जेव्हा रक्षकच भक्षक बनतो!

मुलांच्या सुरक्षिततेचा विश्वास जेव्हा परिचित आणि अधिकारपदावरील व्यक्तीच भंग करतात, तेव्हा बाललैंगिक अत्याचाराचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. या वास्तवाकडे समाजाने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.

Story: मन गोवेकरांचे |
07th November, 10:28 pm
जेव्हा रक्षकच भक्षक बनतो!

गोव्यात अलीकडे घडलेल्या दोन घटनांनी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या घटनांमध्ये लहान मुलांचे कथित लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे. मात्र, या घटनांना अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब म्हणजे आरोपी हे मुलांच्या विश्वासाच्या आणि सुरक्षिततेच्या वर्तुळातील व्यक्ती होते. एका प्रकरणात कथित आरोपी पोलिसांच्या गणवेशातील होता, तर दुसऱ्या प्रकरणात तो मुलांच्या घर ते शाळा या रोजच्या प्रवासाशी संबंधित होता. या दोन्ही व्यक्ती अशा होत्या, ज्यांच्या आज्ञेचे पालन करणे मुलांना स्वाभाविक वाटू शकते. यातून एक कटू वास्तव समोर येते, ते म्हणजे मुलांसाठी सर्वाधिक धोका अनेकदा अनोळखी व्यक्तींकडून नसून अधिकाराच्या पदावर असलेल्या परिचित प्रौढांकडून असतो.

२०२४ मध्ये भारतात बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांची १ लाख ८७ हजार ७०२ प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी जवळपास ३७ टक्के प्रकरणे बालकांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित होती. यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे पोक्सो कायद्यांतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये ९६.६ टक्के आरोपी हे पीडित मुलांच्या जवळच्या परिचयातील होते. यामध्ये आजी-आजोबा, आई-वडील, नातेवाईक, शेजारी, शिक्षक, वाहनचालक, प्रशिक्षक किंवा कौटुंबिक मित्र अशा व्यक्तींचाही समावेश असू शकतो.

अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला वाटत असले, तरी पूर्वीही हे अत्याचार मोठ्या प्रमाणावर होत असावेत; मात्र सामाजिक प्रतिष्ठा, लज्जा आणि प्रौढ व्यक्तींचे वर्चस्व यांमुळे ते उघडकीस येत नसावेत. आज जागरूकता, कडक कायदे, प्रसारमाध्यमांचे लक्ष आणि पीडितांनी पुढे येण्याचे वाढते धाडस यांमुळे अधिक प्रकरणे नोंदवली जात असण्याची शक्यता आहे. तरीही कुटुंबाची अब्रू, सामाजिक बदनामी आणि सूडाच्या भीतीपोटी अनेक घटना आजही दडपल्या जातात. अनेकदा लहान मुलांना आपल्यासोबत काय घडत आहे, हे समजण्याइतकी जाणीवही झालेली नसते.

अत्याचार करणारा नेहमीच अनोळखी नसतो!

अत्याचार करणारी व्यक्ती नेहमीच एखादी क्रूर, संशयास्पद अनोळखी व्यक्ती असेल असे नाही. ती प्रतिष्ठित, सुशिक्षित, धार्मिक, प्रेमळ किंवा कुटुंबाच्या मदतीला धावून येणारी व्यक्तीही असू शकते. अशा व्यक्ती सुरुवातीला मुलांशी जवळीक निर्माण करतात. भेटवस्तू देणे, विशेष लक्ष देणे, गुपिते सांगणे किंवा इतरांपेक्षा वेगळे वागवणे अशा माध्यमांतून मुलांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर पालकांना काही सांगू नकोस, ते गैरसमज करून घेतील, असे सांगून मुलांना गप्प ठेवले जाते. या प्रक्रियेमुळे मुलांना आपणही या गोष्टीत सहभागी आहोत, अशी चुकीची भावना निर्माण होऊ शकते. प्रत्यक्षात मात्र त्यांची कोणतीही चूक नसते. मुलांचे भावनिक अवलंबित्व, भीती, प्रेमाची गरज आणि लैंगिकतेविषयीचे अपुरे ज्ञान यांचा गैरफायदा घेतला जातो.

न दिसणाऱ्या जखमा

बाललैंगिक अत्याचाराचे परिणाम केवळ शारीरिक नसतात, तर ते मानसिक आणि सामाजिक पातळीवरही खोलवर उमटतात. मुलांमध्ये भीती, चिंता, नैराश्य, अपराधीपणाची भावना, झोपेच्या समस्या, भयानक स्वप्ने आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होऊ शकतो. काही मुले एकलकोंडी होतात, तर काही आक्रमक किंवा गरजेपेक्षा अधिक आज्ञाधारक बनतात. अनेकदा स्वतःलाच दोष देण्याची भावना त्यांच्या मनात घर करते.

या जखमा अनेकदा दिसत नाहीत. मूल शाळेत जाते, हसते, खेळते आणि इतरांसारखेच सामान्य आयुष्य जगताना दिसते; पण मनात वेदनांचा मोठा भार घेऊन वावरत असते. त्यामुळे पीडित मुलांनी इतके दिवस का सांगितले नाही, असा प्रश्न त्यांना विचारणे चुकीचे आहे. फसवणूक करणाऱ्या प्रौढ व्यक्तीचा सामना करण्याची अपेक्षा आपण मुलांकडून कशी करू शकतो? त्याऐवजी मुलांना आपले दुःख मोकळेपणाने सांगता येईल असे सुरक्षित वातावरण मोठ्यांनी का निर्माण केले नाही, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.

संस्कारांच्या नावाखालील बंधने

लहानपणापासून मुलांना मोठ्यांचा आदर करावा, त्यांच्या बोलण्याला विरोध करू नये आणि त्यांना दुखावू नये, असे शिकवले जाते. विशेषतः मुलींना आज्ञाधारक असणे हे चांगल्या संस्कारांचे लक्षण मानले जाते. मात्र, हेच संस्कार अत्याचार करणाऱ्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकतात. मोठ्यांना खूश ठेवण्याची सवय लागलेल्या मुलांना एखादा स्पर्श नाकारणे, भेटवस्तू स्वीकारण्यास नकार देणे किंवा मदत मागणेही असभ्यपणाचे वाटू शकते. आपले म्हणणे मांडल्यास आपल्यालाच रागावले जाईल किंवा कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते.

सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?

मुलांना हे शिकवणे आवश्यक आहे की प्रत्येकाशी दयाळूपणे वागणे म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे नव्हे. सभ्यतेपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची आहे. एखाद्याने दिलेली चॉकलेट नाकारणे, मिठी मारण्यास नकार देणे, नातेवाईकापासून दूर राहणे किंवा मदत मागणे हा मुलांचा अधिकार आहे. यासाठी त्यांना कधीही असभ्य ठरवू नये.

मुलांना त्यांच्या शरीरावर त्यांचाच अधिकार आहे, हे वारंवार समजावून सांगितले पाहिजे. कोणालाही अस्वस्थ वाटेल अशा प्रकारे स्पर्श करण्याचा अधिकार नाही. भीती किंवा लज्जा निर्माण करणारे कोणतेही गुपित विश्वासू प्रौढ व्यक्तीला सांगितले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने विश्वास ठेवला नाही, तर दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याचे धैर्यही मुलांमध्ये निर्माण केले पाहिजे.

मुलांनी अत्याचाराची माहिती दिल्यास मोठ्यांनी संशय, उलटतपासणी किंवा कुटुंबाच्या प्रतिष्ठेची चिंता करण्याऐवजी त्यांच्या संरक्षणाला प्राधान्य द्यावे. प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे.

बाललैंगिक अत्याचाराची लज्जा ही अत्याचार करणाऱ्याची असते, पीडित मुलाची कधीच नाही. प्रत्येक मुलाच्या मनावर हे सत्य ठसवणे, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे. याबाबत शंभर टक्के खात्री असली पाहिजे!


​डॉ. उबाल्दीना नोरोन्हा, (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)