गोवा विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत सोहळा संपन्न

पणजी : स्थानिक अस्मिता, भाषा आणि संस्कृतीला आपल्या प्रगतीमधील अडथळा समजू नये. उलट या गोष्टी तुमच्या सामर्थ्याचा, समतोलपणाचा आणि दृष्टिकोनाचा स्रोत आहेत," असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाचे कुलपती पुसापती अशोक गजपती राजू यांनी केले. शनिवारी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू हरिलाल मेनन, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव अभय करंदीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

कुलपती पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या मुळांशी जोडून राहावे. ज्या व्यक्तीला आपली मुळे माहिती असतात, ती व्यक्ती ध्येयापासून भरकटण्याची शक्यता कमी असते. आज आपण कवी मनोहरराय सरदेसाई यांची आठवण ठेवली पाहिजे. त्यांनी स्थानिक साहित्य आणि संस्कृती कधीही कमी दर्जाची मानली नाही. उलट, या परंपरा देश व जागतिक पातळीवर पोहोचल्या पाहिजेत, असे त्यांचे ठाम मत होते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपली ओळख पुसून टाकण्याची गरज नसते, तर त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असते, हे त्यांच्या जीवनकार्यातून शिकले पाहिजे.
आपण कोण आहोत आणि कोठून आलो आहोत, या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. आपल्याला आपल्या इतिहासाचा सार्थ अभिमान असावा, कारण इतिहासच तुमच्या महत्त्वाकांक्षांना योग्य दिशा देतो. गोवा विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत येथील अथांग समुद्र, मुळांशी घट्ट नाते सांगणारी लाल माती आणि वाकतील पण मोडणार नाहीत, अशी शिस्त शिकवणाऱ्या माडांच्या बागांची मूल्ये जपून न्यावीत. यशाचा पाठलाग करताना नैतिकतेची कास सोडू नका, असे आवाहन पुसापती अशोक गजपती राजू यांनी यावेळी केले.
