तुटलेपण पुन्हा बांधून घेणारी कवयित्री: प्रा. डॉ. शरयू आसोलकर

प्रसिद्ध कवयित्री - समीक्षक प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे अपघाती निधन झाले.त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहणारा हा लेख!

Story: स्मृतिगंध |
21st November, 11:24 pm
तुटलेपण पुन्हा बांधून घेणारी कवयित्री: प्रा. डॉ. शरयू आसोलकर

प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांच्या निधनाने मराठी कवितेच्या प्रवाहातील एक शांत, संयमी तरीही खोल व्यक्त होणारा काव्यस्वर कायमचा थांबला! यामुळे त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्या बदल अनेक वर्ष ऐकून असणाऱ्यांच्याही मनात एक शांत पोकळी निर्माण झाली. कारण शरयूताई अशाच होत्या. मोठा आवाज न करणाऱ्या, पण साध्या बोलण्यातून खोलवर परिणाम करणाऱ्या स्नेहशील!

शरयू आसोलकर यांचं नाव घेतलं की मराठी साहित्यातील जाणकारांना लगेच इंदिरा संत आठवतात. हा केवळ योगायोग नव्हता तर इंदिरा संतांच्या कवितेची संवेदना त्यांच्या कवितेत आहे. इंदिरा संतांची कविता जशी स्त्री मनाच्या आतल्या तगमगीची, तुटलेपणाची आणि तरीही न हारता उभं राहण्याची कविता आहे, तशीच शरयू ताईंची कविताही आहे. त्यांची कविता आक्रस्ताळी नाही, ती ओरडून बोलणारी नाही. ती हळू आवाजात, पण अगदी काळजाला भिडणारी. स्त्रीचं दुःख, तिचं एकटेपण, तिची ओढ, तिची सहनशक्ती आणि तिची मूक प्रतिकाराची ताकद, हे सगळं त्यांच्या कवितेत येते. 'तुटलेपण बांधून घेताना' हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष चर्चेत राहिला. या संग्रहाचं नावच त्यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान सांगतं. आयुष्य आपल्याला अनेकदा तोडतं, पण तुटलेलं सावरून पुन्हा बांधून घेणं, यातच माणसाचं खरं कवित्व असतं. त्यांची कविता याच भूमिकेतून आली होती.

शरयू ताई मितभाषी होत्या. फार बोलत नसत. कार्यक्रमात त्या कधीच पुढे पुढे करत नसत. व्यासपीठावर गेल्यावरही त्यांचं बोलणं मोजकं, नेमकं आणि अर्थपूर्ण असायचं. पण त्यांचा मितभाषीपणा हा अलिप्तपणा नव्हता. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर कायम एक आपलेपणा असायचा. त्यांच्या सहवासात आलेल्या त्यांच्या अनेक मैत्रिणी सांगतात शरयूताईंकडे गेल्यावर आपण परके आहोत असं कधीच वाटलं नाही. त्या विद्यार्थ्यांशीही तशाच वागत. कुडाळ महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून त्या केवळ शिकवत नव्हत्या, तर विद्यार्थ्यांना घडवत होत्या. वर्गात त्यांनी कधी आवाज चढवला नाही, पण त्यांच्या एका शांत वाक्यानेही विद्यार्थ्यांच्या मनात घर केलं. त्यांचं शिकवणं म्हणजे फक्त अभ्यासक्रम शिकवणं नव्हतं, तर साहित्य कसं जगायचं हे शिकवणं होतं.

