नाईट क्लबमध्ये आतिषबाजीवर उद्यापासून बंदी!

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
50 mins ago
नाईट क्लबमध्ये आतिषबाजीवर उद्यापासून बंदी!

पणजी : उत्तर गोव्यातील नाईट क्लब, बार, हॉटेल आणि इतर पर्यटन आस्थापनांच्या अंतर्गत भागात आग निर्माण करणाऱ्या उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी नुकताच अधिकृत आदेश जारी केला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी उद्या रविवार ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, पुढील ६० दिवसांसाठी हा नियम लागू असेल. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील पर्यटन संबंधित आस्थापनांच्या आत आग निर्माण करणारी उपकरणे वापरली जात आहेत. यामुळे जीवित तसेच मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी आगीचा प्रादुर्भाव, दाट धूर साचणे, उपस्थितांमध्ये घबराट आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.  संभाव्य धोका टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार बँक्वेट हॉल, खासगी कार्यक्रम स्थळे, नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रिसॉर्ट्स, बीच शॅक्स किंवा पर्यटनाशी संबंधित अन्य कोणत्याही आस्थापनांच्या आत स्पार्कलर, आतिषबाजी इफेक्ट, फ्लेम थ्रोअर, स्मोक जनरेटर आणि आग किंवा धूर निर्माण करणाऱ्या तत्सम उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल. या आदेशाच्या उल्लंघनाची पडताळणी करणे आणि दोषींवर एफआयआर दाखल करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अपवादात्मक परिस्थितींत परवानगी

अत्यंत आवश्यक किंवा अपवादात्मक प्रकरणांमध्ये, जिल्हा दंडाधिकारी अंतर्गत भागात केल्या जाणाऱ्या आतिषबाजीसाठी लेखी परवानगी देऊ शकतात. मात्र, यासाठी अर्जदाराने सुरक्षेचा सविस्तर आराखडा, जोखीम कमी करण्याची योजना आणि इतर सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.

हेही वाचा