तीन टप्प्यांत पार पडेल तपास

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. या भीषण दुर्घटनेमागील गूढ उकलण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) आता तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना सीआयडीने अजित पवार यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची, म्हणजेच त्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची तब्बल चार तास कसून चौकशी केली. या चौकशीमुळे अपघाताच्या आदल्या दिवशी नेमके काय घडले होते, यावरून पडदा उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईहून बारामतीकडे झेपावलेले अजित पवार यांचे खासगी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ पोहोचले असतानाच कोसळले होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही केवळ एक तांत्रिक दुर्घटना होती की यामागे काही घातपात होता, याबाबत राजकीय वर्तुळातून विविध संशय व्यक्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे.
तपासाच्या पहिल्या टप्प्यात सीआयडीने २८ जानेवारी रोजीच्या बारामती दौऱ्याच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले आहे. खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्या चौकशीदरम्यान, २७ जानेवारीच्या रात्री नेमकी काय चर्चा झाली होती, दौऱ्याचे नियोजन कोणी केले होते आणि प्रवासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणकोणते बदल करण्यात आले होते, यावर सविस्तर माहिती घेण्यात आली. दौऱ्याशी संबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय तपशील गोळा करून अधिकारी आता अपघाताच्या कारणांचा अंदाज बांधत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडी हा तपास तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये पूर्ण करणार आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनाचे तापमान आणि वैमानिकांमधील संवाद यासारखी तांत्रिक माहिती तपासली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून, विमानाला आग नेमकी कधी लागली आणि जमिनीवर आदळल्यानंतर त्याचे स्वरूप कसे होते, याचे विश्लेषण केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजकीय संशयाच्या अँगलने सर्व शक्यतांची पडताळणी केली जाईल. या सखोल तपासानंतरच अजित पवार यांच्या निधनाचे नेमके कारण स्पष्ट होईल.