रामायणात कुंभकर्ण जसा गाढ झोपलेला होता आणि इमर्जन्सीमध्ये युद्धाच्या मध्ये त्याला ढोल-नगारे वाजवून उठवले जाते, मग तो डोळे चोळत-चोळत उठतो आणि कसा-बसा युद्ध करतो आणि हारतो. सारांश काय तर कोणत्याही प्लॅनिंगशिवाय काहीही केले की अपयश पदरी पडतेच.
बहुतांश विद्यार्थी या कुंभकर्णासारखी परीक्षेची तारीख जाहीर झाली की उठतात, अप्लिकेशन फॉर्म भरतात. त्यांना हेही माहीत नसते की आपण ज्या परीक्षेला बसत आहोत, याचा अभ्यासक्रम तरी काय आहे? मला जमतोय का? झोपतोय का? परीक्षेला अवघे ८ दिवस बाकी असताना कुंभकर्ण जागे होतात आणि मग पळापळ सुरू करतात. बरं हरकत नाही, एखादा कमी वेळेच्या बंधनामुळे बाजारात जाऊन पुस्तके तरी खरेदी करून स्वतः अभ्यास सुरू करेल? तेही नाही. जे विद्यार्थी, ज्यांना खरंच सरकारी पदावर नोकरी मिळवायची असेल, तर त्यांनी आधीपासूनच तयारी नको का करायला? भलं मग कधीही पोस्टची जाहिरात येऊ दे किंवा काहीही होऊ दे, आपण आधीच तयार हवे आणि मग अपयश आले की कमिशनवर, सरकारवर, स्थानिक आमदारावर, मंत्र्यांवर, यंत्रणेवर दोष देऊन मोकळे होतात, स्वतःकडे कमीपणा घेतच नाहीत.
हे अत्यंत चुकीचे आहे. आता तर प्रत्येक परीक्षेची काठिन्य पातळी जरा वाढत चाललेली आहे. त्यामुळे आधीच्या ठोकळ्यानुसार, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेनुसार तशीच काठिन्य पातळीचे प्रश्न येतीलच असे नाही. हल्ली तर स्टाफ सिलेक्शन ग्रुप सी आणि डी साठी जीपीएसची लेव्हलचे काही प्रश्न विचारण्यात आले, मुलांची तारांबळ उडाली. जर असे व्हायचे नसेल तर मुलांनी नीट तयारी करायला नको का? दारे उघडली की गुरे जशी दाराकडे पळतात तद्वतच अॅड आली की फॉर्म भरायला हे पळतात. अरे तयारी तर करा.. माझ्या मते प्रत्येकाने बाजारातून पुस्तके आणून स्वतःचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सिरिज, नुमरीकल, रिझनिंगचे बरेचसे प्रश्न पुस्तकातून नीट कळतात. बरं कोचिंग क्लासच्या फिधा साधारण हेच शिकवायला ५० हजार पर्यंत असतात. भयंकर जुगारी डाव असतो हा. फि बघून ही मुले कोचिंग पण लावत नाहीत, पुस्तकेही आणत नाहीत, स्वतःही अभ्यास करत नाहीत आणि परीक्षेला बसतात आणि आपटतात. त्यांना वाटते इंग्रजी आणि कोकणी या विषयात सहज ३० पैकी ३० पडतील, मुळात दोन्ही मिळून १० पण पडत नाहीत. कारण अतिआत्मविश्वास नडतो. साधारणपणे ९ महिनाभर जर नीट अभ्यास केला तर या परीक्षा सहज क्रॅक करता येतात. ६० पैकी सीबीजीला ४५ जरी पडले तरी चान्सस खूप वाढतात.
मार्क कसे पाहायचे याचे पण एक टेक्निकल आहे. नीट नियोजन केले तर सहज शक्य आहे. कशावर नेमके फोकस करावे आणि कशावर नाही हे कळणे खूप गरजेचे आहे. शहरी भागात ठिक आहे परंतु ग्रामीण भागात अवघड परिस्थिती आहे. त्यांना वर पुस्तके देखील मिळू शकत नाहीत. रिझनिंग आणि न्युमरीकल प्रश्न सोडवण्यासाठी सराव अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय तो 'मेंटल अॅटिट्यूड' तयार होत नाही. एका प्रश्नाकडे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून सोडवणे म्हणजे 'अॅटिट्यूड' हा सरावाने डेव्हलप होतो. ट्रेन अर्थात स्पीड, डिस्टन्स टाईम याची साधारण ६ ते ७ प्रकार आहेत. सर्व प्रश्नांचे सराव केले की मग सोपे होते, अर्थात पूर्व तयारी व मेहनत घेतली व वेळेत सोडवण्यासाठी मॉक टेस्ट दिल्या की सहज यश पदरी पडू शकते. परंतु कुंभकर्ण अचानक उठला तर जिंकेल लढणार काय? धारातीर्थीच पडणार.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा


