इंडियन स्ट्रीट डॉग..!

भारतीय गल्लीतील कुत्रा हा बहुगुणी आहे. तो सुरक्षा रक्षक आहे, धावपटू आहे, गायक आहे, भविष्यवेत्ता आहे, खाद्यपदार्थांचा निरीक्षक आहे आणि खांबांचा नियमित वापरकर्ता आहे. त्याला ना नोकरीची चिंता, ना महागाईची, ना ईएमआयची. त्याचे जगणे साधे असले तरी त्याचे अधिकार मात्र अमर्याद आहेत.

Story: मिश्किली |
14th November, 11:28 pm
इंडियन स्ट्रीट डॉग..!

भारतीय लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. माणसाला बोलण्याचा, नेत्याला भाषण देण्याचा, कार्यकर्त्याला घोषणा देण्याचा आणि ‘इंडियन स्ट्रीट डॉग’ म्हणजेच ‘भारतीय गल्लीतील कुत्र्याला’ भुंकण्याचा! फरक एवढाच की, माणसाला बोलण्यापूर्वी विचार करावा लागतो; कुत्र्याला मात्र विचार करण्याची गरजच नसते. त्याला फक्त माणूस दिसला की भुंकण्याचा परवाना आपोआप मिळतो. भारतीय रस्त्यावरील कुत्र्याची स्वतःची हद्द, स्वतःचे नियम, स्वतःची सुरक्षा यंत्रणा आणि स्वतःची रात्रपाळी असते. त्याच्या गल्लीमध्ये कोण नवीन माणूस आला, कोणती नवीन गाडी उभी राहिली आणि कोणत्या खांबावर दुसऱ्या कुत्र्याने आपली सही केली, याची त्याला अचूक माहिती असते.

भारतीय कुत्र्यांच्या अनेक प्रकारांपैकी पहिला प्रकार म्हणजे विनाकारण भुंकणारे कुत्रे. तुम्ही सकाळी ऑफिसला निघालेले असता. हातात डबा, खांद्यावर बॅग, चेहऱ्यावर कामाचा ताण. अशा वेळी एखादा कुत्रा तुमच्याकडे पाहून भुंकायला सुरुवात करतो. तुम्ही थांबता, तो भुंकतो. तुम्ही पुढे जाता, तो पाठलाग करतो. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, तो आणखी जोरात भुंकतो. कुत्र्यांचा दुसरा आवडता छंद म्हणजे स्कूटर आणि मोटारसायकलचा पाठलाग. तुम्ही गाडीवरून निवांत जात असताना अचानक मागून दोन-तीन कुत्रे धावत येतात. हे कुत्रे गाडी पकडण्यासाठी धावतात की गाडीवाल्याच्या हृदयाची धडधड वाढवण्यासाठी, हेच कळत नाही.  गाडीच्या मागे धावणे हा त्यांचा व्यायाम, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्रीडा प्रकार आहे.

दिवसा कुत्रे बऱ्यापैकी शांत असतात. पण रात्री बारा वाजले की त्यांच्यातील कलाकार जागा होतो. एक कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. दुसरा त्याला साथ देतो. तिसरा काहीतरी वेगळाच राग आळवतो. चौथा दूरच्या गल्लीतून प्रतिसाद देतो. काही क्षणांत संपूर्ण परिसरात भुंकण्याची मैफल सुरू होते. एक कुत्रा अचानक शांत झाला की दुसरा लगेच भुंकायला लागतो. जणू पहिल्याने गायन संपवले की दुसऱ्याची स्वतंत्र मैफल सुरू होते.

कुत्र्यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांना काहीतरी वाईट घडणार असल्याची चाहूल लागते असे लोक मानतात. रात्री अचानक त्यांचे ओरडणे सुरू झाले की काही घरांत चर्चा सुरू होते. उद्या काही अनर्थ होणार तर नाही ना? वडील मंडळी लगेच म्हणते, "काहीतरी अशुभ आहे. कुत्रे उगाच ओरडत नाहीत!" ज्योतिषी जन्मवेळ, जन्मतारीख आणि ग्रहांची स्थिती पाहून भविष्य सांगतात. कुत्र्यांना मात्र त्यापैकी काहीच लागत नाही. ते फक्त आकाशाकडे पाहून ओरडतात आणि माणसे स्वतःच्या मनाने अर्थ लावतात.

