माझ्या लग्नानंतर फोन करणारे माझे पप्पा, कधी फोन उचलला नाही तर रागावणारे पप्पा… आजही मला त्यांचे मिस्ड कॉल्स आठवतात. हॉस्पिटलमधल्या शेवटल्या भेटीचे ते शेवटचे वाक्य… “म्हाका कितें जाला तर? हांव आत्ता गाडी स्टार्ट मारून तुमगेर येंव शकता.” खरंच! मुलीवर बाबांची माया ही निराळीच असते.

‘‘सुनिता, बाजारान वचून येवयां. किदें किदें जाय ते पळय.” आमचे पप्पा मम्मीला घेतल्याशिवाय कधीच बाजारात गेले नाहीत. आणि गेलेच तर जायच्या अगोदर दहा वेळा “रोखडो येता गो... सुनित येता गो...” करायचे. आमच्या मम्मीला तर सर्व शेजारी चिडवायचे. कधी कधी तर आम्ही सुद्धा त्यांची गम्मत करायचो. ते दिवस आठवले की आजही डोळे पाणावतात. किती मजा होती, किती आपुलकी होती. लहान असताना माणसे कशी जवळ असतात. काही सांगायचं झालं की सहज बोलायचं, पण आता तसं नाही. कुणाला डिस्टर्ब करायचं नाही, काही काम असल्यास दारावर न मारता, खिडकीवर न मारता, कॉल करायचं; घरातल्या घरात.
त्यावेळी आम्ही सगळे सात तारखेची आतुरतेने वाट बघायचो. सात तारखेला पप्पांचा पगार व्हायचा. त्यावेळी पगार रोख पैसे हातात मिळायचे. पप्पा पगाराचे पैसे घेऊन आले की आम्ही मम्मीची मजा पाहायचो. ती 'हा खर्च तो खर्च', असं काय काय सांगून पप्पांना नोटा मोजायला लावायची. ओव्हरटाईम केल्याने जास्त पैसे आल्यावर पप्पांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता असायची. त्यावेळी हातावर पडलेल्या क्षुल्लक पगाराचा जो आनंद असायचा, तो बँकेत कितीही अंकाचा पगार आल्याने होत नाही.
सगळा हिशोब आवरल्यावर चिकनचा बेत ठरायचा. जेवण तयार झाल्यावर आम्ही दोघी बहिणी व भाऊ, मम्मी पप्पा सर्वजण एकत्र बसून जेवण करत असू. किती मजा असायची! दररोज सुद्धा आम्ही सोबतच जेवण करायचो. त्यावेळी त्याचं काही नवल नव्हतं पण आता जेव्हा जेवण करताना सोबतीला कोणी नसतं, तेव्हा त्या गोष्टीची खूप आठवण येते. खरं सांगायचं तर, जेवण कितीही रुचकर असलं तरी त्याला ती चव येत नाही. पप्पा ज्या आनंदाने कपडे घेऊन देत, खाऊ घेऊन देत, आता त्या उत्साहात कोणी कुणासाठी काही करतच नाही. आणि आई बापानं केलं तरी त्याचं मुलांना कौतुक नाही.
पगार झाला की कसं पप्पा माझे आवडते केळ्यांचे चिप्स घेऊन यायचे. मला आठवतंय, माझे केस चांगले व्हावे म्हणून ‘लिव्हॉन’ जे महागडं तेल तेव्हा बाजारात नवीन आलेलं, पप्पानी मला न विचारताच आणून दिलं होतं. माझ्या वाढदिवसाला ‘पोशाख’ मधून आणलेला तो ड्रेस, मी चौथीला होते तेव्हा, तरीही आठवतं सर्व.
तसं आठवतं, हॉटेलमधून भाजी आणायचे आणि मला आवडतं त्याच हॉटेलमधून समोसा आणायचे. मोकळेपणाने कधी बोलले जरी नाही, आजकालच्या ‘Cool dad’ सारखे नसले तरी तेव्हाही तेच माझे Superman होते आणि आजही आहेत.
मला आठवतं मी पप्पांना माझ्या पहिल्या पगाराने घेऊन दिलेले कपडे, किती उत्साहाने घातले होते त्यांनी. आणि शेवटचे कपडे, दिवाळीच्या दिवशी घातलेला कुर्ता, सर्व काही आठवते. पप्पांना माझ्या हाताच्या ‘तिसऱ्या’ खूप आवडायच्या. मम्मीला सांगूनच आणायचे की “सोनियाक करूनी.” केवढं Proud feel व्हायचं तेव्हा! पप्पांबरोबर गाडी धुणे. माझ्यासाठी मी बस स्थानकावर पोहोचायच्या आधी २० मिनिटे अगोदर येऊन माझी वाट पाहणारे माझे पप्पा. आज जेव्हा कोणीही आपल्या बाबावर ओरडताना दिसतं किंवा त्यांना अपशब्द देताना दिसलं की माझं मन कसं भरून येतं. त्या मुलांना मनातून सांगावसं वाटतं की बाबा आहे तोवर सर्व द्राक्षे गोडच भेटणार, सर्व हट्ट पुरवणार; नंतर कोणी काही विचारणारं सुद्धा नसतं.
माझ्या लग्नानंतर फोन करणारे माझे पप्पा, कधी फोन उचलला नाही तर रागावणारे पप्पा...आजही मला त्यांचे मिस्ड कॉल्स आठवतात. हॉस्पिटलमधल्या शेवटल्या भेटीचे ते शेवटचे वाक्य...“म्हाका कितें जाला तर? हांव आत्ता गाडी स्टार्ट मारून तुमगेर येंव शकता.” खरंच! मुलीवर बाबांची माया ही निराळीच असते.
दिवसभर काम करून, थकून आलेल्या बाबांचा सहवास आईपेक्षा जरी कमी असला, तरी त्यांची माया आभाळाएवढी असते. पप्पांना जाऊन आठ वर्षे झाली. तरीही वेडं मन त्यांच्या आठवणीत रमतं आणि हळूच डोळे पाझरू लागतात.

सोनिया परब