र्निंग वॉकच्या पहिल्या भागात आपण भेटलो काही भन्नाट नमुन्यांना. पण मंडळी, हा वॉकचा रस्ता इतक्यांवरच संपत नाही! अजूनही काही अवलिया आहेत, ज्यांच्याशिवाय मॉर्निंग वॉकचं चित्र पूर्णच होऊ शकत नाही. कुणी प्रेमाच्या गप्पांत रमलेलं, कुणी कुत्र्याच्या तालावर चालणारं, तर कुणी चहाच्या कटिंगवर देशाचं भविष्य ठरवणारं! चला तर मग, मॉर्निंग वॉकच्या उरलेल्या या रंगीबेरंगी नमुन्यांचीही भेट घेऊया!
६. प्रेमी जोडपे : ही जोडपी मॉर्निंग वॉकला येतात की लग्नाआधीच्या फोटोशूटची रिहर्सल करतात, हेच कळत नाही. हातात हात, चेहऱ्यावर प्रेम, कपड्यांमध्ये मॅचिंग आणि जगाशी काहीही देणंघेणं नसल्याचा आत्मविश्वास! एकमेकांकडे पाहण्याची तळमळ एवढी की समोरून येणाऱ्या माणसाला स्वतःचा रस्ता बदलावा लागतो. व्यायामासाठी किती वेळ दिला, यापेक्षा एकमेकांच्या नजरेत किती वेळ राहता आलं, याला जास्त महत्त्व असतं. प्रेमात असताना जगात फक्त दोघंच असतात; बाकीचे लोक म्हणजे त्यांच्या प्रेमकथेतील अनावश्यक एक्स्ट्रा कलाकार! मांजर दूध पितेवेळी समजते की त्याला कुणी बघत नाही अशी त्यांची परिस्थिती असते. या प्रेमकथेचा सर्वांत सुंदर भाग म्हणजे लग्नानंतरचा बदल! एकेकाळी “तुझ्यासोबत चालताना वेळ कसा जातो, कळतच नाही,” म्हणणारे पुढे “किती वेळ लावतेस तयार व्हायला?” असं विचारतात. प्रेमात असताना “तुझ्याशिवाय जगू शकत नाही,” म्हणणारे लग्नानंतर “पाच मिनिटं शांत बसू दे!” अशी विनंती करतात. ज्या हातात हात घालून चालायचे, त्याच हातात पुढे भाजीच्या पिशव्या आणि किराण्याची यादी येते. रोमँटिक मॉर्निंग वॉकची जागा “दूध आणलं का?” या प्रश्नाने घेतलेली असते. प्रेम संपतं असं नाही; फक्त त्याची भाषा बदलते. लिपस्टिकच्या जागी लिप बाम आणि प्रेमपत्रांच्या जागी वीजबिलं येतात.
७. कॉर्पोरेट दादा : शरीर ट्रॅकवर, मेंदू अजून ऑफिसमध्ये!
यांच्या शरीराने मॉर्निंग वॉकला हजेरी लावलेली असते; पण मेंदू अजूनही ऑफिसच्या सर्व्हरवर लॉगिन असतो. जसा जेठालाल घरी असूनही दुकानाच्या चिंतेत असतो, अगदी तसंच! लिंक्डइन, ई-मेल, मीटिंग आणि डेडलाइन यांच्या जाळ्यात अडकलेले हे लोक चालतानाही फोनवर बोलत असतात. संभाषणात प्रत्येक दुसरं वाक्य - “We should work on this idea.” साधा सूर्य उगवला तरी यांना वाटतं, नवीन प्रोजेक्टची डेडलाइन जवळ आली असावी! यांची शरीररचना साधारण एकाच साच्यातून तयार झालेली असते. वय कोणतंही असो, चेहऱ्यावर ऑफिसचा ताण, सुटलेले पोट आणि डोक्यावर केसांच्या भवितव्याबद्दलची अनिश्चितता! चेहऱ्यावर रोज बारा वाजलेले असतात, पण फोनवर आवाज असा की जगाची अर्थव्यवस्था यांच्याच एका निर्णयावर अवलंबून आहे. जीवनाच्या धावपळीत पोट यांच्यापेक्षाही कधी पुढे जाते हेच त्यांना समजत नाही. यांना वॉकमध्ये फोन आला नाही, तर अस्वस्थ वाटतं. फोन आला, तर महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचा आनंद होतो. आपल्याशिवाय कंपनीचे पान हलत नाही, असा यांचा ठाम समज असतो. प्रत्यक्षात हे दोन दिवस रजेवर गेले की टीम नवीन मीटिंग घेते, कामाची विभागणी करते आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या अनुपस्थितीतच सगळं सुरळीत चालू होतं. हे चालताना फिटनेसपेक्षा बिझनेसवर चर्चा करतात. मॉर्निंग वॉकमधूनही एखादा क्लायंट, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी डील मिळाली तरच दिवस सत्कारणी लागल्यासारखं वाटतं.
