विद्यार्थ्यांवर भर उन्हात शिक्षण घेण्याची वेळ

सेर्नाभाटीतील सरकारी शाळेतील प्रकार : छपराचे काम अपूर्णावस्थेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th February, 11:44 pm
विद्यार्थ्यांवर भर उन्हात शिक्षण घेण्याची वेळ

सेर्नाभाटी शाळेचे छप्पर गायब असल्याने उन्हात शिक्षण घेताना विद्यार्थी.

मडगाव : मडगावजवळील सेर्नाभाटी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क छप्पर नसलेल्या वर्गात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. कंत्राटदाराच्या कमालीच्या दिरंगाईमुळे या शाळेच्या छपराचे काम रखडले असून, सुमारे २५ चिमुकल्यांना सकाळी दव आणि दुपारी रणरणत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. शिक्षण खात्याने व राज्य सरकारने या प्रश्नी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सेर्नाभाटी सरकारी प्राथमिक शाळेच्या देखभालीचे आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या कामांतर्गत जुने छप्पर पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. मात्र, नवीन छप्पर बसवण्याऐवजी कंत्राटदाराने केवळ लोखंडी बार उभे करून काम अर्धवट सोडले आहे. परिणामी, ही शाळा आता केवळ चार भिंतींचा सांगाडा उरली असून, वरून आकाश उघडे असल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शिक्षण खात्याच्या सहाय्यक जिल्हा निरीक्षक जेन दा डिकुन्हा यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कंत्राटदाराला विचारणा केली असता, त्याने सामान घेऊन येत आहे असे उत्तर दिले. मात्र, अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता, जिथे बांधकाम सुरू आहे तिथे मुलांना बसवणे अत्यंत धोकादायक आहे, असेही मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक पालकांनी सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी), शिक्षण खाते आणि राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. आमच्या मुलांच्या जिवाशी हा खेळ थांबवा आणि तातडीने छपराचे काम पूर्ण करा, अशी मागणी पालकांनी केली आहे. कंत्राटदारावर कडक कारवाई करून हे काम युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
सकाळी दव अन् दुपारी ऊन!
सध्या वातावरणात बदल होत असून, सकाळी मोठ्या प्रमाणात दव पडतो. छप्पर नसल्याने मुलांना ओलाव्यात बसावे लागते, तर दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा इतका असतो की वर्गात बसणे असह्य होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक आणि विद्यार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र याकडे शिक्षण खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा