लग्नगीते

भावभावनांची गुंफण असलेल्या ह्या ओव्या समाजाचा आरसा आहे. ह्या ओव्यांमधून जुन्या रुढी परंपरा तर दिसतातच पण त्यामागे दडलेला मतितार्थ फार महत्त्वाचा आहे. हा मातीत अर्थ समजला की रुढी, परंपरा आणि संस्कारांचे अर्थ सुद्धा नकळतपणे समजू लागतात.

Story: भरजरी |
07th February, 09:55 pm
लग्नगीते

लग्नगीते म्हणजे जुन्या काळच्या लग्न संस्कृतीचा आरसा होय! लग्न सोहळा हा सतत तीन ते चार दिवस चालत असे. त्यातील तिसरा दिवस म्हणजे विवाह दिन. पूर्वीच्या काळी लग्न हे वधूच्या घरी मांडवात व्हायचे. वर आपल्या घरून वरात घेऊन वधूला आणायला तिच्या गावी जायचा. गोव्यामध्ये ही वरात आपापल्या ऐपतीप्रमाणे पायी असायची किंवा बैलगाड्यांमध्ये चाललेली असायची. पल्ला लांबचा असल्यामुळे खर्च आणि वेळ दोन्ही लागायचे. ह्या खर्चाचा भार एकट्या नवऱ्या मुलावर पडू नये म्हणून ‘वाटेची खर्ची’ मागण्याची एक प्रथा नवरा घरातून बाहेर पडण्यापूर्वी आहे. ‘वाटेची खर्ची’ म्हणजे वाट खर्च होय. घरातील प्रत्येक वडीलधारी माणसे आशीर्वादासह ही ‘वाट खर्ची’ नवऱ्या मुलाला देत असत. ही वाट खर्ची देताना घरणीबाई गाऊ लागते...

तळपत्या भड्डार
फाटा पारार धुवर
थोराचो कुंवर
काय लग्ना वयता
बाप्पा रे यजमान्या
पुत्र लग्ना वयत्ता
वाटेची खर्ची मागता
सम्रत मावळे
थय बाळ नव्हुरे
काय विसावले 

ह्या ओवीचा अर्थ असा आहे की, थोरा-मोठ्या घरचा नवरा मुलगा लग्न करण्यासाठी जात आहे. जाताना बाप्पा तू यजमानी असल्यामुळे तुझा मुलगा तुझ्याकडे ‘वाट खर्ची’ मागत आहे. ती वाट खर्ची तू त्याला दे. आपल्या मावळ्यांसह जेव्हा तो लांबचा पल्ला चालणार आहे, वाटेत कधी तर रात्री विसावा घेणार, दुपारी विसावा घेणार अशावेळी त्याच्या हातात काही पैसे असणे गरजेचे आहेत. तेव्हा तुझ्या लाडक्या पुत्राला तू वाट खर्च दे.

एवढे मोठे महत्त्वाचे कार्य आपल्या पुत्राच्या आयुष्यात घडत असताना तो आर्थिक दृष्ट्या सबळ असावा. त्याच्या एकट्यावर ह्या लग्न सोहळ्याचा भाग पडू नये म्हणून केलेली ही तजवीज. ज्यामध्ये घरातील प्रत्येक माणूस त्याच्या आर्थिक भावाला हात-बोट लावत असतो. एवढा सूक्ष्म विचार ह्या ओवीमधून आपल्याला जाणवतो.

