मंत्री अन्नपूर्णा देवी : ‘विकसित भारत २०४७’ चा भक्कम पाया

पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी. सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व इतर.
पणजी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सामान्य जनतेच्या विशेष करून महिला, युवा वर्ग तसेच शेतकऱ्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण केल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले. शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे आणि नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, अर्थसंकल्पातून युवा, महिला, शेतकरी, गरीब वर्गासाठी अनेक उपयुक्त तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे महिला सशक्तीकरणाला चालना मिळणार आहे. महिला स्वयंसहाय्यता गटांना मदत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह आधी घोषणांमुळे महिलांचा विकास होण्यास मदत होईल. अर्थसंकल्पात एमएसएमइ, रेल्वे, मूलभूत सुविधा, वस्त्रोद्योग, अन्य उद्योगांना चालना मिळणार आहे. यामुळे युवकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत २०४७ चे ध्येय दिले आहे. आता २०२६ सुरू असून केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या मध्यावरील अर्थसंकल्प आहे. भविष्याच्या विचार करून तयार केलेल्या या अर्थसंकल्पाद्वारे पुढील २५ वर्षांच्या विकसित भारताचा पाया घालण्यात आला आहे. मागील काही वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या वाटेवर आहे. अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
गोव्याला फायदा
अन्नपूर्ण देवी म्हणाल्या की, अर्थसंकल्पातून पर्यटनावर भर देण्यासाठी विशेष योजना आणण्यात आल्या आहेत. तसेच काजू, नारळ उत्पादक, मत्स्य निर्यातदार यांच्यासाठीही भरीव तरतूद केली आहे. याचा फायदा गोव्याला होणार आहे.