६.५३ लाखांचा मुद्देमाल केला होता चोरी

मडगाव : कुंकळ्ळी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत नऊ लॅपटॉप, स्कायबॅग असा ६.५३ लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी आंध्रप्रदेशमधून संशयित प्रथमिल सेल्वन (२९) याला अटक केली आहे.
कुंकळ्ळी येथील नॅशनल इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या परिसरात १२ जानेवारी रोजी चोरीची घटना घडली. स्विफ्ट डिझायर या गाडीने आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी सुरक्षा रक्षकांना आपण प्राध्यापक असल्याचे सांगत कॅम्पसमध्ये प्रवेश केला. विद्यार्थी वर्गात असल्याची संधी पाहून सदर अज्ञात व्यक्तींनी मुलांच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश केला. मुलांच्या खोलीतून ६ लाख ४८ हजार ६३० रुपयांचे नऊ लॅपटॉप, १०९९ रुपयांचे एअरफोन व ४ हजारांचे ट्रॉली स्काय बॅग असा ६ लाख ५३ हजार ७२९ रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी तपास करत कुंकळ्ळी पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचा सदस्य असेल्या प्रथमील सेल्वन (रा. मूळ तामिळनाडू) याला आंध्रप्रदेश राज्यातून ताब्यात घेत अटक केली. संशयिताने चोरीसाठी वापरलेली कार फोंडा परिसरातून जप्त करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक देखरेखीनुसार संशयिताचे लोकेशन आंध्रप्रदेशात आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा, पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांनी ही कारवाई केली.