८. मालक माणूस, निर्णय कुत्र्याचा!
माणसाने माणसाला किती स्वातंत्र्य द्यावं, यावर भाषण देणारा हा वर्ग स्वतःच्या चालण्याचं स्वातंत्र्यही कुत्र्याच्या हातात देतो. या लोकांचं आयुष्य कुत्र्याभोवती फिरतं आणि कुत्री मात्र त्यांना फिरवतात. कुठे थांबायचं, कुठे वळायचं, किती वेळ घ्यायचा आणि कोणत्या झाडाजवळ किती वेळ घालवायचा या सगळ्या निर्णयांचा अधिकार कुत्र्याकडे असतो. मालकाचं काम फक्त दोरी धरून कुत्र्याची गुणवत्ता समजावून सांगणं! “माझा कुत्रा चावा घेत नाही,” हे वाक्य यांच्या तोंडात कायम तयार असतं. “Come”, “Sit”, “No”, “Take” हे इंग्रजी शब्द कुत्र्यासाठी वापरले जातात; पण प्रत्यक्षात मालकाचं स्वतःचं आयुष्यही याच चार शब्दांच्या आदेशावर चालत असतं. कुत्र्याचं कौतुक ते कधी कधी स्वतःच्या बायकोपेक्षाही जास्त करतात. कुत्र्याने नीट चाललं, तर त्याची बुद्धिमत्ता; शांत बसलं, तर त्याचा स्वभाव; एखाद्याच्या अंगावर भुंकलं, तर त्याची सुरक्षा व्यवस्था! दोष शोधायचा झाला, तर कुत्र्याऐवजी समोरच्या माणसातच शोधला जातो. दोरी मालकाच्या हातात जरी असली; पण यांचा रिमोट कंट्रोल कुत्र्याकडे असतो!
९. वेळघालवे
या लोकांचा वॉक आणि व्यायामाशी काहीही संबंध नसतो. त्यांना फक्त बाहेर पडून कोण कोणाला भेटतं, कोण कुणाशी बोलतं, कोणाच्या अंगावर कोणते कपडे आहेत आणि कोण किती बदललंय, हे पाहायचं असतं. हे स्वतः चालण्यापेक्षा दुसऱ्यांना चालताना पाहण्यात जास्त रस घेतात. कुणी एकटं चालत असेल, तर त्याच्या आयुष्यात काहीतरी समस्या असणार. कुणी जोडीदारासोबत चालत असेल, तर काहीतरी नवीन सुरू असणार. कुणी कुणाशी बोललं नाही, तर नक्की भांडण झालेलं असणार! म्हणजे पुरावा शून्य, निष्कर्ष शंभर टक्के! यांच्या आयुष्यात स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ नसतो; कारण दुसऱ्यांच्या आयुष्याचं लेखापरीक्षण करणं हेच त्यांचं पूर्णवेळ काम असतं. कुणाचं वजन कमी झालं, तर काहीतरी आजार असेल; वाढलं, तर आळशीपणा. कुणी महागडे शूज घातले, तर दिखावा; साधे शूज घातले, तर परिस्थिती बेताची. दुसऱ्याने काहीही केलं, तरी निकाल आधीच तयार असतो. फक्त परिस्थितीनुसार आरोपांची भाषा बदलते. कुणी नवीन घर घेतलं, तर पैशांचा स्रोत तपासायचा. कुणी परदेशात गेलं, तर खर्चाचा हिशेब विचारायचा. कुणी पदोन्नती मिळवली, तर ओळखीचा संशय घ्यायचा. आणि कुणी अपयशी ठरलं, तर “आम्ही आधीच सांगितलं होतं,” असं म्हणत स्वतःच्या दूरदृष्टीचा पुरस्कार स्वीकारायचा. घरी गेल्यावर मात्र स्टेटस झळकतं - “Life is too short to waste time on others.”
१०. उद्यापासून :
डॉक्टर सांगतो, बायको सांगते, मित्र सांगतो, शरीर इशारे देतं; पण या कॅटेगरीतील माणसं एकच उत्तर देतात - “उद्यापासून नक्की!” डॉक्टर औषध देताना चालण्याचा सल्ला देतो. बायको पहाटेचा अलार्म लावून नवऱ्याला उठवते आणि स्वतः पुन्हा झोपते. मित्र फिटनेसचं रहस्य सांगताना पंचेचाळीस मिनिटं चालण्यावर प्रवचन देतो. या सगळ्यामुळे माणूस मानसिकदृष्ट्या इतका फिट होतो की प्रत्यक्ष चालण्याची गरजच उरत नाही! सकाळी अलार्म वाजला की मन म्हणतं, “आज शेवटची विश्रांती घेऊ. उद्यापासून पक्कं!” अलार्म बंद होतो, माणूस पुन्हा झोपतो आणि फिटनेसचा नवा अध्याय उद्याच्या प्रतीक्षेत जातो. यांच्या आयुष्यात ‘उद्या’ हा एक काल्पनिक दिवस आहे, जो कॅलेंडरवर कधीच येत नाही. वर्षभरात शेकडो वेळा सुरुवात होते; पण प्रत्यक्ष सुरुवात मात्र एकदाही होत नाही. नवीन बूट विकत घेतले जातात, ट्रॅकसूट आणला जातो, स्मार्टवॉच घेतलं जातं आणि फिटनेससंबंधी व्हिडिओ पाहिले जातात. फक्त चालायला जायचं बाकी राहतं! आणि विशेष म्हणजे, प्रत्येक वेळी नवी सबब तयार असते. कधी पाऊस, कधी थंडी, कधी उशिरा झोप लागलेली, कधी डोकं दुखतंय, तर कधी शरीराला विश्रांतीची गरज आहे. समस्या एवढीच की उद्या कधी आलाच, तर तो पुन्हा आज होतो आणि आज पुन्हा उद्याच्या हवाली केलं जातं!
