शुभ दीपावली

खरी दिवाळी फक्त दिव्यांचीच नसते. खरी दिवाळी म्हणजे मनातल्या अंधारातही सकारात्मक विचारांचा दिवा पेटवणं.

Story: स्टेथोस्कोप |
07th November, 09:34 pm
शुभ दीपावली

पहाटेच्या हवेतला गारवा जरा जास्तच जाणवू लागला, पण उटण्याचा सुगंधही आज त्या गारव्यात जणू काही मी मी म्हणत होता. पहाटे रेडिओवर सुरू झालेलं दिवाळी पहाटेचं कीर्तन पूर्ण घरभर चैतन्याची भर घालत होतं. दवाची मलई गार वाऱ्याची अंगाला जाणीव करून देत असली तरी मंद तेवणाऱ्या पणत्या अंगणभर ऊब देत होत्या. गावाकडची दिवाळी म्हटलं की हे चित्र आमच्या घरात पाहायला मिळतं. दिवाळीच्या फराळाची आईची लगबग, त्यात प्रत्येकाच्या अभ्यंगस्नानाची गडबड, अंगणात तुळशीसमोर येऊन करिट फोडून गोविंदा गोविंदा म्हणून नरकासुरावरचा कृष्णाचा विजयोत्सव साजरा करून आईच्या फराळाची वाट पाहत बसलो असताना माझ्या मोबाईलची रिंग वाजली. ओळखीच्या नावामुळे मी तो फोन घेतला.

“दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर!” पलीकडून आवाज आला.

“वाटलंही नव्हतं अशी सुखाची दिवाळी आज पाहता येतेय हो डॉक्टर...”

त्याच्या आनंदाच्या लहरी त्याच्या आवाजातून माझ्यापर्यंत पोहोचत होत्या आणि मी मनाने परवाच्या संध्याकाळच्या हॉस्पिटलमधल्या त्या प्रसंगात पोहोचलो...

दिवाळी जवळ येत होती. आम्हा RMOना दहा दिवसांची सुट्टी मंजूर झाली होती. आता फक्त गावची ओढ लागली होती. घरच्या मंडळींनी फोनवर सांगितलं होतं, “येणं लांबवू नकोस. यंदा आपण सगळे एकत्र आहोत.” मनात एक वेगळाच आनंद होता.

इतक्यात आमच्या हॉस्पिटलच्या मॅडम म्हणाल्या, “डॉक्टर, जनरल वॉर्डमधल्या काकांना भेटून या जरा.”

मी थोडं थबकलो. “मॅडम, माझी गावी जायची वेळ झाली आहे. दहा दिवस नसणार मी.” पण त्यांनी पुन्हा म्हटलं, “जाऊन या हो जरा त्यांच्याजवळ.”

घाईघाईत वॉर्डात गेलो. शेवटचा बेड. मॉनिटरचा बीप-बीप चालू होता. हाय-फ्लो ऑक्सिजन. काकांचे डोळे एकदम शांत. जणू काही आतला सगळा संघर्ष थांबला होता. बाजूला तीस वर्षांचा मुलगा आणि त्याची पत्नी उभे होते. मुलाच्या चेहऱ्यावर थकवा आणि भीती एकत्र दिसत होती.

“काय झालं?” मी विचारलं.

मुलगा डोळ्यात पाणी घेऊन बोलला, “सर... चार दिवसांनी दिवाळी आहे. डॉक्टर म्हणाले बाबा बरे होणार नाहीत, घरी घेऊन जा. पण बाबा थोडे अर्धे शुद्धीत आणि अर्धे बेशुद्धीत अशी अवस्था आहे. मी नवीन घर घेतलं हो, बाबांची इच्छा पूर्ण केली. त्यांना नेहमी म्हणायचो ‘एकदा आपलं घर होऊ दे, मग आपण दिवाळी एकत्र साजरी करू.’ ते स्वप्न आता पूर्ण झालं होतं. सगळे खुश होतो... आणि हा प्रसंग समोर आला. आता सांगा सर...काय करू?”

त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली. हे सगळं बोलणं काकांच्या समोरच होत होतं. मॉनिटरचा बीप चालू असतानाही त्यांचे कान कदाचित ऐकत होते. मनाला एक धक्काच बसला!

मी मुलाला हळूच बाजूला घेतलं. “तू काही बोलू नको. मी जे बोलतो त्याला फक्त हो किंवा नाही म्हण. समजलं?”

पुन्हा बेडजवळ गेलो. मुलाला उद्देशून, पण काकांना ऐकू जाईल असं बोलू लागलो, “अहो, इथे एक पेशंट होते. तुमच्या बाबांसारखेच. औषध दिलं... बरे झाले. आणखी एक काकू होत्या. त्यांचाही तोच आजार. त्याही बऱ्या झाल्या. आपण उपचार करायला हवेत. का बरे होणार नाहीत तुमचे बाबा? होणार... नक्की होणार.”

मी बोलत होतो... जवळजवळ अर्धा तास आम्ही अशा सकारात्मक गप्पा मारत होतो. आणि काकांनी हळूहळू डोळे उघडले. माझ्याकडे पाहू लागले. आता त्या नजरेत भीती नव्हती. फक्त एक प्रश्न होता, “मी जगू शकतो का?”

मी त्यांच्या हातावर हात ठेवला. “आपण उपचार करू शकतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये छान छान डॉक्टर आहेत. तुम्ही नक्की बरे होणार बघा काका...होणारच!!!” काकांचा चेहरा थोडा हसतमुख दिसला; अगदी त्या ऑक्सिजनच्या मास्कमधूनसुद्धा.

त्यांच्या सोबतच्या माणसांचे चेहरे थोडेसे उजळले. मुलाच्या डोळ्यात पाणी होतं, पण आता थोडी आशाही होती.

बाजूला जात असताना मुलगा मागे आला. आवाज थरथरला होता. “सर... बाबांनी स्वतःहून कसे डोळे उघडले?”

मी म्हणालो, “तुम्ही त्यांच्या समोरच मरणाच्या गोष्टी बोलत होतात. विलपॉवर कशी राहील? पेशंटला जगण्याची उर्मी द्यायला हवी. सकारात्मक विचार राहिले तर उपचाराला थोडा तरी प्रतिसाद मिळतो. भीती आणि निराशा कधी कधी औषधापेक्षा जास्त घातक ठरते.”

काकांनी त्यानंतर उपचाराला प्रतिसाद दिला. हळूहळू सुधारणा होत गेली. आणि त्या दिवाळीला... मुलांसोबत त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरी दिवे उजळले. नवीन घराच्या अंगणात रांगोळी रंगली. काकांनी स्वतःच्या हातांनी एक छोटासा दिवा पेटवला.

खरी दिवाळी फक्त दिव्यांचीच नसते. खरी दिवाळी म्हणजे मनातल्या अंधारातही सकारात्मक विचारांचा दिवा पेटवणं. कारण कधी कधी... एक छोटीशी आशा, एक सकारात्मक वाक्य... आयुष्य फिरवून टाकते.

या दिवाळीला सगळ्यांना सुखाची, आनंदाची आणि सकारात्मक विचारांची दिवाळी जावो. कारण प्रकाशाची खरी गरज बाहेर नाही... आत असते.

शुभ दीपावली!