तळपत्या भड्डार
फाटा पारार धुवर
थोराचो कुंवर
काय लग्ना वयता
माते गे यजमानी
बाळ लग्ना वयत्ता 
वाटेची खर्ची मागता
सम्रत मावळे
थूय बाळ नव्हुरे
काय विसावले 

तळपत्या भड्डार
फाटा पाराचो धुवर
थोराचो कुंवर
काय लग्ना वयता
वयनी गे यजमानी
दीर लग्ना वयता
वाटेची खर्ची मागता
सम्रत मावळे
थूय बाळ नव्हुरे
काय विसावले 


तळपत्या भड्डा
फाटा पारार धुवर
थोराचो कुंवर
काय लग्ना वयता
बंधू रे यजमान्या
बंधू लग्ना वयता
वाटेची खर्ची मागता
सम्रत मावळे
थूय बाळ नव्हुरे
काय विसावले


तळपत्या भड्डार
फाटा पाराचो धुवर
थोराचो कुंवर
काय लग्ना वयता
भयनी गे यजमानी
बंधू लग्ना वयता
वाटेची खर्ची मागता
सम्रत मावळे
थूय बाळ न्हव्हुरे
काय विसावले 

अशा प्रकारे मानाप्रमाणे वाट खर्चासह वडिलांनंतर आईचा आशीर्वाद, भाव भावजय, बहिण यांचा आशीर्वाद घेऊन नवरा मुलगा वरात घेऊन बाहेर पडतो.

ह्या ओव्या म्हणजे नुसती सती गाणी नव्हेत. तर घरामध्ये असलेला एकोपा आहे. गरजेच्या वेळी घरातील प्रत्येक जणाने आपल्या माणसाला आनंदाने मदत करणे हा विचार ह्या ओवीमधून दर्शीत होताना दिसतो.

लग्न मंडपाच्या मुख्य दरवाजावरच नवरदेवाची ओवाळणी होते. दिव्याच्या उजेडासह त्याला मंडपात मानाने आणले जाते. आणि वरमालेची लगबग सुरू होते. गोव्यामध्ये वरमाळा मुहूर्तावरच गळ्यात पडणे आवश्यक आहे. दोन्हीकडचे वऱ्हाड आपापल्या जागी स्थिरावतात. दोघांमध्ये अंतरपाठ धरतात. मंगलाष्टका सुरू होतात. “शुभमंगल सावधान”च्या सूचनेनंतर वधू-वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालतात आणि घरणीबाई गाऊ लागते,

तळीये भोवती फुलली शेवती

राम खुंटी कळीया सीता भरी झोळीया
उठगे सीते गुथ गे माळा लगनाच्यो जाल्यो येळा
राम चढे घोड्यावरी सीता चढे पालखीवरी
सीतेची माळ काय पडे रामावरी,
रामाची माळ काय पडे सीतेवरी

वधू आणि वर याचा संसार म्हणजे राम सीतेचा संसार, जिथे रामाचे सीतेवर अतिव प्रेम आहे. ह्या प्रेमापोटी राम शेवंतीच्या कळ्या खुडून सीतेला देत आहे. सीता त्या काळ्यांनी आपली झोळी भरत आहे. रामाने दिलेली फुले म्हणून सीता लग्नासाठी तयार झाली आहे. सीतेला आणायला राम घोड्यावर बसून आला आहे. रामासोबत सीता पालखीने आपल्या सासरी जाणार आहे. पण त्यापूर्वी त्या दोघांच्या वरमाला एकमेकांच्या गळ्यात पडत आहेत. असा सुंदर कल्पनाविस्तार असलेली वरमाला गळ्यात पडण्यापूर्वीची ही ओवी घरणीबाईच्या प्रतिभेचा अविष्कार आहे. 

लग्न झाल्यानंतर कन्यादानाच्या वेळेला नवऱ्या मुलाच्या हातामध्ये बाप आपल्या मुलीचे हात देतो. आणि त्यानंतर आपल्या हाताने मुलीच्या हातावर पाणी सोडतो म्हणजेच आपली लेक नवऱ्यामुलाला दान करतो. इथे ‘दान’ करणे हे शब्दशः न घेता त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मुलगी दुसऱ्या कुळात दान करणे म्हणजे मुलीला दुसऱ्या कुळात किंवा गोत्रात सुपूर्द करणे. अशावेळी माहेरकडचे गोत्र किंवा कुळ हे तुटते आणि नवीन गोत्रामध्ये तिचे पदार्पण होते. यानंतर तिचे गोत्र आणि कुळ हे नवऱ्याच्या गोत्र आणि कुळावरून ठरणार असते. अशावेळी पूर्वाश्रमीचे गुणदोष हे आपल्याकडून नव्या घराचा आणि घराचा उद्धार करण्यासाठी लेक देणे म्हणजे कन्यादान करणे होय. 

