गेल्या आठवड्यात गोव्यात चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण समाज हादरला. या घटनांनंतर संताप व्यक्त होणे, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होणे आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. यापूर्वी निर्भया प्रकरणाने संपूर्ण देशाला असाच धक्का दिला होता. अशा घटना घडल्यानंतर काही दिवस समाजात चर्चा होते, निषेध होतो; मात्र हळूहळू बातम्या मागे पडतात. पण या सगळ्यात एक वेदना मात्र कायम राहते. ती म्हणजे अत्याचाराला सामोरे गेलेल्या मुलांच्या आई-वडिलांची.
आपल्या मुलावर काय घडलं, याची कल्पनाही कोणत्याही आई-वडिलांसाठी असह्य असते. मुलाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपण पार पाडू शकलो नाही, ही भावना त्यांना आतून पोखरत राहते. मुलीवर झालेल्या अत्याचाराचे तपशील ऐकताना आईच्या मनावर काय परिणाम होत असेल? पोलिसांची चौकशी, रुग्णालयातील फेऱ्या, प्रसारमाध्यमांचे प्रश्न आणि समाजाच्या नजरा यांचा सामना करणाऱ्या वडिलांची मानसिक अवस्था काय असेल? आजी-आजोबा आणि भावंडांनाही या धक्क्यातून जावे लागते. मात्र या सगळ्यांच्या वेदनांकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
मानसशास्त्रात याला 'दुय्यम मानसिक आघात' (Secondary Traumatic Stress) असे म्हटले जाते. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर झालेल्या गंभीर अत्याचाराची माहिती किंवा अनुभव यामुळे स्वतःच्या मनावर होणारा आघात. अत्याचारग्रस्त मुलांच्या पालकांना याचा सामना करावा लागू शकतो.
अशा घटनेपूर्वी पालकांचे आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू असते. मुलाची शाळा, आजारपण, वाढदिवस किंवा घरातील छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये त्यांचा दिवस जात असतो. मात्र अत्याचाराची माहिती समजताच सगळे चित्र बदलते. त्यानंतर पालक सतत अस्वस्थ राहू लागतात. मुलाला पुन्हा काही होईल का, आपण कुठे चुकलो, आधीच काही संकेत दिसले होते का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत राहतात.
रात्री झोप न लागणे, वारंवार वाईट स्वप्ने पडणे, भीती वाटणे, चिडचिड होणे, सतत त्या घटनेचा विचार करणे, लोकांपासून दूर राहणे किंवा भावनाच व्यक्त न करता येणे, अशी लक्षणे दिसू शकतात. ही पालकांची कमजोरी नसते. घडलेल्या भयंकर प्रसंगाचा अर्थ लावण्याचा आणि त्यातून सावरण्याचा मनाचा तो एक प्रयत्न असतो.
अशा प्रसंगानंतर आई-वडील एकाच पद्धतीने प्रतिक्रिया देतात असे नाही. आईला मुलीसोबत घडलेल्या प्रसंगांची चित्रे सतत डोळ्यांसमोर येऊ शकतात. वडिलांच्या मनात प्रचंड राग निर्माण होऊ शकतो. एखाद्याला सतत बोलावेसे वाटते, तर दुसरा मात्र पूर्णपणे शांत होतो. काही वेळा एकमेकांवर दोष ठेवण्याचीही वेळ येते. आपण मुलाची काळजी घेण्यात कमी पडलो का, असा अपराधीपणाचा विचार पालकांना सतावत राहतो.
पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मुलावर अत्याचार झाला म्हणजे त्याचे आई-वडील दोषी ठरत नाहीत. ज्या गोष्टीची कल्पनाही नव्हती, ती घटना रोखता आली नाही म्हणून पालकांनी स्वतःला दोष देणे योग्य नाही. गुन्हा करणारी व्यक्तीच त्यासाठी जबाबदार असते.
काही वेळा अशा घटनेमुळे पालकांच्या स्वतःच्या जुन्या आठवणीही जाग्या होतात. त्यांच्या आयुष्यात पूर्वी हिंसाचार किंवा अन्य काही वाईट अनुभव आले असतील, तर त्यांचा त्रास पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे ते केवळ सध्याच्या घटनेशीच नव्हे, तर जुन्या जखमांशीही झुंज देत असतात.
अत्याचारग्रस्त मुलाला वैद्यकीय उपचार, योग्य समुपदेशन आणि प्रेमळ वातावरणाची गरज असते. मात्र त्याच वेळी पालकांची मानसिक स्थितीही समजून घेणे आवश्यक आहे. स्वतःच मानसिकदृष्ट्या खचलेले आई-वडील मुलाला धीर देताना अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे मुलासोबत पालकांनाही समुपदेशन मिळणे गरजेचे आहे.
गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने अशा घटनांमध्ये मुलांना वैद्यकीय मदत, मानसशास्त्रीय समुपदेशन आणि उपचार तसेच तपासादरम्यान आवश्यक आधार देण्याचे निर्देश दिले आहेत. हे निश्चितच महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र या मदतीमध्ये पालक आणि मुलाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांचाही समावेश व्हायला हवा.
अशा वेळी समाजानेही संवेदनशील राहणे आवश्यक आहे. पालकांना वारंवार प्रश्न विचारणे, घटनेचे तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यांच्यावर दोषारोप करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, गरज पडल्यास मदतीचा हात देणे आणि त्यांना मानसिक आधार देणे अधिक महत्त्वाचे आहे.
मुलावर झालेला अत्याचार हा केवळ एका व्यक्तीवर झालेला गुन्हा नसतो, तर संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारा प्रसंग असतो. त्यामुळे न्याय मिळवून देण्याबरोबरच या कुटुंबाला पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची ताकद देणेही समाजाचे कर्तव्य आहे. पालकांना केवळ तक्रारदार किंवा साक्षीदार म्हणून न पाहता, या वेदनेतून जाणारे माणूस म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यांना न्याय हवा आहेच; पण त्यासोबत प्रेम, समजूतदारपणा आणि योग्य मानसिक आधारही हवा आहे. कारण मुलाच्या जखमा भरून काढताना आई-वडिलांच्या मनावर झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

डॉ. उबाल्दीना नोरोन्हा, (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)


