'चक्रव्यूह' भेदण्याचे आव्हान

पर्वरीचा उड्डाणमार्ग पूर्ण होईल तेव्हा होईल. आजच्या घडीला वाहनचालक मात्र वाहतूक कोंडीच्या 'चक्रव्यूहात' सापडले आहेत. प्रशासकीय यंत्रणा आणि कंत्राटदार कंपनी हा चक्रव्यूह भेदण्यात दररोज अपयशी ठरत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे.

Story: वर्तमान |
31st January, 11:24 pm
'चक्रव्यूह' भेदण्याचे आव्हान

पर्यावरणाची अत्यल्प हानी करून लोकाभिमुख विकासकामे होत असतील, तर त्याला विरोध करण्याचे मुळी​च कारण नाही. मात्र ही विकासकामे साकारत असताना प्रशासनाने लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. काही वेळा या विकासप्रक्रियेमुळे सामान्य माणूस भरडला जातो आणि ‘नको तो विकास’ असे उद्वेगाने म्हणायची वेळ येऊन ठेपते. पर्वरीतील एलिव्हेटेड कारिडॉर म्हणजेच उड्डाणमार्गाच्या उभारणीमुळे सध्या अशीच स्थिती बनली आहे. सकाळी सुरू होणारा वाहतूक काेंडीचा खेळ रात्रीपर्यंत सुरू असतो. नियोजनशून्य वाहतूक व्यवस्थापनामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत.

ओ कोकेरो जंक्शनजवळ उड्डाणमार्गाचे काम पोहचताच ही स्थिती उद्भवली आहे. तशी अपेक्षा आणि अटकळ सुरुवातीपासूनच होती. कारण या ठिकाणी महामार्ग आणि अंतर्गत दोन मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी काम करताना वाहतूक एका बाजूने पूर्णपणे बंद ठेवणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी २७ डिसेंबर रोजी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून रस्ता बंद करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार २ जानेवारी ते २ मार्च असे तब्बल दोन महिने नवा ओडीपी (बायपास) रस्ता म्हापसाहून जाणाऱ्या वाहनांसाठी दोन महिन्यांकरिता बंद ठेवण्यात आला आहे. पर्वरीतील महामार्ग आणि ओ काेकेरो जंक्शनवरून साळगावच्या दिशेने जाणारा चोगम रोड अंशत: बंद करण्यात आले आहेत. हे कागदावरील नियोजन योग्यच वाटते. पण प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का? मुळीच नाही. मुळात वाहतूक कुठूनही वळवली, तरी वाहनांची गर्दी होणारच अशी पर्वरीतील रस्त्यांची स्थिती आणि येथील परिसराची भौगोलिक रचना आहे. ती लक्षात घेऊन आधीच खबरदारी​ घेतली असती, तर आताची स्थिती उद्भवली नसती.

म्हापशाहून पणजीकडे जाणाऱ्या महामार्गावरील एक बाजू पिंटो हॉस्पिटलजवळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. याला दोन महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. पिंटो हॉस्पिटल ते ह्युंदाई शोरूम या भागातील खडबडीत एकेरी मार्गावरून वाहने पणजीच्या दिशेने जातात. या मार्गाचे डांबरीकरण अद्याप का केले नसावे, हा प्रश्न वाहनचालकांना सतावतो. कदाचित रस्ता खडबडीत ठेवल्याने वाहनांचा वेग आपोआप मंदावून वाहतूक कोंडी, अपघात होणार नाही, अशी शक्कल कुणाच्या तरी सुपिक डोक्यातून आली असावी. असो. पण येथे हॉटमिक्स डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे. गमतीची गोष्ट म्हणजे याच भागात आधी उड्डाणमार्गाचे खांब उभारले गेले, नंतर एका बाजूने जमिनीचा उंचवटा असल्यामुळे उंच अवजड वाहने, बसेस खांबांच्या वरच्या भागाला घासू लागल्या, हे निदर्शनास आले. ते टाळण्यासाठी हा रस्ता सुमारे दहा मीटर खोल खणून या वाहनांच्या उंचीची काळजी घेण्यात आली. इथेच या उड्डाणमार्गाचा उभारणीपूर्व अभ्यास आणि वाहतूक नियोजन करणारे साफ नापास झाल्याचे दिसून आले. खांब उभारण्यापूर्वी हा रस्ता खणून वाहनांच्या उंचीची काळजी घेता आली असती. 