शरयू आसोलकर या अत्यंत व्यासंगी होत्या. त्यांचं वाचन अफाट होतं. जुनी आणि नवी मराठी कविता, समीक्षा, संत साहित्य, स्त्रीवादी लेखन या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांच्या समीक्षा लेखनातून तो व्यासंग स्पष्ट दिसत मागील काही महिन्यातील मुराळी नियतकालिकामध्ये कादंबरीकार राकेश वानखेडे यांच्या कादंबरीवर त्यांनी लिहिलेला दीर्घ समीक्षा लेख बहुचर्चेत ठरला होता. 'आवानओल' या काव्यसंग्रहावरील 'ओल अनमोल आवानओल' हा त्यांनी संपादित केलेला समीक्षा ग्रंथ हा त्यांच्या उत्तम संपादनाच एक उत्तम उदाहरण आहे. साहित्य अकादमीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या कार्यक्रमात निमंत्रित त्यांना केलं गेलं. एवढा व्यासंग असूनही त्यांनी कधीही स्वतःच्या मोठेपणाची वाच्यता केली नाही. मी किती वाचलंय, मी किती लिहिलंय, मला किती पुरस्कार मिळाले असा 'मी'पणा त्यांच्यात नव्हता.आजच्या काळात जिथे थोडं लिहिलं की लगेच प्रसिद्धीचा हव्यास दिसतो, 'नसलेल्या गुणवत्तेचा फुगवटा फुगवला जातो' अशा काळात शरयू ताईंचा हा गुण अधिकच उठून दिसतो. कवयित्री म्हणून त्यांना मान्यता मिळालीच, पण समीक्षक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता.दुसऱ्यांच्या कवितेवर लिहिताना त्यांनी कधीही द्वेषाने किंवा मत्सराने लिहील नाही.एखाद्या मोठ्या समीक्षकाकडे असतो तसा अहंकार त्यांच्याकडे अजिबात नव्हता. चेहऱ्यावर कायम एक विनम्र भाव, डोळ्यात एक शांत स्नेह, आणि बोलण्यात कायम आदर, हेच त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व होतं. त्या ज्येष्ठ असूनही कनिष्ठांशीही तितक्याच आदराने वागत. एखादा नवखा कवी त्यांना आपली कविता दाखवायला आला तरी त्या तितक्याच आपुलकीने वाचत आणि मार्गदर्शन करत.

आज साहित्यही बाजारू झालं आहे. प्रसिद्धी, पुरस्कार, राजकारण, गटबाजी, यात साहित्य अडकत चाललं आहे. शरयू ताई या सगळ्यापासून जाणीवपूर्वक दूर राहत. त्यांना सोहळ्यापेक्षा साहित्य महत्त्वाचं वाटत होतं. त्या कुठल्याही गटाच्या नव्हत्या. त्या फक्त कवितेच्या होत्या.म्हणून त्या काळात मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या नव्हत्या. उलट मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाविषयी त्यांना कमालीची आस्था होती. कोणती कविता चांगली येतेय, कोणता नवा कवी पुढे येतोय, साहित्य संमेलनात काय चर्चा होते, याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर मराठीतल्या अनेक दिग्गज साहित्यिकांनी, साहित्य परिवारांनी हळहळ व्यक्त केली. कारण त्यांनी कधीच कुणाचं वाईट केलं नव्हतं, कुणाला दुखावलं नव्हतं. तरीही त्यांचा स्वतंत्र साहित्य विचार होता.शरयू ताईंचं जगणं आणि लेखन हे एखाद्या दिव्याप्रमाणे होतं. काही दिवे एकदम मोठे होतात, खूप प्रकाश टाकतात आणि लगेच विझून जातात. शरयू ताईं यांचे लेखन तसे नव्हते.त्यांच लेखन आणि जगण निरंजनातील वातीसारख. शांत, स्थिर, सातत्याने स्थिर प्रकाश देणार.  त्यांनी कधी प्रसिद्धीसाठी लिहिलं नाही. त्यांनी कधी पुरस्कारासाठी लिहिलं नाही. त्यांनी फक्त आतून वाटलं म्हणून लिहिलं. आणि म्हणूनच त्यांचं लेखन टिकणारं झालं. त्यांची कविता आजही वाचली जाते आणि उद्याही वाचली जाईल, कारण ती फॅशनसाठी लिहिलेली नव्हती, तर भावनेसाठी लिहिलेली होती.

शरयू ताईंचा आणखी एक मोठा गुण म्हणजे त्यांची परोपकारी वृत्ती. एखाद्याला मदत केली तर ती त्या व्यक्तीला अजिबात कळू देत नसत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तकं दिली, फी भरायला मदत केली, अनेक गरजू लेखकांना त्यांनी आधार दिला, पण त्याचा कधीच उल्लेख केला नाही. मदत करून त्याचं प्रदर्शन करणं, हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं.त्यांच्यासाठी सेवा म्हणजे जाहिरात नव्हती, तर साधना होती. डाव्या हाताला उजव्या हाताने केलेली मदत कळू नये, या उक्तीप्रमाणे त्या जगल्या. आज त्यांच्या जाण्यानंतर लोक जेव्हा त्यांच्या मदतीच्या आठवणी सांगत आहेत, तेव्हा कळतंय की त्यांनी किती जणांना किती प्रकारे आधार दिला होता.मराठी साहित्याच्या गंभीर प्रवाहात त्यांच्या लेखनाची तितकीच गंभीर दखल घेतली गेली. त्यांना राज्य शासनाच्या केशवसुत पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले. 

