ड्रग्ज पुरवठा केल्याप्रकरणी अमेरिकन महिलेला सशर्त जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th February, 10:52 pm
ड्रग्ज पुरवठा केल्याप्रकरणी अमेरिकन महिलेला सशर्त जामीन

मडगाव : वार्का येथे २६ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत कोलवा पोलिसांनी आकाश सजिथ व प्रतीक बर्मन या संशयितांकडून चरस व एमडीएमए जप्त केले होते. याप्रकरणी ड्रग्ज पुरवठादार म्हणून अटक केलेल्या सुसान अपोलो (६७) यांना दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

कोलवा पोलिसांनी वार्का येथील एका फ्लॅटवर २६ जानेवारी रोजी छापा टाकला होता. या कारवाईत सुरुवातीला आकाश सजिथ आणि प्रतीक बर्मन या दोन युवकांना चरस व एमडीएमए या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून अमेरिकन रहिवासी असलेल्या सुसान अपोलो हिचे नाव पुढे आले. तिने अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा आरोप होता. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पोलिसांकडे संशयिताची पुरेशी कोठडी होती. त्या काळात पोलीस मुख्य पुरवठादार, पैशांचे व्यवहार आणि कटातील इतर व्यक्तींबाबत तपास करू शकले असते. मात्र, तपासात तसे काहीही निष्पन्न झाले नाही. केवळ सहआरोपीने दिलेल्या जबाबावर विसंबून राहून तपास यंत्रणा संशयित महिलेला पुरवठादार ठरवण्याचा प्रयत्न करत असून पुराव्याशिवाय ते ग्राह्य धरता येणार नाही. पोलिसांनी सादर केलेल्या वॉट्सअॅप चॅटमध्येही अमली पदार्थांच्या पुरवठ्याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.

न्यायालयाने एक लाखांचा वैयक्तिक बाँडसह आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी कोलवा पोलीस ठाण्यात हजर राहणे, पासपोर्ट जमा करणे, तपासात अडथळा न आणणे किंवा साक्षीदारांवर दबाव न टाकणे. स्थानिक आणि मूळ पत्त्याचा पुरावा सादर करणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा आणि देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली. संशयिताने दोन आठवड्यांच्या आत फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसकडे नोंदणी करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा अटींवर जामीन मंजूर केलेला आहे. या प्रकरणातील आकाश सजिथ आणि प्रतीक बर्मन या संशयितांनाही यापूर्वी सशर्त जामीन मंजूर झालेला आहे. 

हेही वाचा