कन्यादान करते वेळी भरल्या मनाने घरणीबाई गाऊ लागते,

पुण्याच्या मायबापा
धर्माची धार सोडा
लेक जाता परघरा
काय राज करू
राज करते लेकी
काय अनान मागशी
दि बाप्पा थाली वाटी
थाली वाटी दिल्यार
झारान ती जाई
दिलेल्या दानाच्यो
बाप्पा किर्ती न्हाई
रूमडाच्या फुलासाठी
बाप्पा केणयती
रूमडाचा सोडीन
सोन्याचा घडायन
त्या घरी नांदयन
लेकी तुका 

पुण्याच्या मायबापा तुम्ही धर्माची धार सोडून मला पर घरी दिली आहे. तिथे आपली मुलगी राज्य करण्यासाठी जात आहे. कितीही झाले तर ते नवीन घर असल्यामुळे लेकीसाठी परके असणार. अशा परक्या घरी तू राज्य करत असताना तुला माझ्याकडून काहीतरी ‘अनान’ म्हणजे आशीर्वाद रुपी कोणते दान हवे ते सांग. देणारच असशील तर बाप्पा थाली वाटी दे. थाळी वाटी काळानुरूप जरत जाईल आणि तुम्ही दिलेल्या दानाला महत्त्व राहणार नाही. तेव्हा तुला जर मला काही दान द्यायचे आहे तर दुर्मिळ असे रूमडाचे फूल दे जे मी आयुष्यभर जपून ठेवीन. असे म्हणतात की रूमडाचं फूल हे सहसा दिसत सुद्धा नाही. बारा वर्षातून एकदा फुलते. त्यामुळे ते दुर्मिळ आणि सौभाग्यशाली असते. अशा दुर्मिळ फुलाची मागणी आपली लेक करीत आहे ते पाहून बाप आपल्या लेकीला आश्वासन देत म्हणतो की, “रुमडाचे फूल सोडीन, सोन्याचे देईन पण ज्या घरी तुझं लग्न करून दिले, आहे त्याच घरी तुला सन्मानाने नांदवेन.” 

कन्यादान आमच्या वेळेला म्हटले जाणारे हे गीत आपल्या लेकी प्रती वडिलांच्या हृदयात असलेले प्रेम व्यक्त करते. जरी लेक पर घरी दिली असली तरी तिच्या प्रति असलेल्या जबाबदारींचा त्याग न करता वेळोवेळी तिच्या मदतीसाठी हा बाप खंबीरपणे उभा राहील. रुमडाच्या साध्या फुलाच्या बदल्यात सोन्याचे फूल देईन पण तुझ्या आत्मसन्मानाला धक्का लागू देणार नाही अशा प्रकारचे वचन देणारी ही ओवी लेकीला बिनघोर परक्या घरी जाण्यास त्या घरी आपला संसार फुलवण्यास मदत करते.

भावभावनांची गुंफण असलेल्या ह्या ओव्या समाजाचा आरसा आहे. ह्या ओव्यांमधून जुन्या रुढी परंपरा तर दिसतातच पण त्यामागे दडलेला मतितार्थ फार महत्त्वाचा आहे. हा मातीत अर्थ समजला की रुढी, परंपरा आणि संस्कारांचे अर्थ सुद्धा नकळतपणे समजू लागतात.


गाैतमी चाेर्लेकर गावस