काही कविता वाचून संपत नाहीत, त्या मनात मुक्काम करून राहतात. शरयू आसोलकर यांची कविता तशीच आहे. वरवर पाहता त्या खूप साध्या, सरळ, सोप्या वाटतात. छोट्या ओळी, रोजच्या जगण्यातले शब्द, माती, पान, फूल, वारा, पाऊस, पदर, एकांत, सवय यासारखे आपल्या अंगणातले शब्द. पण त्या साधेपणाच्या आत एक प्रचंड मोठी आंतरिक खळबळ दडलेली आहे. त्यांची कविता आवजी नाही. ती अल्पाक्षरी तरी वाचकाला अर्थाच्या डोहात उतरायला लावणारी. ती वाचता वाचता वाचक अंतर्मुख होत स्तब्ध होऊन जातो.त्यांच्या कवितांचा एकत्रित स्वर जर एका शब्दात सांगायचा झाला, तर तो आहे - तुटणं आणि तरीही पुन्हा बांधून घेणं. विविध डायमेन्शनने या कवितेकडे पाहावं लागतं. म्हणूनच ही कविता एखाद्या स्त्रीची नाही, ती  आतून तुटलेल्या प्रत्येक माणसाची आहे. प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी तुटतो. कुणाचं घर तुटतं, कुणाचं नातं तुटतं, कुणाचा विश्वास तुटतो, कुणाचं स्वप्न तुटतं. त्या तुटण्यानंतर माणूस काय करतो, यावर त्याचं जगणं ठरतं. शरयू ताईंची कविता सांगते, तुटल्यानंतरही विखुरलेलं स्वतःला पुन्हा गोळा करता येतं. बोलता बोलता स्वतःला सांधून घेता येतं. मातीतून पुन्हा मुळांना भेटता येतं. पानावर पान मिटताना फुलातून पुन्हा फुलता येतं. त्यांची कविता म्हणजे हार मानण्याची कविता नाही, ती पुन्हा उभं राहण्याची कविता आहे.

या कवितांमधलं दुसरं सूत्र आहे ते एकटेपणाचं आणि सवयीचं. माणूस आयुष्यात अनेक गोष्टींना सरावतो. दुःखाला सरावतो, एकटेपणाला सरावतो, वाट पाहण्याला सरावतो. कधी कधी तर आपण जगतो ते प्रेमाने नाही, तर केवळ सवयीने. हसणं, बोलणं, काम करणं, हे सगळं सवयीने चालतं. आतून मात्र आपण किती रिकामे झालो आहोत, हे कुणालाच कळत नाही. शरयू ताई या रिकामेपणाला अत्यंत नाजूकपणे हाताळतात. त्यांच्या कवितेतलं आभाळ कधीच मनसोक्त बरसत नाही. त्यांच्या कवितेतला स्वर कधीच पूर्ण मोकळा होत नाही. तरीही त्या चार-दोन फिकट फुलं फुलवतातच. म्हणजे परिस्थिती अनुकूल नाही म्हणून जगणं थांबवायचं नाही, हाच त्यांचा संदेश आहे. त्यांचं एकटेपण हे रडगाणं नाही, ते स्वाभिमानाने जगलेलं एकटेपण आहे. त्यांच्या कवितांमधील नात्यांमधल अपूर्णतेपण अंगावर येत. आपल्याला नेहमी दुसऱ्याच्या भाषेत, दुसऱ्याच्या सोयीनुसार स्वतःला सांगावं लागतं. त्यामुळे आपल्या जन्माचाच अनुवाद होतो. आपली ओळखच कधी कधी आपल्याला भुईसपाट करून टाकते. आपण एकमेकांच्या अगदी जवळ असूनही एकमेकांच्या एकांतापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रत्येक माणूस शेवटी आतून एकटा असतो. तरीही आपल्याला कुणीतरी आपलं असावं, ही ओढ संपत नाही. हात रुमालासारखा हाताशी असावा, विझलेल्या उजेडातही एकत्र उतरावं, ही ओढ त्यांच्या कवितांमध्ये वारंवार येते. ही ओढ म्हणजेच माणूसपण आहे.