वाहतूक पोलिसांची कमतरता

तिस्क-सुकूर ते पर्वरीतील खाप्रेश्वर मंदिरापर्यंत वाहतूक पोलिसांची कमतरता दिसून येते. अनेक वेळा एकच पोलीस दोन्ही बाजूंनी येणारी वाहने नियंत्रित करण्याची कसरत करत असल्याचे दिसून येते. कदाचित त्याच्या नियंत्रण कौशल्याची परीक्षा संबंधितांकडून घेतली जात असेल. असो. या मार्गावर पोलिसांची, होम गार्ड्सची संख्या वाढविण्याची गरज आहे. कारण कधी कधी सकाळी ७ वाजल्यापासूनच वाहने पुढे दामटण्याच्या सवयीमुळे किंवा एखादे अवजड वाहन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होते. अनेकांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळा चुकतात, काहींची मुले शाळेत उशिरा पोहचतात. अशा स्थितीत कोणी फुकटचा सल्ला देऊ शकतो, ‘मग घराबाहेर पडा अर्धा तास आधी!’. काही लोक सोशल मीडियावर असे सल्ले घरात बसून देत आहेत, तो भाग वेगळा. पण या वेळेच्या अपव्ययावर मार्ग काढण्याची जबाबदारी आरआरएसएम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसह प्रशासनाचीही आहे. एखादी रुग्णवाहिका या गर्दीत अडकून पडली आणि रुग्ण दगावला तर प्रशासन याची जबाबदारी घेणार आहे की कंत्राटदार? 

बेभरवशी कारभार...

वाहनांच्या रांगा तिस्क-सुकूरपर्यंत लागल्या की येथून वाहने आराडी या अंतर्गत रस्त्यावर घातली जातात. हा रस्ता सुरुवातीला रुंद आहे. पण साधारण ५०० मीटरवर अत्यंत अरुंद आहे. एकावेळी एकच वाहन जाऊ शकेल, इतकी जागा इथे आहे. मात्र वाहनचालकांच्या घाईमुळे इथेही वाहनांच्या रांगा लागतात. सकाळी तर या ठिकाणी होमगार्ड अथवा पोलीस नसतात. त्यामुळे कोणी तरी स्थानिक अथवा एखादा वाहनचालक पुढाकार घेऊन वाहतूक नियंत्रित करतो. या ठिकाणी सकाळी ७ ते रात्री किमान ८ वाजेपर्यंत एक तरी वाहतूक नियंत्रित करणारा कर्मचारी तैनात असायलाच हवा. या कर्मचाऱ्यांनी वॉकीटॉकी अथवा मोबाईलवर संपर्कात राहून वाहतूक नियंत्रण करणे अपेक्षित आहे. पण या बाबतीत प्रचंड अनास्था दिसून येते. वाहनांच्या लोंढ्यासमोर हे कर्मचारी हतबल होताना दिसतात. 

केवळ वाहतूक वळवून काय फायदा? 