११. चहा-तळी आणि राजकीय पंडित : देश वाचवणारे कटिंगवीर!
या कॅटेगरीतील लोक मॉर्निंग वॉकला येतात ते फक्त दोन पवित्र उद्देशांसाठी -कटिंग चहा आणि राजकारण! रस्त्याकडच्या टपरीवर चहाचा प्याला हातात धरून देशाचा पंतप्रधान कसा असावा, महागाई कशी वाढली आहे, अर्थव्यवस्था कशी सुधारली पाहिजे आणि विरोधकांनी काय करायला हवं होतं, यावर यांची अफाट चर्चा रंगते. यांच्याकडे देशातील प्रत्येक समस्येवर चहा पिता-पिता चोख उपाय तयार असतो. पाच मिनिटांत बेरोजगारी संपते, दहा मिनिटांत महागाई नियंत्रणात येते आणि दुसऱ्या कपापर्यंत देश महासत्ता बनतो! प्रत्यक्ष आयुष्यात यांनी स्वतःच्या घराचा नळ सुद्धा नीट बसवलेला नसतो; पण अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारली पाहिजे, यावर अर्धा तास भाषण करू शकतात. जगातील प्रत्येक देशाच्या राजकारणावर यांचं मत असतं. कोणत्या नेत्याने काय बोलायला हवं होतं, कोणत्या धोरणात काय बदल करायला हवा होता आणि कोणत्या देशाने कोणाशी मैत्री करायला हवी होती याचं संपूर्ण ज्ञान यांच्याकडे असतं. यांची खासियत म्हणजे पुरावा नसेल, तरी आत्मविश्वास भरपूर. आकडेवारी माहीत नसेल, तरी निष्कर्ष ठाम. बातमी अर्धवट ऐकलेली असली, तरी विश्लेषण पूर्ण! आणि समोरच्याने विरोध केला, तर “तुम्हाला राजकारण कळत नाही,” हा अंतिम निकाल. या मंडळींच्या मते देशात बदल घडवण्यासाठी क्रांती आवश्यक आहे; पण पायाखाली रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा उचलण्याची जबाबदारी फक्त महानगरपालिकेचीच! त्यांना वाटते क्रांती दुसऱ्यांनी करावी, स्वतः मात्र त्यांना समाजाची भिती वाटते.
बाकी, तुम्ही मॉर्निंग वॉकला कोणत्या कॅटेगरीतले आहात, हे तुम्हीच ठरवा. दोना पावला ते बांबोळी येथे चालणारे लोक मागील अनेक वर्षे जसे होते तसेच आहेत. त्यांच्यावर काहीच परिणाम कसा नाही झाला काय माहीत. मॉर्निंग वॉक म्हणजे आरोग्याची काळजी घेण्याची संधी कमी आणि समाजातील अतरंगी नमुन्यांचं दर्शन घेण्याची पर्वणीच जास्त! एखादी सुंदर मुलगी वॉकला यायला लागली की तिच्या मागे अनेक मुलांचे आरोग्य आपोआप सुधरते. उद्यापासून वॉकला जायचं ठरवलं असेल, तर अलार्म लावाच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या सबबींना सायलेंट मोडवर टाका. कारण वजन वाढण्यापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे स्वतःच्या आळसाला रोज नवं तत्त्वज्ञान देत राहणं! आणखी एक महत्त्वाची गोष्ट - मॉर्निंग वॉकला जरा लवकरच जा. कारण रामदेव बाबांची भक्तमंडळी योग, कपालभाती आणि प्राणायाम करून सगळा ऑक्सिजन सकाळीच संपवतात म्हणे. चला तर, तुमच्या आतल्या रावणाला नव्हे, तर कुंभकर्णाला मारा व मॉर्निंग वॉकला जा, नाही तर पोटाचा विचार सुटला की मग सुटलेल्या पोटाचा विचार करायला पडणार..!

आदित्य सिनाय भांगी, पणजी


