु अनेकदा केवळ 'जीपीएससी' (GPSC) कडेच लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्यक्षात, जीपीएससी आणि बँकींग परीक्षांचा अभ्यास हा एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखा आहे. जर तुम्ही एका परीक्षेची प्रामाणिक तयारी केली, तर दुसऱ्या परीक्षेचे दार तुमच्यासाठी आपोआप उघडले जाते.

​अभ्यासक्रमातील साधर्म्य आणि भिन्नता

​जीपीएससी आणि बँकींग (IBPS) परीक्षांचा विचार केल्यास, दोन्हीचा ९०% अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. बँकींग परीक्षेसाठी आवश्यक असणारे 'क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड' (मॅथ्स), 'रिझनिंग अॅबिलिटी' आणि 'इंग्रजी' हेच विषय जीपीएससीच्या पूर्व परीक्षेत (Preliminary/Screening) निर्णायक ठरतात. मात्र, जीपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी थोडा 'यूपीएससी' (UPSC) पॅटर्न वापरावा लागतो, जिथे विश्लेषणात्मक विचार आणि सखोल वाचन महत्त्वाचे असते.

​केवळ पदवी नाही, तर 'ॲप्टिट्यूड' महत्त्वाचा

​स्पर्धा परीक्षा केवळ तुमच्या पुस्तकी ज्ञानाची चाचणी घेत नाहीत, तर तुमच्यातील 'अधिकारी' तपासतात. अधिकाऱ्याला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना ज्या अंगभूत गुणांची गरज असते, त्याची पायाभरणी 'प्रि-स्क्रीनिंग' परीक्षेत केली जाते. यात विद्यार्थ्याचा 'Aptitude' म्हणजेच त्याचा कल आणि बुद्धिमत्ता तपासली जाते.


​१. गणितीय आणि संख्यात्मक क्षमता (Numerical Ability):

केवळ आकडेमोड करणे म्हणजे गणित नव्हे, तर दिलेल्या माहितीचा अचूक अर्थ लावून कमी वेळात अचूक उत्तर काढणे, हे प्रशासकीय कौशल्याचे लक्षण आहे.

​२. तर्कशक्ती (Logical Reasoning):

प्रशासनात काम करताना अनेकदा गुंतागुंतीचे प्रश्न समोर येतात. अशा वेळी विवेकपूर्ण दृष्टीने दिलेले समायोजित उत्तर आणि तार्किक विचार करण्याची पद्धत या विषयातून तपासली जाते.

​३. भाषा प्रभुत्व (English Language):

बँकींग असो वा प्रशासन, पत्रव्यवहार, अहवाल लेखन आणि संवाद यासाठी इंग्रजी भाषेवर पकड असणे अनिवार्य आहे. व्याकरण, शुद्धलेखन आणि उताऱ्यावरील प्रश्नांच्या माध्यमातून ही क्षमता जोखली जाते.

​बँकींग क्षेत्रातील संधी आणि IBPS चे महत्त्व

​'इन्स्टिट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन' (IBPS) मार्फत देशभरातील बँकांसाठी 'प्रोबेशनरी ऑफिसर्स' (PO) आणि लिपिक पदांची भरती केली जाते. बँकींग परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे मानसिक संतुलन, निर्णयक्षमता आणि वैचारिक बैठक कशी आहे, याचा उलगडा होतो. तुम्ही 'प्रॉब्लेम सॉल्व्हर' (समस्या सोडवणारे) आहात की 'प्रॉब्लेम क्रिएटर' (समस्या निर्माण करणारे), हे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून स्पष्ट होते. टेबल्स, ग्राफ्स आणि डेटा इंटरप्रिटेशनचा वापर करून प्रशासकीय कामात अचूकता कशी आणता येईल, हे या परीक्षा शिकवतात.

​गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

​गोव्यातील युवकांनी केवळ स्थानिक नोकऱ्यांच्या मागे न लागता बँकींग क्षेत्रातील देशव्यापी संधींचा फायदा घ्यायला हवा. बँकींगमधील करिअर हे केवळ सुरक्षित नसून ते अत्यंत प्रतिष्ठेचेही आहे.

​यशाचा मंत्र: सराव आणि सातत्य

​स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 'स्मार्ट वर्क' गरजेचे आहे.

​वेळेचे नियोजन: रोज किमान ६-८ तास अभ्यासाचे नियोजन करा.

​मॉक टेस्ट: जास्तीत जास्त सराव परीक्षा द्या, जेणेकरून वेळेचे व्यवस्थापन जमेल.

​अधिकृत माहितीसाठी नेहमी www.ibps.in या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे तुम्हाला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि सविस्तर अभ्यासक्रम मिळेल.


- अॅड. शैलेश कुलकर्णी

कुर्टी - फोंडा

(लेखक नामांकित वकील आणि 

करिअर समुपदेशक आहेत.)