कठोर कारवाई करण्याची खासदार शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

पणजी : गोव्याच्या (Goa) पर्यटनाला (Tourism) सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) फटका बसत असून, हॉटेल बुकींग, डिजिटल पेमेंटशी संबंधित ऑनलाईन (Online) फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. त्यातून पर्यटकांना जबर आर्थिक फटका बसण्याबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या प्रकरणांची नोंद घेत राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी गोव्यातील तसेच अन्य राज्यांत वाढत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शून्य प्रहरादरम्यान राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. गोवा हे एक जागतिक पातळीवरील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. गोव्यात पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, सायबर फसवणुकीचा फटका गोवा व अन्य राज्यांच्या पर्यटनाला बसत आहे. हॉटेल बुकींग, डिजिटल पेमेंटसंबंधीत फसवणुकीच्या प्रकारांत पर्यटक अडकत आहेत.
नामांकित हॉटेल्स आणि बुकींग पोर्टल्सच्या नावाने तयार केलेली बनावट हॉटेल्स, होमस्टे, फसव्या वेबसाईट्स यांतून पर्यटकांची मोठी फसवणूक होत अहे. बुकींगच्या नावे आगाऊ पेमेंट करून घेतला जातो. मात्र, गोव्यात येऊन पाहिल्यावर असे कोणतेही बुकींग नसल्याचे व फसवणूक झाल्याचे बसल्याचे कळून चुकते. त्यातून पर्यटकांना जबर आर्थिक फटका बसतो.
डिजिटल फसवणुकीचा गंभीर धोका गोव्याच्या व भारताच्या पर्यटन सुरक्षेला व प्रतिमेला असल्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. सरकारला पर्यटन संबंधित वेबसाईट्ससाठी कठार ‘केवायसी’ (KYC) नियम लागू करण्याचे व फसव्या प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवून कारवाई करण्याची मागणी केली. पर्यटकांची शारीरिक सुरक्षा सुनिश्चित करण्याबरोबरच डिजिटल सुरक्षेवरही भर देण्याची मागणी खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत केली.