अलीकडेच एक सण साजरा झाला. या सणानिमित्त नदीकाठ, तलाव आणि समुद्रकिनाऱ्यांवर पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी करण्यात आले. मात्र, सण संपल्यानंतर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. काही तासांपूर्वी ज्या जागेची पवित्र मानून पूजा केली होती, त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत होते. जणू सण संपला आणि त्यासोबतच आपली जबाबदारीची जाणीवही संपली!
जत्रा, उत्सव, मेळावे किंवा प्रदर्शनांनंतरही असेच चित्र दिसते. गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या कार्यक्रमांनंतर समुद्रकिनारे आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. मग या जागांची स्वच्छता करण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगार, नगरपालिका किंवा स्वयंसेवकांचीच आहे का?
वैयक्तिक जबाबदारीचा अभाव
ही केवळ प्रशासनाची चूक नाही, तर आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेचाही अभाव आहे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची सवय आपल्यात पुरेशी रुजलेली नाही. विशेष म्हणजे, हे वर्तन शिक्षण किंवा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसते. सर्व स्तरांतील लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो.
रस्ते, पदपथ, मैदाने, तलाव आणि मोकळ्या जागा या कोणाच्याच मालकीच्या नाहीत, असा समज अनेकांचा असतो. प्रत्यक्षात या जागा सर्वांच्याच आहेत. त्या आपल्या घराच्या आवारात नाहीत म्हणून तिथे कचरा टाकण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण टाकलेला कचरा म्हणजे आपली अस्वच्छता दुसऱ्याच्या माथी मारण्यासारखेच आहे.
आपण कचरा का टाकतो?
मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट सियाल्डिनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, एखाद्या ठिकाणची स्वच्छता किंवा अस्वच्छता पाहून माणसाचे वर्तन बदलते. एखादी जागा आधीच अस्वच्छ असेल, तर तिथे कचरा टाकणे चुकीचे नाही, अशी भावना निर्माण होते. याउलट, स्वच्छ जागा पाहून ती स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा मिळते.
म्हणूनच परदेशात कचरा न टाकणारी व्यक्ती आपल्या देशात मात्र सहजपणे कचरा टाकताना दिसते. परदेशात दंडाची भीती असतेच; पण तिथले सामाजिक वातावरणही स्वच्छतेला प्रोत्साहन देणारे असते.
याच संदर्भात 'ब्रोकन विंडोज' ही संकल्पना महत्त्वाची आहे. जेम्स विल्सन आणि जॉर्ज केलिंग यांनी मांडलेल्या या संकल्पनेनुसार, एखाद्या ठिकाणी कचरा, तुटलेल्या काचा किंवा दुर्लक्षित मालमत्ता दिसू लागली की, त्या जागेची कोणालाच काळजी नाही, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अस्वच्छता आणखी वाढते. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकाला वाटते की, कचरा दुसरे कोणी तरी उचलतील. परिणामी कोणीच पुढाकार घेत नाही. आपल्या घराच्या स्वच्छतेची काळजी घेणारे आपण सार्वजनिक जागांच्या बाबतीत मात्र उदासीन राहतो.
स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी
महात्मा गांधींच्या 'स्वच्छता हीच ईश्वरसेवा' या विचाराचे महत्त्व आजही तितकेच आहे. गांधीजींसाठी स्वच्छता हा केवळ आरोग्याचा विषय नव्हता, तर तो नैतिकता, समानता आणि सामाजिक जबाबदारीचा भाग होता. आपल्या आश्रमातील प्रत्येकाने स्वतःच्या परिसराची स्वच्छता स्वतः करावी, असा त्यांचा आग्रह होता.
२०१४ मध्ये सुरू झालेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'तूनही गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, केवळ घोषणा, शपथा, फोटो आणि वर्षातून एकदा स्वच्छता मोहीम राबवून अपेक्षित बदल घडणार नाही. सार्वजनिक स्वच्छता ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणे आवश्यक आहे.
स्वच्छता म्हणजे केवळ झाडू मारणे किंवा कचरा कुंडीत टाकणे नव्हे. ती आपल्या नागरिकत्वाची आणि सामाजिक जाणिवेची कसोटी आहे. प्रत्येक उत्सव किंवा सार्वजनिक कार्यक्रम संपल्यानंतर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, 'आपण हे ठिकाण जसे होते तसेच स्वच्छ ठेवून आलो का, की आणखी अस्वच्छ करून आलो?' या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधले, तर स्वच्छ समाजाच्या निर्मितीची सुरुवात नक्कीच होईल.

डॉ. उबाल्दीना नोरोन्हा, (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)


