तणाव, चिंता अन् एकाकीपणा; देशातील प्रत्येक चौथा युवक मानसिक आरोग्य समस्येच्या विळख्यात!

'टेली मानस'च्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
तणाव, चिंता अन् एकाकीपणा; देशातील प्रत्येक चौथा युवक मानसिक आरोग्य समस्येच्या विळख्यात!

नवी दिल्ली: धावपळीची जीवनशैली, कामाचे व्यापक स्वरूप आणि चढाओढीच्या युगात देशातील तरुण पिढी मानसिक आरोग्याच्या गंभीर विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय टेली-मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम (टेली मानस) हेल्पलाइनवर आलेल्या साडेतीन लाखांहून अधिक फोन कॉल्सच्या विश्लेषणातून एक विदारक वास्तव समोर आले आहे. या अहवालानुसार, देशातील प्रत्येक चौथा युवक आज उदासीनता, नैराश्य आणि निद्रानाशेसारख्या समस्यांनी त्रस्त आहे, तर दर पाचव्या व्यक्तीमध्ये तणाव आणि चिंतेची लक्षणे आढळत आहेत.

गेल्या वर्षभरात देशभरातून 'टेली मानस' हेल्पलाइनवर ३,५१,४५४ पेक्षा जास्त कॉल आले असून, त्यापैकी सर्वाधिक ७१.५ टक्के कॉल हे १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचे आहेत. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ५६.१५ टक्के इतके आहे. बदलती कुटुंबव्यवस्था, विभक्त राहण्याची पद्धत आणि कामाच्या ठिकाणची स्पर्धा यामुळे तरुणांमध्ये एकाकीपणाची भावना वाढत आहे. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींमध्ये १४ टक्के लोकांनी झोप न येणे, १४ टक्के लोकांनी सततचे नैराश्य किंवा मन जड होणे, ११ टक्के लोकांनी तणाव आणि ९ टक्के लोकांनी चिंतेची समस्या मांडली आहे. सुदैवाने, आत्महत्येचा विचार करणाऱ्या कॉलची संख्या ३ टक्क्यांपेक्षा कमी असली, तरी एकूण मानसिक आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे.

या अहवालातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ७०.७५ टक्के लोकांनी स्वतःहून फोन करून मदत मागितली आहे, तर १८.४ टक्के फोन हे नातेवाईक किंवा काळजीवाहू व्यक्तींनी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीसाठी केले आहेत. आलेल्या एकूण कॉल्सपैकी ९३ टक्के कॉल हे नियमित स्वरूपाचे समुपदेशनासाठी होते, तर ३.४९ टक्के कॉल हे अत्यंत आणीबाणीच्या स्वरूपाचे होते, ज्यांना तातडीने मानसिक तज्ज्ञांशी जोडून देण्यात आले.

ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेली ही 'टेली मानस' सेवा सध्या देशातील ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारली आहे. आतापर्यंत ३२.८४ लाखांहून अधिक लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून, देशभरात ५१ पैकी ४७ केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ही सेवा २० विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्याने भाषेचा अडथळा दूर होऊन नागरिक मोकळेपणाने आपल्या मनातील व्यथा मांडत आहेत. लवकरच ही सेवा लक्षद्वीप आणि पुडुचेरीमध्येही सुरू होणार असून, मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरत आहे.


हेही वाचा