भारतीय कुत्र्यांना माणसांच्या हातातील पिशव्यांबद्दल विशेष आकर्षण असते. तुम्ही बाजारातून काहीही आणा, ते तुमच्या मागे येणारच. पिशवीत चिकन आहे की भाजी, पाव आहे की औषध, याची त्यांना खात्री नसते; पण काहीतरी खायला मिळेल, या आशेने ते तुमच्या मागे चालत राहतात. काही कुत्र्यांना तुम्ही एकदा खायला दिले की ते तुम्हाला कायमचे ग्राहक मानतात. दुसऱ्या दिवशी तुम्ही काही दिले नाही तर त्यांचे चेहरे उदास असतात. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस म्हणजे चालते-फिरते हॉटेल आहे.

भारतीय कुत्र्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गाडीच्या टायरवर सुसू करणे. गाडी नवीन असो, जुनी असो, महागडी फॉरेन असो किंवा भारतीय असो, कुत्र्यांच्या या कार्याने सर्वजण एकाच स्तरावर येतात. ‘Divided by companies, united by dog urine’ असे म्हणता येईल. भारतात व तुमच्या घरात अशी एकही गाडी असणार नाही जिच्या टायरवर कुत्र्याने शिक्कामोर्तब केलेले नाही. तसेच कावळ्यांनी ‘व्हाईटवॉश’ पण केलेली असणारच!

कुत्र्यांसाठी रस्त्यावरील खांब हे फक्त वीजपुरवठ्याचे साधन नसतात. ते त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतात. माणसे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकतात; कुत्रे खांबावर आपली उपस्थिती नोंदवतात. एका कुत्र्याने खांबावर नोंद केली की दुसरा येऊन त्यावर प्रतिक्रिया देतो. तिसरा आपली स्वतंत्र नोंद करतो. चौथा आधीच्या दोघांच्या नोंदी तपासतो. म्हणजे माणसांच्या सोशल मीडियापेक्षाही त्यांची पोस्ट, कमेंट आणि रिप्लायची व्यवस्था अधिक सक्रिय आहे. एका गावात वीज येणार म्हणून लोक आनंदात होते. गावात दिवे लागणार, अंधार दूर होणार, विकास होणार, अशा चर्चा सुरू होत्या. गावातील एक कुत्राही आनंदाने नाचत होता. एका माणसाने त्याला विचारले, "अरे, तू एवढा का खुश आहेस?" कुत्रा म्हणाला, "वीज येणार म्हणजे खांब पण येणार ना!"

काही कुत्रे नेहमी हसतमुख असतात. काहींच्या चेहऱ्यावर कायम चिंता असते. काही कुत्रे तर खरेखुरे ‘Expression King’ असतात. त्यांचे चेहरे पाहिले की वेगवेगळ्या भावना ओळखता येतात. एखाद्याच्या चेहऱ्यावर राग, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर निरागसता, तिसऱ्याच्या चेहऱ्यावर संशय, तर चौथ्याच्या चेहऱ्यावर उदासीनता! काही कुत्र्यांच्या चेहऱ्यावरील भाव तर एखाद्या मूकपटातील अभिनेत्यालाही लाजवतील. माणसांना भावना व्यक्त करण्यासाठी शब्द लागतात; कुत्र्यांना फक्त चेहरा पुरतो!

काही कुत्र्यांचे मालक तर त्यांच्याशी चक्क गप्पा मारतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुत्र्याशी संवाद सुरू असतो, तेही अगदी गोड आवाजात! कदाचित नवऱ्याशी मोठ्या आवाजात बोलत असेल, पण कुत्र्याशी नाही. "आज आपण कुठे जाणार?", "तुला भूक लागली का?", "काय झाले? आज मूड ठीक नाही का?", "अरे, तिकडे जाऊ नकोस!" कुत्राही शेपूट हलवून, मान वाकडी करून, डोळ्यांनी किंवा भुंकून उत्तर देतो. गंमत म्हणजे त्या संवादाची भाषा फक्त मालक आणि कुत्र्यालाच समजते. बाकीच्या लोकांना ते दोघे नेमके काय बोलत आहेत, याचा काहीच पत्ता नसतो. काही मालक तर कुत्र्याला आपले सर्व सुख-दुःख सांगतात. कदाचित घरातील इतर माणसांपेक्षा कुत्रा जास्त शांतपणे ऐकतो, म्हणून असेल!

काही कुत्रे स्वतःला गल्लीचे अधिकृत सुरक्षा रक्षक समजतात. तुम्ही त्या गल्लीमध्ये वीस वर्षांपासून राहत असलात तरी त्यांना तुमची ओळख पटत नाही. रोज सकाळी तुम्ही घराबाहेर पडता, तरी ते तुमची चौकशी करतात. पण एखादा अनोळखी माणूस रात्री आला तर संपूर्ण टोळी त्याच्या स्वागताला धावते. कुत्र्यांच्या टोळ्यांमध्येही राजकारण असते. एका टोळीत एक नेता असतो. तो आधी भुंकतो आणि बाकीचे त्याच्या मागे भुंकतात. कोणत्या खांबावर कोणाची नोंद झाली, कोणत्या गाडीचा पाठलाग करायचा, यावरून त्यांच्यात मतभेद होतात. काही वेळा दोन टोळ्यांमध्ये संघर्ष होतो. दोन्ही बाजूंनी जोरदार भुंकणे सुरू होते. काही क्षणांत तिसरी टोळीही सहभागी होते. शेवटी काय होते हे मात्र माणसांना कळत नाही. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तेच कुत्रे एकाच ठिकाणी बसलेले दिसतात.

माणसांच्या राजकारणाप्रमाणेच कालचे विरोधक आजचे मित्र आणि आजचे मित्र उद्याचे प्रतिस्पर्धी असू शकतात. फरक एवढाच की, माणसे यासाठी पत्रकार परिषद घेतात; कुत्रे दोनदा भुंकून विषय संपवतात! एकदा विदेशातील एक कुत्रा भारतात आला. भारतात आल्यावर तो खूप खुश झाला आणि आनंदाने उड्या मारू लागला. तेव्हा भारतीय पत्रकारांनी त्याला विचारले, "तुम्ही तर एवढ्या प्रगत आणि श्रीमंत देशातून आला आहात, मग भारतात आल्यावर तुम्हाला एवढा आनंद का होत आहे? आमच्या देशात असे काय विशेष आहे?" त्यावर तो कुत्रा म्हणाला, “आमच्या देशात खाण्यापिण्याची, राहण्याची उत्तम सोय आहे, पण तिथे आम्हाला मुक्तपणे भुंकण्याची परवानगी नाही. भुंकण्याचे स्वातंत्र्य भारतात आहे तेवढे जगात इतर कुठेच नाही!”

माणसाला घरासाठी जागा मिळवण्यासाठी कागदपत्रे लागतात, कुत्र्याला फक्त चार पाय पुरेसे असतात. तो एखाद्या जागेवर ३-४ वेळा गोल-गोल फिरून साफ करून तिथे बसतो व जागा आपली मानतो. भारतीय गल्लीतील कुत्रा हा बहुगुणी आहे. तो सुरक्षा रक्षक आहे, धावपटू आहे, गायक आहे, भविष्यवेत्ता आहे, खाद्यपदार्थांचा निरीक्षक आहे आणि खांबांचा नियमित वापरकर्ता आहे. त्याला ना नोकरीची चिंता, ना महागाईची, ना ईएमआयची. त्याचे जगणे साधे असले तरी त्याचे अधिकार मात्र अमर्याद आहेत. तो सर्वांचा लाडका आहे, प्रेमळ आहे. म्हणून तर कधी कधी कुत्र्यांना माणसापेक्षा जास्त प्रेम मिळते व घरातील वडील मंडळींना कुत्र्या सारखी वागणूक मिळते. लोक वडीलधाऱ्या मंडळींकडे लक्ष देण्यापेक्षा कुत्र्यांना फिरायला नेण्यात जास्त धन्यता मानतात.

(टीप - श्वानप्रेमींनी हा लेख वाचून अजिबात वाईट वाटून घेऊ नये. हा लेख केवळ विनोद, मनोरंजन आणि व्यंगाच्या उद्देशाने लिहिलेला आहे. कोणत्याही प्राण्याला दुखावण्याचा किंवा त्याच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचा हेतू नाही. भुंकण्याचा अधिकार कुत्र्यांचा असला, तरी हसण्याचा अधिकार माणसांचा आहे!)


आदित्य सिनाय भांगी, पणजी