मुख्य संशयित अक्रम खानच्या पोलीस कोठडीत वाढ

अली खान खून प्रकरण : आणखी तिघांना न्यायालयीन कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th February, 10:46 pm
मुख्य संशयित अक्रम खानच्या पोलीस कोठडीत वाढ

मडगाव : घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्या खून प्रकरणातील सात संशयितांपैकी आणखी तीन संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, मुख्य संशयित अक्रम खान याच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली.

सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या वादातून अली खान याच्यावर ३० जानेवारी रोजी मशिदीच्या बाहेर चाकू हल्ला करण्यात आला होता. जखमी अली खान याचा मृत्यू झाल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी सात संशयितांना अटक केली होती. या संशयितांपैकी निजामुद्दीन सय्यद, हुसेन खान व सक्रुद्दीन शेख या तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यातील आणखी चार संशयितांची पोलीस कोठडी शनिवारी संपली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यातील मुख्य संशयित अक्रम खान याच्या पोलीस कोठडीत वाढ करत आणखी पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर, संशयित आलम सय्यद, लतीफ सय्यद व उबेद मकानदार यांच्याही पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी फातोर्डा पोलिसांनी केली होती. अशिलांच्या वकिलांनी सध्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची बाब न्यायालयात मांडली. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तिन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच संशयित आलम सय्यद, लतीफ सय्यद व उबेद मकानदार यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केलेला असून त्यावर न्यायालयात १२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या गेटकडे खुनी हल्ला झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या अहवालानंतर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने मशिदीत येण्याजाण्यास प्रतिबंध करत मशिद सील केलेली आहे. शुक्रवारी प्रार्थना करण्यासाठी लोकांची गर्दी होऊ शकते यासाठी फातोर्डा पोलिसांनी राखीव पोलिस दलासह घटनास्थळी बंदोबस्त ठेवलेला होता. मशिद बंद असल्याने मुस्लिम बांधवांनी नजीक असलेल्या दुसर्‍या मशिदीत जात प्रार्थना केली. त्यामुळे घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मकानदार अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात

तसेच या प्रकरणातील संशयित सर्फराज मकानदार व मेहबूब मकानदार यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावर ९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. 

हेही वाचा