या कवितांमधली प्रतिमासृष्टीही फार बोलकी आहे. त्या मोठ्या, अवजड, पांडित्यपूर्ण प्रतिमा वापरत नाहीत. त्या माती, मुळं, पानं, कुंपण, वाट, वारा, पाऊस, पदर यातून बोलतात. कारण त्यांना माहिती आहे, माणसाचं दुःख हे आकाशात नसतं, ते जमिनीवर असतं. माणूस मातीतच तुटतो आणि मातीतूनच पुन्हा उगवतो. त्यामुळे त्यांच्या कवितेत मातीला फार महत्त्व आहे. माती म्हणजे केवळ जमीन नाही, ती म्हणजे आपलं मूळ आहे, आपला भूतकाळ आहे, आपलं घर आहे. जेव्हा सगळं तुटतं, तेव्हा माणूस पुन्हा मातीकडे जातो, आणि माती त्याला पुन्हा उभं करते.त्यांच्या कवितेची भाषा पाहिली तर ती अत्यंत मितभाषी, नेमकी आणि पारदर्शक आहे. त्या अनावश्यक शब्द वापरत नाहीत. त्या अनेकदा वाक्य अर्धवट सोडतात, तीन टिंबं देतात. त्या तीन टिंबांमध्ये वाचकाला स्वतःचा अर्थ भरता येतो. त्या सगळं सांगत नाहीत, त्या थोडं सांगून वाचकाला विचार करायला लावतात. त्यांच्या कवितेतला विराम हा शब्दांइतकाच महत्त्वाचा आहे.त्यांच्या सगळ्या कविता एकत्र वाचल्या की एक चित्र उभं राहतं. एक स्त्री, जी तुटली आहे, जी एकटी आहे, जिच्या डोक्यावरचं छत उरलेलं नाही, जिच्या पायाखाली मात्र अजूनही आधार आहे. ती मरणाच्या जवळ जाऊनही घाबरत नाही, तर मरणालाही पदराला बांधून पुढे चालते. ती स्वतःचं दुःख गोंजारत बसत नाही, तर त्या दुःखातूनच पुन्हा फुलण्याचा प्रयत्न करते. तिचं जगणं हे इतकं सरळ, साधं, सोपं असावं अशी तिची इच्छा आहे, पण जगणं कधीच इतकं सोपं नसतं, हेही तिला माहिती आहे. तरीही ती त्या सोपेपणाचा शोध सोडत नाही.

म्हणूनच शरयू आसोलकर यांच्या कविता या केवळ कविता नाहीत, त्या जगण्याची एक पद्धत आहेत. त्या आपल्याला शिकवतात की आयुष्यात कितीही वादळं आली, तरी आपल्याला पुन्हा बांधून घेता येतं. आपलं तुटलेपण हे आपलं अपयश नाही, ते आपल्या जगण्याचा एक भाग आहे. आणि त्या तुटलेपणाला कवटाळूनच आपल्याला पुढे जायचं आहे.आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या या कविता आपल्याला अजूनही सांगत आहेत - तुटलास तरी थांबू नकोस, एकटा असलास तरी हार मानू नकोस, आणि मातीशी नातं तुटू देऊ नकोस. कारण मातीतूनच पुन्हा उगवता येतं, आणि तुटलेपणातूनच पुन्हा फुलता येतं!

     आज शरयू ताई नाहीत. त्यांच्या कविता आहेत, त्यांच समीक्षा लेखन आहे. पण त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणं नाही. मितभाषी पण प्रेमळ, व्यासंगी पण विनम्र, गंभीर पण ओलावा, प्रसिद्ध पण प्रसिद्धीपासून दूर, अशी माणसं फार क्वचित जन्माला येतात.मुंबई-गोवा महामार्गावरील त्या अपघाताने केवळ एका कवयित्रीला नाही, तर मराठी साहित्यातील एका शांत, सात्विक आणि सच्च्या आवाजाला हिरावून घेतलं आहे.


अजय कांडर, ९४०४३९५१५५