गटाराचे काम करताना संरक्षक भिंत कोसळून मजुराचा मृत्यू; एकजण गंभीर

खोर्ली-म्हापसातील दुर्दैवी घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गटाराचे काम करताना संरक्षक भिंत कोसळून मजुराचा मृत्यू; एकजण गंभीर

म्हापसा: कासारवाडा-खोर्ली येथे म्हापसा पालिकेतर्फे सुरू असलेल्या गटार पुनर्बांधणीच्या कामादरम्यान एक दुर्घटना घडली. शनिवारी दुपारी खोदकाम सुरू असताना अचानक घराची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.




मिळालेली माहिती अशी की, म्हापसा नगरपालिकेच्या प्रभाग १८ मधील कासारवाडा भागात एका कंत्राटदाराने गटार पुनर्बांधणीचे काम हाती घेतले होते. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास राजू आणि विशाल हे दोन मजूर अंतर्गत रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराचे खोदकाम करत होते. याच वेळी चतुरी गुप्ता यांच्या घराची सुमारे दीड मीटर उंचीची दगडी संरक्षक भिंत या दोन मजुरांच्या अंगावर कोसळली. भिंतीखाली दबले गेल्याने दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले.




घटनेनंतर तातडीने दोघांनाही म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राजूची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) हलवण्यात आले. दुर्दैवाने, तिथे उपचार सुरू असतानाच राजूचा मृत्यू झाला. दुसरा मजूर विशाल याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.




या कामासाठी कंत्राटदाराने दोघांनाही कामावर आणले होते, मात्र अद्याप त्यांची पूर्ण नावे आणि पत्ता समजू शकलेला नाही. म्हापसा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळले होते का, याचाही शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर आणि कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


हेही वाचा