
पणजी : कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट ना हरकत दाखला (एनओसी) तयार करून प्रशासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले संशयित अजय गुप्ता यांना म्हापसा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अजय गुप्ता हे गोव्यातील प्रसिद्ध ‘रोमिओ लेन’ या आस्थापनाचे सहमालक आहेत. हडफडे येथील ‘बर्च’ क्लबसाठी बनावट आरोग्य दाखल्याचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. बर्च क्लबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर जेव्हा विविध परवान्यांची तपासणी सुरू झाली, तेव्हा आरोग्य केंद्राचा बनावट दाखला वापरून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास चक्रे फिरवून २३ डिसेंबर रोजी अजय गुप्ता यांना दिल्लीत जात त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती.
संशयित गुप्ता गेल्या काही काळापासून न्यायालयीन कोठडीत होते. त्यांच्या जामीन अर्जावर म्हापसा न्यायालयात दोन्ही बाजूंनी प्रबळ युक्तिवाद करण्यात आले. बचाव पक्षाने जामिनासाठी विनंती केली, तर सरकारी पक्षाने तपासाचे गांभीर्य ओळखून विरोध दर्शवला होता. शनिवारी ३१ जानेवारी रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निवाडा ७ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला होता. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काही अटी व शर्तींनुसार गुप्ता यांचा जामीन अर्ज मान्य केला.
या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा म्हापसा पोलीस सखोल शोध घेत आहेत. व्यावसायिक फायद्यासाठी सरकारी मोहोर आणि स्वाक्षरीचा गैरवापर केल्याच्या या प्रकरणामुळे संपूर्ण गोवा राज्यात आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान नवीन पुरावे हाती लागल्यास पुढील कडक कारवाई केली जाईल, असे संकेत पोलीस सूत्रांनी दिले आहेत.