‘‘अगं, दरवर्षी नवीन आकाशकंदील लावायचा काय तो चार वर्षे एकच कंदील लावतेस!"
शारदाबाई एवढं बोलून दोन मिनिटे थांबल्या. ज्या कामासाठी आल्या होत्या ते काम करुन त्या आपल्या घरी निघूनही गेल्या. पण त्यांच्या शब्दांनी अंजूच्या मनात मात्र चांगलाच मुक्काम ठोकला होता.
हातातली रंगीत कागदांची घडी तशीच राहिली. बोटांना लागलेला गोंद वाळत आला. पण तिच्या मनात उठलेली खळबळ काही शांत होईना.
अंजूला लहानपणापासूनच कलाकुसरीची आवड. एखादी वस्तू पाहिली की तिच्यातून काहीतरी नवीन निर्माण करण्याची ऊर्मी तिच्या मनात जागी व्हायची. दिवाळी जवळ आली की तिच्या कल्पनाशक्तीला अक्षरशः पंख फुटायचे. कधी बांबूच्या काड्यांचा, कधी रंगीत कागदांचा, कधी लोकरीच्या धाग्यांचा तर कधी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि आकर्षक आकाशकंदील ती तयार करायची.
तिच्या या कल्पनेतून तयार झालेला कंदील म्हणजे केवळ सजावटीची वस्तू नसायची, तर तिच्या कल्पकतेचा, मेहनतीचा आणि कलाप्रेमाचा सुंदर आविष्कार असायचा. विशेष म्हणजे ती प्रत्येक कंदील असा बनवायची की वर्षानुवर्षे तो टिकावा. वापरून झाल्यावर व्यवस्थित ठेवायचा आणि पुढच्या दिवाळीत पुन्हा त्याच उत्साहाने दारात लावायचा. तिच्या मते, एखादी सुंदर कलाकृती एका वर्षापुरतीच का असावी?
पण शारदाबाईंचं गणित वेगळंच होतं. त्यांच्या मते दिवाळी म्हणजे सगळं नवीन हवं. नवीन कपडे, नवीन फराळाची भांडी, नवीन रांगोळीची नक्षी आणि अर्थातच नवीन आकाशकंदील! जुनं काही वापरणं म्हणजे उत्सवाचा उत्साह कमी करणं, अशी त्यांची ठाम समजूत होती.
अंजूला शारदाबाईंच्या या स्वभावाची सवय झाली होती. तिच्या घरातली एखादी वस्तू पाहिली की त्यात काहीतरी उणीव शोधायचीच. कलेचं कौतुक करणं तर दूरच, पण एखाद्या चांगल्या कामातही उणेदुणे काढण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.
अंजूच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. खरंच, आपण दरवर्षी नवीन कंदील करायला हवा का? आपली कला लोकांना आवडत नाही का? की जुन्या गोष्टी जपण्याची आपली सवयच चुकीची आहे?
पूर्वी दिवाळीसाठी केला जाणारा कंदील रंगीत कागद, ओल्या बांबूच्या (वेताच्या) काठ्या, पिठाची चिकट खळ करुन चिकटवला जायचा. त्यामुळे तो कंदील दहा पंधरा दिवसांनी खराबही व्हायचा. त्यामुळे दरवर्षी नवीन कंदील बनवायचा अशी पद्धत रुढ झाली. पण आता मिळणाऱ्या सगळ्या टिकाऊ वस्तूंपासून तयार केलेला कंदील का बरं टाकून द्यायचा... फक्त पद्धत आहे म्हणून का.. अंजूच्या मनात अनेक विचार येत होते.
तेवढ्यात तिची मुलगी धावत आली. "आई, यावर्षी आपण तोच कंदील लावणार ना? माझ्या मैत्रिणींना तो खूप आवडतो. मागच्या वर्षी तर त्यांनी त्याचे फोटोही काढले होते!"
अंजूच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
तिने कंदिलाकडे पाहिलं. चार वर्षांपूर्वी मोठ्या हौसेने तयार केलेला तो कंदील अजूनही तितकाच देखणा होता. त्यातल्या प्रत्येक नक्षीत तिच्या आठवणी होत्या. प्रत्येक रंगामागे तिचा एक विचार होता.
तिला अचानक जाणवलं, आपण एखादी गोष्ट किती वर्षे वापरतो यापेक्षा ती किती प्रेमाने निर्माण केली आहे, हे अधिक महत्त्वाचं आहे. दरवर्षी नवीन वस्तू विकत घेणं म्हणजेच सण साजरा करणं नव्हे. उलट एखादी वस्तू जपणं, टिकवणं आणि पुन्हा पुन्हा आनंदाने वापरणं हाही उत्सवाचाच एक भाग आहे.
तिने ठरवलं, यंदा कंदील तोच राहणार. पण त्याच्या सभोवतीची सजावट मात्र नवीन असणार. जुन्या कलाकृतीला नव्या कल्पनेची जोड देऊन ती पुन्हा एकदा उजळणार होती.
दिवाळीचा दिवस उजाडला. सायंकाळी पणत्या, लायटिंगच्या माळांच्या रोषणाईने घर सजले. अंजूच्या दारात तोच जुना, देखणा कंदील नव्या सजावटीसह झळाळत होता. त्याच्या प्रकाशात अंजूच्या चेहऱ्यावरही समाधानाची एक वेगळीच चमक होती.
शारदाबाई दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अंजूच्या घरी आल्या. हे घे गं फराळाचं ताट आणि तुम्हां सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!!! शारदाबाई अंजूच्या घरात येत म्हणाल्या.
अंजूने फराळाचं ताट परत देईपर्यंत त्यांनी सगळीकडे नजर फिरवली.
"हे घ्या आमच्या घरचा फराळ. बेसनलाडू व चिरोटे दिलेत. तुम्हाला आवडतात म्हणून. मीच बनवलेत घरी बरं का"
"अगं, यंदा तरी नवीन कंदील घेतलास की नाही?" फराळाचं ताट घेत शारदाबाईंनी विचारलंच.
अंजू हसून म्हणाली, "नाही हो! पण दरवर्षी नवा कंदील लावण्यापेक्षा जुन्या कंदिलात नवा आनंद शोधायला काय हरकत आहे? वस्तू टिकवणं ही एक कला आहे आणि ती जपणं हीसुद्धा एक परंपराच आहे!"
शारदाबाई क्षणभर गप्प झाल्या.
अंजूच्या मनात मात्र एक नवा दिवा उजळला होता. कारण तिला आता उमगलं होतं. प्रत्येकाच्या हातात काहीतरी नवीन वैशिष्ट्यपूर्ण वस्तू निर्माण करण्याची कला असते. पण दुसऱ्याच्या कलेचं कौतुक करण्यासाठी मात्र मोठं मन असावं लागतं
आणि हो, कंदील चार वर्षांचा असला तरी त्याचा प्रकाश अजूनही नवा आहे.