सध्या चोगम रोडचे नाव ‘चोक्ड रोड’ असे बदलावे इतकी भयानक स्थिती आहे. पणजीहून म्हापशाकडे जाणारी सगळी वाहतूक या रस्त्यावरून वळवली आहे. गंमत म्हणजे ओ कोकेरो जंक्शनवरून साळगावच्या दिशेने जाणारे वाहनचालक पुढे पूर्ण रस्ता मोकळा मिळत असल्यामुळे अनिर्बंधपणे ओव्हरटेक करून गाड्या दामटतात. पुढे हॉटेल आशीर्वादजवळ समोरून येणारी वाहतूक (म्हापशाहून बायपासने येणारी वाहने) महामार्गावर वळविण्यासाठी  बॅरिकेड्स घालून रस्ता 'वन वे' केला आहे. इथे पोहचताच वाहनांचा वेग झक मारत कमी करावा लागतो. या ठिकाणी प्रचंड कोंडी होते. सकाळी आणि संध्याकाळी ‘पीक अवर्स’मध्ये तर स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होते. इथेही पोलीस बळ पुरेसे नसते. वाहनचालक कोणालाही जुमानत नाहीत. जणू शिस्त आणि आपला संबंधच नाही, अशा आविर्भावात वाहने चालवली जातात. खरे तर या भागात रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स घालून वाहतूक पूर्वीप्रमाणे ‘वन वे’ ठेवणे आवश्यक आहे. 

खापरेश्वर मंदिर जंक्शनवर सर्वाधिक ताण

वाहतूक कोंडीचा सगळ्यात ‘हॉट स्पॉट’ बनला आहे तो खापरेश्वर मंदिराजवळचे जंक्शन. या ठिकाणी म्हापशाहून येणारी वाहने आणि चोगम रोडमार्गे बायपासवरून येणारी वाहने एकत्र येतात. इथेही पोलिसांची संख्या अपुरी असते. परिणामी वाहनांच्या रांगा दिसून येतात. या भागात वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्यासह बायपासवरून येणारी वाहनांची संख्या कमी करण्याची गरज आहे. ही अतिरिक्त वाहने पुढच्या अंतर्गत रस्त्यावरून महामार्गावर कशी नेता येतील, याचेही नियोजन करायला हवे. त्यातून या भागातील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकेल. खापरेश्वर मंदिराजवळ बंद असलेल्या लेनमधूनही वाहने सोडण्याचा विचार करता येईल. 

सहा-पदरी असलेल्या ५.१५ किलोमीटर लांबीच्या या उड्डाणमार्गाचे काम वेगाने सुरू असले, प्रकल्पाच्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, खांबांवर कमानी (सेगमेंट) उभारणीचे काम पूर्ण होण्यास जूनपर्यंत किंवा त्यानंतर विलंब होऊ शकतो. तिस्क-सुकूर येथे प्रारंभीच्या काळात एक कमान कोसळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जास्त खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारने डिसेंबर २०२६ मध्ये या मार्गाच्या उद्घाटनाचे लक्ष्य ठेवले असले, तरी हा प्रकल्प २०२७ च्या प्रारंभापर्यंत लांबणीवर पडू शकतो. सध्या बांधकाम सुरू असलेल्या मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने सेगमेंट लाँच करण्याच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत हे काम लांबू शकते, असे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. सर्व्हिस रोड रुंद करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे मर्यादित जागेतच सेगमेंटची वाहतूक करून ते लाँच करावे लागतात. वाहतुकीमुळे कामात अडथळा येतो आणि कोणताही धोका टाळण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळेही काम लांबले आहे. हा उड्डाणमार्ग एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र नंतर ही अंतिम मुदत सहा महिन्यांनी वाढवण्यात आली. आताची कामाची गती​ पाहता, या कालावधीत काम १०० टक्के पूर्ण होण्याची​ शक्यता वाटत नाही.

एकंदरीत पाहता, वाहतूक कोंडीसह लोकांच्या मानसिक कोंडीचे कोणालाच सोयरसुतक नसल्यासारखी स्थिती आहे. विकास प्रकल्प राबवताना जणू लोकांवर उपकार केले जात असल्याचे बेफिकीर चित्र दिसत आहे. वाहतूक कोंडीचा हा 'चक्रव्यूह' भेदण्याचे आव्हान सरकारला पेलणार आहे का.


- सचिन खुटवळकर

(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)